सततच्या आम्लपित्ताला नेहा अगदी कंटाळली होती. पित्त उसळणारसे वाटले तरी अँटासिड औषध घ्यायची तिला सवयच लागली होती. औषध घेतले की तिला तेवढय़ापुरते बरेही वाटे. पण काही दिवसांपासून मात्र पित्त होण्याबरोबरच तिचे पोटही दुखायला लागले, वारंवार उलटय़ा होऊ लागल्या. निदान झाले अल्सरचे. अल्सरबद्दल अर्थात पोटातल्या जखमेबद्दल जाणून घेऊ या-
अल्सर म्हणजे एक प्रकारची जखमच. सर्वसाधारणपणे या जखमा जठराला किंवा लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागात (डय़ुओडेनम) होतात. आम्लपित्ताशी आपण ज्या अल्सरचा संबंध जोडतो तो हाच. याशिवाय काही रुग्णांमध्ये अन्ननलिका, मोठे आतडे किंवा लहान आतडय़ालाही वेगवेगळ्या कारणांमुळे अल्सर होऊ शकतो. पण हे नेहमी बघायला मिळणारा अल्सर हा जठर किंवा डय़ुओडेनमला होणारा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्षणे कोणती?
अल्सरच्या प्रकारानुसार लक्षणे वेगवेगळी असू शकतात. सामान्यत: दिसणारी काही लक्षणे अशी-
*पोटाच्या वरच्या भागात वारंवार दुखणे
*आम्लपित्त होणे
*सतत पित्त वर येऊन छातीच्या मध्यभागी दुखणे
*पोट डब्ब झाल्यासारखे वाटणे
*यात अल्सरच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये वारंवार पित्त होते, भूक कमी होते, काही जणांचे वजनही कमी होते. बेंबीच्या वरच्या भागात दुखायला लागते.
*अल्सरच्या गंभीर लक्षणांमध्ये दुखणे वाढते, दुखण्यामुळे रात्रीतून उठून बसावे लागते. अशा दुखण्यात बऱ्याचदा खाल्ल्यावर आराम पडल्यासारखे वाटते. मळमळ आणि आम्लपित्त झाल्यानंतर होतात तशा उलटय़ाही होऊ शकतात. आजार आणखी पुढे गेला असेल तर उलटीतून रक्त पडू शकते. काही रुग्णांमध्ये शौचावाटे रक्त जाऊ शकते किंवा शौच काळ्या रंगाची होऊ शकते.
*अल्सरचे काही रुग्ण अगदीच गुंतागुंतीच्या गंभीर परिस्थितीत डॉक्टरांकडे येतात. अशा रुग्णांमध्ये अल्सर फुटून आतडय़ाला छिद्र पडलेले असू शकते. या रुग्णांना अचानक पोटात प्रचंड दुखू लागणे, उलटय़ा होणे आणि पोट गच्च होऊन फुगणे ही लक्षणे दिसतात. गंभीर स्थितीत आलेल्या काही रुग्णांना रक्ताची उलटी होते किंवा संडासवाटे जोरात रक्त जाते. याउलट काही रुग्णांमध्ये अल्सर भरून आतडय़ाची ती जागा बारीक होते आणि तिथे अडथळा निर्माण होऊन उलटय़ा होतात.

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulcer
First published on: 23-05-2015 at 09:51 IST