तुमच्या लहानग्याला समजून घ्या!

मुलाला शाळेत घातले म्हणजे त्याने अभ्यासात कायम आघाडीवरच असले पाहिजे, असा अनेक पालकांचा आग्रह असतो. ‘माझ्या मुलाने केवळ अभ्यासातच नव्हे तर खेळातही अव्वल असले पाहिजे, त्याला एखादी कलाही आली पाहिजे..’, पालकांच्या अपेक्षांचे ओझे संपतच नाही!

मुलाला शाळेत घातले म्हणजे त्याने अभ्यासात कायम आघाडीवरच असले पाहिजे, असा अनेक पालकांचा आग्रह असतो. ‘माझ्या मुलाने केवळ अभ्यासातच नव्हे तर खेळातही अव्वल असले पाहिजे, त्याला एखादी कलाही आली पाहिजे..’, पालकांच्या अपेक्षांचे ओझे संपतच नाही! ते पेलताना मुलांची चांगलीच तारांबळ उडते. पण आपले मूल वर्गात इतर मुलांच्या तुलनेत मागे पडते आहे, असे पालकांच्या लक्षात आल्यावर? ती गोष्ट त्यांना चांगलाच धक्का देते. ‘आम्ही दोघे तर किती हुशार आहोत, मग आमचा मुलगा मठ्ठ कसा असेल?..साध्या प्रश्नाची उत्तरं देणं त्याला का जमत नाही..हा सगळा त्याचा हट्टीपणा असेल..शाळेत न जाण्याची कारणं शोधतोय तो!..’, अशा संवादांची फैर झडते! मग सुरू होतो मुलाला ‘वळण’ लावण्याचा प्रयत्न आणि त्याची मूळ समस्या बाजूलाच राहते! मुलामुलींच्या शालेय वयात शिकण्याशी संबंधित कोणकोणत्या समस्या त्यांना असू शकतात, त्यांची ही ओळख –        

स्पेसिफिक लर्निग डिसअ‍ॅबिलिटी
शाळेत काही मुले अभ्यासात मागे पडत असल्याचे निदर्शनास येते. काही विशिष्ट गोष्टी समजून घेण्यात या मुलांना वारंवार अडचणी येतात. ज्या मुलांचा बुद्धय़ंक ८५ ते १०० च्या दरम्यान असतो, त्यांना ही समस्या असू शकते. अशा मुलांना एखादे काम करायला दिल्यास त्यांना त्या कामासाठी इतर मुलांपेक्षा अधिक वेळ लागतो. वर्गात लक्ष एकाग्र करणे त्यांना कठीण जाते. त्याच-त्याच चुका ही मुले पुन:पुन्हा करतात. वाचन करताना वरच्या ओळीतले किंवा खालच्या ओळीतले शब्द न वाचण्यासारख्या या चुका असतात. तोंडी सांगितलेले वाक्य किंवा शब्द लिहिणे त्यांच्यासाठी अवघड असते. शाळेत न्यायच्या दप्तराच्या आकारानुसार त्यात वह्य़ा-पुस्तकांची मांडणी करणे या मुलांना जमत नाही. गणिताची चिन्हे समजणे जड जाते. काही सूचना सलगपणे केल्यास त्यानुसार कृती करणे त्यांना जड जाते. शालेय मुलांमध्ये अशा प्रकारची लक्षणे दिसत असल्यास त्याला ‘स्पेसिफिक लर्निग डिसअ‍ॅबिलिटी’ ही मानसिक समस्या असू शकते.

स्लो लर्नर्स  
अशा मुलांच्या बुद्धय़ंक ७० ते ९० च्या दरम्यान असू शकतो. शाळेत शिकण्याच्या बाबतीत ही मुले इतर मुलांच्या तुलनेत कमी गतीने शिकतात. यांनाही वर्गात लक्ष देण्यास आणि एकाग्रता साधण्यास अडचणी येतात. दिलेले काम पूर्ण करण्यास अधिक वेळ लागतो. त्यांना काही हवे असल्यास ते सांगण्यासाठी त्यांना प्रयासाने शब्दांची जुळवाजुळव करावी लागते. अशा मुलांचे लिहिणे अस्ताव्यस्त आढळते. लिहिताना ती आवश्यक नसलेल्या गोष्टीही लिहितात. लेखी परीक्षेपेक्षा तोंडी परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळतात. प्रयोग परीक्षेत मात्र दिलेल्या सूचना त्यांना परत परत सांगाव्या लागतात. ज्या मुलाला भूतकाळात फिट्स येण्याचा त्रास असेल किंवा डोक्याला मार लागलेला असेल, अशा मुलाला स्लो लर्निगची समस्या उद्भवू शकते. ही मुले मित्रमंडळींबरोबर असताना एखाद्या गोष्टीवरून लवकर चिडतात, राग व्यक्त करतात.

ऑटिझम
शाळेत गेल्यावरही काही मुले एकटे एकटे राहणे पसंत करतात. कुणातही मिसळत नाहीत. अशा मुलांना इतरही काही विशिष्ट लक्षणे दिसत असली, तर ती ‘ऑटिझम’ या समस्येने ग्रस्त असू शकतात. या मुलांना इतरांशी बोलताना नजर भिडवणे जमत नाही. त्यामुळे बोलताना ही मुले इकडे-तिकडे बघतात. एखादा प्रश्न विचारल्यावर त्याचे उत्तर देण्याऐवजी ही मुले तोच प्रश्न पुन्हा उच्चारतात. उदा. ‘तुझे नाव काय?’ अशा प्रश्नाला उत्तर देताना नाव सांगण्याऐवजी मुलाकडून ‘तुझे नाव काय?’ असा प्रश्नच पुन्हा विचारला जाऊ शकतो. इतर मुलांबरोबर खेळत असताना ही मुले आपली खेळण्याची वेळ येण्याची वाट पाहू शकत नाहीत. अनेकदा शारीरिक हालचालींची-हातवाऱ्यांची भाषा त्यांना समजत नाही. त्यांना त्यांच्या नावाने हाक मारल्यास प्रत्येक वेळेस ती हाकेला ‘ओ’ देत नाहीत. या मुलांना डोळे मिचकावणे, खांदे उडवणे, विशिष्ट वस्तूचा वास घेणे अशा प्रकारच्या सवयी असू शकतात. या समस्येने ग्रस्त असलेली मुले वर्गातील त्यांच्या बसण्याच्या जागेबद्दल ‘पझेसिव्ह’ असतात. वर्गात ही मुले तोच-तोच प्रश्न पुन्हा विचारण्याची किंवा चाललेल्या मुद्दय़ाशी संबंधित नसलेला प्रश्न विचारण्याची शक्यता असते. त्यामुळे शिक्षकांच्या किंवा इतर मुलांच्या मनात चाललेल्या कामात अडथळा निर्माण होत असल्याची भावना निर्माण होऊ शकते.

लो व्हिजन
शाळेत काही मुले फळ्यावर लिहिलेले नीट दिसत नसल्यामुळे अभ्यासात मागे पडत असतात. या मुलांना ‘लो व्हिजन’ ही समस्या असू शकते. यांतील काही मुलांना अगदी पहिल्या बाकावर बसूनही फळ्यावर लिहिलेले नीट दिसत नाही.  पुस्तक वाचताना ही मुले ते डोळ्यांच्या फार जवळ किंवा फार लांब धरतात. लिहिताना दोन शब्दांमध्ये योग्य अंतर सोडणे त्यांना जमत नाही. एका सरळ रेषेत लिहिणे जमत नाही. डोळ्यांपासून चार-पाच मीटर दूरवरच्या गोष्टी त्यांना ओळखता येत नाहीत. रंग, वेगवेगळी चिन्हे, संख्या ओळखताना त्यांना अडचणी येतात. काही मुलांना इतरांच्या चेहऱ्यावरच्या भावना पटकन ओळखता येत नाहीत. ही मुले एकाच वस्तूवर अधिक काळ लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. शालेय वयात मुलांमध्ये अशा प्रकारची लक्षणे दिसत असल्यास त्याला ‘लो व्हिजन’ म्हणजे दृष्टी कमी असण्याची समस्या असू शकते. आपल्याला दिसत नसल्याचे मुले सांगत नसल्यामुळे या समस्येचे निदान उशिरा होण्याची शक्यता असते.
‘मला अमुक एक समस्या आहे’, असे मूल आपल्या तोंडाने निश्चितपणे सांगत नसते! त्याच्या समस्या ओळखाव्या लागतात पालकांना, आणि मुख्य म्हणजे शाळेतल्या शिक्षकांना. असलीच एखादी समस्या म्हणजे आपले मूल ‘नॉर्मल’ नाही, असे मुळीच समजू नये. शेवटी नॉर्मल आणि अबनॉर्मल या संकल्पनाही आपणच निष्कारण तयार करत असतो! आपल्या मुलाच्या काही विशेष गरजा आहेत हे या पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ही मुले कुठेही मागे पडत नाहीत. वेळेवर घेतलेला वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य समुपदेशन या कामी महत्त्वाचे ठरते.
शब्दांकन – संपदा सोवनी    
            

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Understand your small kid

ताज्या बातम्या