सरकारी नोकरीत जबाबदारीचा पदभार तत्परतेने व सचोटीने सांभाळणाऱ्या सौ. उमाताई बेंद्रेंची नोकरी व संसार यांचे संतुलन राखण्याची तारेवरची कसरत गेली २५ वर्षे चालू होती. आहारात सॉल्टेड बटर व शिकरण असा विरुद्धाहार, ब्रेड-टोस्ट असे बेकरीचे पदार्थ व मांसाहार यांचा अतिरेक ही वात-पित्त-कफ हे त्रिदोष व रसदुष्टी करणारी कारणे होतीच. मासिक पाळी बंद झाल्यावर चार वर्षांनी म्हणजे २००६ मध्ये उमाताईंना मासिक पाळीसारखा योनिगत रक्तस्राव होऊ लागला. सी.टी. स्कॅन व एंडोमेट्रियल बायॉप्सी केली असता गर्भाशयाच्या अंत:त्वचेचा मॉडरेटली डिफरंशिएटेड एंडोमेट्रियल एडिनोकार्सनिोमा असल्याचे निदान झाले. शस्त्रकर्माने गर्भाशय, स्त्री बीजकोष यांचे पूर्णत: निर्हरण केल्यावर केमोथेरपी व रेडिओथेरपी घेण्याची आवश्यकता नाही, अशा वैद्यकीय सल्ल्यानंतर बेंद्रेकाकूंनी आमच्या प्रकल्पात २००६ मध्ये आयुर्वेदिक चिकित्सा सुरू केली. आहार-विहारातील पथ्यपालन, शमन-रसायन व बस्ती ही पंचकर्म चिकित्सा यांचे पालन करून गेली ६ वर्षे बेंद्रेकाकू नोकरी व कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे व सशक्तपणे पार पाडत आहेत.
स्त्री शरीरातील प्रजोत्पादक अवयवांपकी गर्भाशय हा गर्भाचे ९ महिने धारण व पोषण करणारा पोकळीयुक्त अवयव असून त्याचे प्रामुख्याने अंत:त्वचा म्हणजे एंडोमेट्रीयम, मांसपेशीचा मधला स्तर व सिरोसा हा बाह्यस्तर असे तीन स्तर असतात. स्त्री बीजकोषातून दर महिन्याला बाहेर पडणाऱ्या स्त्री बीजांडाचा पुरुष शुक्राणूंशी संयोग झाल्यावर जे फलित बीजांड तयार होते, ते गर्भरूपाने गर्भाशयाच्या अंत:त्वचेत स्थिर होते व तेथेच त्याचे ९ महिने धारण-पोषण होते. गर्भाचे धारण-पोषण करण्यास अनुकूल अशी सुदृढ गर्भशय्या अंत:त्वचेत निर्माण व्हावी म्हणून स्त्री बीजकोषातून इस्ट्रोजेन या हार्मोनचे स्रवण केले जाते. जर गर्भधारणा झाली नाही तर इस्ट्रोजेन या हार्मोनचे प्रमाण कमी होते व प्रोजेस्टोरॉन हा हार्मोन अधिक प्रमाणात स्रवला जातो व त्यामुळे गर्भाशयाच्या अंत:त्वचेचे जाड आवरण मासिक पाळीतील योनिगत रक्तस्रावाच्या रूपाने बाहेर टाकले जाते. गर्भाशयाच्या कॅन्सरपकी बहुतांशी म्हणजे ८०%  कॅन्सर हे गर्भाशयाच्या अंत:त्वचेचे म्हणजे इंडोमेट्रियल कार्सनिोमा असून त्याचे एडिनोकार्सनिोमा, स्क्व्ॉमस सेल कार्सनिोमा, एडिनोस्क्व्ॉमस कार्सनिोमा, अनडिफरंशिएटेड कार्सनिोमा असे प्रमुख प्रकार असतात. गर्भाशयाच्या मधल्या स्तरात म्हणजे मांसपेशीच्या भित्तीमध्ये निर्माण होणाऱ्या कॅन्सरचे प्रमाण कमी असून यांना सार्कोमा म्हटले जाते. याचे लियोमायो सार्कोमा, स्ट्रोमल सार्कोमा हे प्रमुख प्रकार आहेत.
सुश्रुताचार्याना त्र्यावर्ता योनीला शंखनाभीची म्हणजे शंखाच्या आतील भागाची उपमा दिली असून तिच्या तिसऱ्या आवर्तास म्हणजे स्तरास गर्भशय्या (गर्भाशयाची अंत:त्वचा) म्हटले आहे. दर महिन्याला मासिक पाळीच्या वेळी गर्भाशयाच्या अंत:त्वचेतून स्रवणारा रजस्राव म्हणजे आर्तव हा रसधातूचा उपधातू असल्याने रसधातूची व आर्तवाची दुष्टी करणारा, अपान वायूची विकृती निर्माण करणारा चुकीचा आहार-विहार, बीजदोष व प्राक्तन म्हणजे दैव ही चरकाचार्यानी त्र्यावर्ता योनीच्या व्याधींची कारणे सांगितली आहेत. यात श्रीखंड-पेढे-बर्फी-बदाम-काजू-मांसाहार असे पचण्यास अतिशय जड पदार्थ, केळे-पेरू-किलगड असे अतिशय थंड पदार्थ, फरसाण-वडा-भजी असे तळलेले अतिस्निग्ध पदार्थ असा रसधातूची दुष्टी करणारा; हिरव्या मिरचीचा ठेचा  गरम मसाल्याचे पदार्थ असे अतिशय तिखट पदार्थ, अतिशय कडू व तुरट चवीचे पदार्थ, वाटाणा-पावटा-वाल-छोले-राजमा-बेसन असे तुरट चवीचे व रूक्षता निर्माण करून अपान वायूची दुष्टी करणारे आहारीय पदार्थ अधिक प्रमाणात व वारंवार सेवन करणे ही आहारीय कारणे, रसदुष्टी व वातदुष्टी करणारी अतिचिंता, व्यसने, अतिश्रम, जागरण, दिवसा झोपण्याची सवय ही विहारीय व मानसिक कारणे यांचा समावेश होतो.
आधुनिक वैद्यकशास्त्राने रजोनिवृत्तीच्या काळात इस्ट्रोजेन व प्रोजेस्टोरॉन या हार्मोन्समधील संतुलन बिघडणे हे गर्भाशयाच्या कॅन्सरचे महत्त्वाचे कारण सांगितले आहे. त्यामुळे रजोनिवृत्ती काळातच म्हणजे साधारण, ५० वर्षांच्या आसपास गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची संभावना अधिक असते. तसेच संततिनिरोधासाठी, रजोनिवृत्ती काळातील दुखण्यांची तीव्रता कमी व्हावी यासाठी तसेच स्तनाच्या कॅन्सरमध्ये दीर्घकाळ हार्मोनल चिकित्सा घेणे यामुळेही गर्भाशयाच्या कॅन्सरची शक्यता वाढते. याशिवाय स्तन किंवा स्त्री बीजकोषाचा कॅन्सर, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, नॉनपॉलिपोसिस प्रकारच्या आतडय़ांच्या कॅन्सरची आनुवंशिकता, अन्य प्रकारच्या कॅन्सरसाठी उदरावर रेडिओथेरपी घेतली असणे, एकदाही गर्भधारणा न होणे, पहिली रजप्रवृत्ती लहान वयात सुरू होऊन रजोनिवृत्ती उशिरा होणे, आहारात स्निग्ध पदार्थाचा अधिक वापर, शरीरास पुरेसा व्यायाम न होणे, स्थौल्य, मधुमेहाचा इतिहास ही गर्भाशयाच्या कॅन्सरची संभाव्य कारणे आहेत.
दोन रजप्रवृत्तीच्या मध्ये किंवा रजोनिवृत्तीनंतरही योनिगत रक्तस्राव होणे, रजप्रवृत्तीसमयी अधिक प्रमाणात व अधिक दिवस रक्तस्राव होणे, योनिगत पिच्छिल दरुगधी स्राव अधिक प्रमाणात होणे, ओटीपोटात दुखणे, पोटात गाठ जाणवणे, वजन कमी होणे ही गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात. गर्भाशयाचा कॅन्सर बळावल्यास पोटातील आजूबाजूच्या लसिका ग्रंथीमध्ये, वपावहन (ओमेंटम), यकृत-फुप्फुस-अस्थि-मस्तिष्क या अवयवांत पसरण्याची संभावना असते. रुग्णांचे उदरपरीक्षण, गर्भाशयाच्या अंत:त्वचेची बायॉप्सी, डी. अ‍ॅण्ड सी., योनीमाग्रे केलेली सोनोग्राफी, सी.टी.स्कॅन, एम.आर.आय., पेट स्कॅन, सी.ए. १२५ ही रक्त तपासणी याद्वारे गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान, स्टेज व ग्रेड निश्चित होते.
आधुनिक वैद्यकशास्त्रात गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी शस्त्रकर्माने पूर्णत: गर्भाशय निर्हरण, रेडिओथेरपी, केमोथेरपी व हॉर्मोनल चिकित्सा या उपलब्ध चिकित्सा आहेत. आयुर्वेदानुसार रसधातूच्या शुद्धीसाठी शतावरी; आर्तव शुद्धीसाठी पद्मक (कमळ), अनंता, प्रवाळ, नवायास लोह; मांसधातू सक्षम करण्यासाठी चंद्रप्रभा वटी; अपान वायूच्या अनुलोमनासाठी गंधर्व हरितकी; तसेच कुष्मांडावलेहासारखी रसायन चिकित्सा; वातदोषासाठी बस्ती व रसधातूसाठी वमन हे पंचकर्म उपक्रम कॅन्सरच्या अपुनर्भवासाठी उपयुक्त ठरतात. नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोडीला आहार-निद्रा व ब्रह्मचर्य या आयुर्वेदोक्त आयुष्यवर्धक तीन उपस्तंभांचे पालन हे या प्रकारच्या कॅन्सरच्या प्रतिबंधासही निश्चितच लाभदायी ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uterine cancer
First published on: 16-09-2014 at 06:39 IST