दिमाखदार सुरुवातीनंतर बलाढय़ चेन्नई सुपर किंग्सची विजयी लय हरवली आहे. आठव्या हंगामात बाद फेरी गाठण्यासाठी चेन्नईची किंग्ज इलेव्हन पंजाबशी लढत आहे. तूर्तास चेन्नईचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. चेन्नईने १३ पैकी ८ लढती जिंकल्या आहेत. गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या पंजाबला नमवत बाद फेरीतले स्थान पक्के करण्याचा चेन्नईचा निर्धार आहे.
धडाकेबाज फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलम न्यूझीलंड संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. त्याच्या अनुपस्थितीत अनुभवी माइक हसी सलामीवीराच्या भूमिकेत संघात दाखल होऊ शकतो. भरवशाच्या सुरेश रैनाला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. फॅफ डू प्लेसिस आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. ड्वेन ब्राव्होचा अष्टपैलू खेळ ही चेन्नईसाठी जमेची बाजू आहे. अनुभवी आशीष नेहराने धावा रोखणे आणि बळी मिळवणे या दोन्ही आघाडय़ांवर संघाला तारले आहे. मोहित शर्मा, ईश्वर पांडे यांच्याकडून सातत्याची अपेक्षा आहे. रवीचंद्रन अश्विन, पवन नेगी आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाकडून संघव्यवस्थापनाला मोठय़ा अपेक्षा आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी यंदाचा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला आहे. सर्व प्रमुख खेळाडूंना आलेले अपयश पंजाबला गुणतालिकेत तळाशी स्थान मिळवून देण्यास कारणीभूत ठरले आहे. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला फलंदाजीबरोबर गोलंदाजीमध्येही सूर गवसलेला नाही.

वेळ- दुपारी ४.०० वा. पासून
थेट प्रक्षेपण- सोनी मॅक्स, सोनी सिक्स.