आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची झाडाझडती सुरू असताना बरेच खळबळजनक गौप्यस्फोट पुढे यायला लागले असून यामध्ये एस. श्रीशांत चोहोबाजूंनी अडकत चालल्याचे चित्र आहे. खेळाडूंना फिक्सिंग करण्यासाठी फक्त पैसे नाही तर महागडय़ा गाडय़ा, ललना पुरवल्या जायच्या, हे दस्तुरखुद्द श्रीशांतने कबूल केले आहे. तर दुसरीकडे श्रीशांतबरोबर प्रदीर्घ बातचीत करणारी ‘ती’ अभिनेत्री मुंबई पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे. या तिन्ही दोषी खेळाडूंची तक्रार दाखल केल्यानंतर राजस्थान रॉयल्सने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करत एक पाऊल पुढे टाकले आहे. दरम्यान, अजित चंडिलाच्या घरी दोनदा छापे टाकून पोलिसांच्या हाती काहीच लागले नसले तरी सोमवारी त्याच्या नातेवाईकांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये २० लाख रुपयांची रोकड मिळाली आहे. दरम्यान, तीन आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असल्याने त्यांना कोठडीसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. त्या वेळी दिल्ली पोलिसांकडून आणखी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येण्याची शक्यता असून त्यांची मागणी मान्य होण्याची चिन्हे आहेत.