उपयुक्त फलंदाजी आणि चार बळी या पियूष चावलाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सला दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १३ धावांनी विजय मिळवता आला. संघाला धावांची गरज असताना युसूफ पठाणने दणकेबाज फलंदाजी केल्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सला १७१ धावा फटकावत्या आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चावलाने चार बळी मिळवत दिल्लीचे कंबरडे मोडले आणि त्यांचा डाव १५८ धावांमध्ये आटोपला.
कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरने ३ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४० धावांची खेळी साकारली. पण अन्य फलंदाजांना चांगली फलंदाजी न करता आल्याने त्यांना १५८ धावांवर समाधान मानावे लागले.
नाणेफेक जिंकत कोलकाताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांच्या फलंदाजांना लय मात्र सापडली नाही. ठराविक फरकाने त्यांचे फलंदाज बाद होत असताना युसूफ फलंदाजीला आला आणि त्याने कोलकाताच्या धावफलकाची गती वाढवली. २४ चेंडूंमध्ये त्याने प्रत्येकी तीन चौकार आणि षटकार लगावत ४२ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्याच्या या खेळीमुळेच संघाला दिडशे धावांचा पल्ला सहज गाठता आला. युसूफ बाद झाल्यावर जोहान बोथाने पाच चेंडूंमध्ये चार चौकार लगावत नाबाद १७ धावांची अतिजलद खेळी साकारल्यामुळे कोलकाताला १७१ धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ७ बाद १७१ (युसूफ पठाण ४२, रॉबिन उथप्पा ३२; युवराज सिंग १/१४) विजयी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ६ बाद १५८ (श्रेयस अय्यर ४०; पियूष चावला ४/३२).
सामनावीर : पियूष चावला.