भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असे बिरूद मिरविणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याच्या चेन्नई सुपर किंग्जला चेपॉक मैदानावर सहज पराभूत करीत पुणे वॉरियर्सने अपेक्षा उंचावल्या आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी गहुंजेच्या सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात पुण्याचा संघ हैदराबाद सनरायजर्सविरुद्ध पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक आहे.
चेन्नईतील सामन्यात कर्णधार अँजेलो मॅथ्यूज खेळू शकला नव्हता. तसेच दुखापतीमुळे युवराज सिंगही सहभागी झाला नव्हता. त्यांच्या अनुपस्थितीत रॉस टेलरने कर्णधाराची धुरा यशस्वीरीत्या हाताळताना चेन्नईवर सनसनाटी विजय मिळविला. टेलर याची या स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरी निराशाजनक झाली असली तरी त्याने ‘धोनी ब्रिगेड’वर मात करताना अतिशय कल्पकता दाखविली आहे. अँजेलो संघात परतल्यास मनीष पांडेला वगळले जाण्याची शक्यता आहे. युवराज तंदुरुस्त झाला तर अभिषेक नायरला विश्रांती द्यावी लागेल. नायर व पांडे यांना आतापर्यंत अपेक्षेइतकी चमक दाखविता आलेली नाही. आरोन फ्लिंच व स्टीव्हन स्मिथ हे पुण्याच्या विजयाचे हुकमी एक्के ठरले आहेत. बुधवारीही त्यांच्याकडून त्याच कामगिरीची अपेक्षा आहे.
चेन्नईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडणाऱ्या भुवनेश्वर कुमारवरच पुण्याच्या गोलंदाजीची मदार आहे. त्याला मिचेल मार्श व अशोक दिंडा या द्रुतगती गोलंदाजांची तसेच फिरकी गोलंदाज राहुल शर्मा यांची साथ मिळेल अशी आशा आहे.
पुण्याविरुद्ध घरच्या मैदानावर हैदराबादने सहज विजय मिळविला होता. डेल स्टेन हे हैदराबादच्या गोलंदाजीचे मुख्य अस्त्र आहे. त्याच्याबरोबरच इशांत शर्मा, थिसारा परेरा हे दोन्ही द्रुतगती गोलंदाज, फिरकी गोलंदाज अमित मिश्रा यांना आतापर्यंत चांगले यश लाभले आहे. गहुंजेची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला पोषक मानली जात असल्यामुळे स्टेन, शर्मा व परेरा यांना येथे प्रभाव दाखविण्याची चांगली संधी आहे.
फलंदाजीत कर्णधार कुमार संगकारा, कॅमेरून व्हाइट, पार्थिव पटेल यांच्यावर हैदराबादची भिस्त आहे. त्यांच्याबरोबरच रवी तेजा व थिसारा परेरा यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
दोन्ही संघांनी आयपीएलच्या सहाव्या पर्वात आतापर्यंत प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत. हैदराबादने तीन सामने जिंकले आहेत तर पुण्याने दोन सामने जिंकले आहेत.
सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.पासून.