आयपीएलमधील सामन्यांवर असलेले मॅच फिक्सिंगचे मळभ दूर होण्याची चिन्हे नाहीत. दोन वर्षांपूर्वी राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाला असतानाच आता याच संघातील एका खेळाडूने आपल्याला सामना निश्चितीसाठी पैसे देण्याची ऑफर आल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली आहे. मुंबईस्थित या खेळाडूने त्याला देण्यात आलेली ऑफर धुडकावून लावत यासंबंधात थेट ‘बीसीसीआय’कडे माहिती दिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
रणजी सामन्यातील सहकारी खेळाडूकडून आपल्याला ही ऑफर देण्यात आली होती, अशी माहिती त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. ऑफर देणारा खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नाही. मात्र, गेल्या महिन्यात रणजी सामन्यांवेळी ड्रेसिंग रूममध्ये आपल्याला त्याच्याकडून सामना निश्चित केल्यास पैसे देण्याचे आमीष दाखविण्यात आल्याचे राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूने म्हटले आहे. सुरुवातीला संबंधित खेळाडू आपली चेष्टा करतोय, असे मला वाटले. मात्र, ही पैसे कमविण्याची संधी असल्याचे वक्तव्य त्याने केल्यानंतर हा विषय गंभीर असल्याचे मला जाणवले आणि त्यानंतर आपण संघ व्यवस्थापनाकडे त्यासंदर्भात माहिती दिल्याचे राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूने सांगितले.
दरम्यान, यासंदर्भात ‘बीसीसीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रवि सवानी यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.
२०१३ मधील आयपीएलच्या सामन्यांवेळी स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांवरून एस. श्रीशांत याला अटक करण्यात आली होती. ‘बीसीसीआय’च्या माजी अध्यक्ष एन. श्रीनिवास यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांच्यावरील बेटिंगचे आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.