सामना मुंबईच्या संघाचा, तोही घरच्या मैदानात, वानखेडेवर आणि प्रतिस्पर्धी संघातील मुख्य खेळाडू मुंबईकरच, असा एक योगायोग शुक्रवारच्या सामन्यात पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमनेसामने येणार असून यामध्ये कोणता मुंबईचा खेळाडू बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. यापूर्वीच्या सामन्यात राजस्थानने मुंबईला पराभूत केले होते, त्यामुळे या सामन्यात मुंबईचा संघ पराभवाची सव्याज परतफेड करतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
वानखेडेवरील गेल्या सामन्यामध्ये मुंबईने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले होते. या सामन्यात मुंबईने १५७ धावा करत हैदराबादचा गोलंदाजीच्या जोरावर पराभव केला होता. मिचेल मॅक्लघन आणि लसिथ मलिंगा यांनी या सामन्यात भेदक मारा करत
संघाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात सलामीवीर लेंडल सिमन्सने अर्धशतकी खेळी साकारली
होती. फलंदाजीमध्ये कर्णधार रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड असे दर्जेदार फलंदाज असले तरी त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
राजस्थानच्या संघाचा विचार केला तर अजिंक्य रहाणे, प्रवीण तांबे आणि धवल कुलकर्णी हे तिन्ही मुंबईकर चांगली कामगिरी करत आहेत. अजिंक्य तर राजस्थानच्या फलंदाजीचा कणा आहे. शेन वॉटसन आणि स्टीव्हन स्मिथ यांना अजूनही आपली छाप पाडता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये टीम साऊदी आणि ख्रिस मॉरिस चांगली कामगिरी करताना दिसत आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), कोरे अँडरसन, एडन ब्लिझार्ड, जसप्रीत बुमराह, उन्मुक्त चंद,  आरोन फिंच, श्रेयस गोपाळ, हरभजन सिंग, जोश हेझलवूड, सिद्धेश लाड, मिचेल मॅक्लेघान, लसिथ मलिंगा, अभिमन्यू मिथुन, प्रग्यान ओझा, पार्थिव पटेल, कीरेन पोलार्ड, अंबाती रायुडू, लेंडल सिमन्स,  विनय कुमार.
राजस्थान रॉयल्स : शेन वॉटसन (कर्णधार), अंकित शर्मा, ब्रेनडर स्रान, रजत भाटिया, स्टुअर्ट बिन्नी, बेन कटिंग, जेम्स फॉकनर, दीपक हुडा, धवल कुलकर्णी, ख्रिस मॉरिस, करुण नायर, अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, टिम साऊदी, प्रवीण तांबे.

*सामन्याची वेळ : रात्री ८.०० वा. पासून
*थेट प्रक्षेपण : सोनी मॅक्स आणि सोनी सिक्स वाहिनीवर.