BLOG: जय जयवर्धने आणि लगोरी सम्राट!

आयपीएलच्या सहाव्या पर्वास स्टंपतोड सुरूवात झाली. पहिल्याच चेंडूवर ब्रेटलीच्या कमाल आऊटस्वींगवर उन्मुक्त चंद धारातीर्थी पडला. एवढय़ा वेगात एवढय़ा अचूकतेचा आऊटस्वींगर पाहून वकार युनूस आठवला.

आयपीएलच्या सहाव्या पर्वास स्टंपतोड सुरूवात झाली. पहिल्याच चेंडूवर ब्रेटलीच्या कमाल आऊटस्वींगवर उन्मुक्त चंद धारातीर्थी पडला. एवढय़ा वेगात एवढय़ा अचूकतेचा आऊटस्वींगर पाहून वकार युनूस आठवला. परवाच टेस्टमॅचमध्ये रॉस टेलरला क्रिस ब्रॉडचा आणि स्टीवस्मीथला भुवनेशकुमारचा असा बॉल पडला होता. बॅटपर्यंत येताना तो बॉल इनकमिंग दिसत असतो आणि पिचवर पडल्यावर किंचित बाहेर गेला. चेंडूने क्षणार्धात बदलेली लाईन फलंदाजाला लोटांगण घालायला लावते आणि प्रेक्षकांसाठी तो वेड लावणारा क्षण असतो. फलंदाजाला त्रिफळाबाद करणं, हे गोलंदाजाच स्वप्नं असतं आणि स्टंप तुटला, तर ती स्वप्नात लागलेली लॉटरी असते.
डेव्हीड वॉर्नरने क्षेत्ररक्षकांकडे एकदा नजर फिरवली. अश्विन क्षेत्ररक्षकांत दिसला नाही म्हटल्यावर त्याने टाकलेला सुस्कारा स्पष्ट ऐकू आला. जॅक कॅलिसच्या इंजिनातली वाफ मात्र संपत आल्यासारखी दिसते.
जयवर्धने हा जगातील सर्वांत कलात्मक; पण सर्वात कमी गौरवांकित खेळाडू. इतर फलंदाजांपेक्षा त्याचा क्लास अनेक प्रकाशवर्षे पुढे आहे. तो प्रत्येक बॉल इतका कमालीचा लेट खेळतो की तितका लेट सलमानपण सेटवर येत नाही. अनेक चेंडू तर त्याने अक्षरश: विकेटकिपरकडे पोहोचत असताना थर्डमॅन आणि फाईनलेगला पाठवले. तो भारताकडून खेळत असता, तर त्याच्या जागोजागी महाआरत्या, पाद्यपूजा झाल्या असत्या.
सुनील नरिन या लगोरी सम्राटाबद्दल काय बोलावे? मागे एकदा मुरलीधरनची अ‍ॅक्शन बघून बिशनबेदी म्हणाला होता की याला ऑलिंपिकला भालाफेकीकरता पाठवला पाहिजे. त्याच न्यायाने सुनील नरिन हा लगोरीसम्राट आहे. आयसीसीच्या पंधरा अंशाच्या नियमात त्याची अ‍ॅक्शन कशी बसते? पण आयसीसीने कोणत्याच देशाला दुखवायचे नाही, असे ठरवलेले दिसते. नाहीतर ८० टक्के ऑफ स्पीनर्स घरीच बसतील. सकलेन मुश्ताक आणि त्याचे पाकिस्तानातील फेकी वंशज (अजमल, मलिक, हफीज) हे तर बेरोजगारच होतील. तात्पर्य नरिनने काढलेल्या विकेटस आम्ही खऱ्या मानत नाही. एकतर त्याच्या केशरचनेला काय म्हणावे, हे कळत नाही. वेस्टइंडीजमध्ये मुंज झालेले बटू असे रहातात, अशी तूर्तास आम्ही समजूत करून घेतली आहे.
उमेश यादव, आशिष नेहरा, इरफान पठाण हे वर्षभर जायबंदी होऊन अचानक आयपीएलला फिट झाले. टेस्ट मॅचकरता उपलब्ध नव्हते. त्यांना पाहून मला काही पोलीस अधिकाऱ्यांची आठवण झाली. जे अट्टल गुन्हेगारांना पकडायचय म्हणलं की आजारी पडून घरी बसतात आणि संध्याकाळी टुणटुणीत होऊन बाहेर पडतात. यावर काहीतरी कायमचा तोडगा काढायला हवा. नाहीतर भारतीय टीमचं काही खरं नाही.
मॅच बघायला दस्तुरखुद्द शाहरूख खान आणि त्याची मुले असे पालकबालक उपस्थित होते. आनंद झाल्यावर शाहरूख गच्चीच्या टोकावर उभा रहातो आणि त्याची मुले त्याला मागे खेचतात. त्यामुळे बालक कोण आणि पालक कोण हा प्रश्न सुटतो. आपण क्रिकेटटीमचे कॅप्टन, हॉकीचे कोच, आर्मी चीफ, हॉर्वर्ड स्कॉलर सगळे सगळे आहोत, असं त्याला वाटत असत. पण ते सगळं सिनेमातल खोटं खोटं असतं, हे तो विसरतो. मागच्या वर्षी प्रेसबरोबरील सत्संगात त्याने
हजारो डॉलर्स मिळतात एका सिक्सरला
क्रिकेटमधले काय कळते गावसकरला
अशी ओवी गुंफली होती. काही श्रद्धाळू पत्रकारांनी डोळे मिटून, माना डोलावून भजन केले होते. बाकी शाहरूखचे लक्ष्मी प्रेम जुनेच आहे. खेळाडू निवडताना पण ते उतू जाते. लक्ष्मीपती बालाजी, लक्ष्मीरतन शुक्ला ही त्याचीच उदाहरणे होत.
जाता जाता पठाण बंधूबद्दल बोलायला हवं. एक भाऊ कोलकात्त्यात तर दुसरा दिल्लीच्या टिममध्ये. त्यामुळे काँग्रेस जिंको किंवा शिवसेना एक पद घरात राहातेच. (याला म्हणतात पश्चिम महाराष्ट्र स्ट्रॅटेजी) युसूफ पठाण म्हणजे बेफीकीर आणि उद्दामपणे च्युईंगगम चघळणारा काल इतका सौम्य आणि मृदु दिसला. मग कळले परवाच त्याचे लग्न झाले. त्याच्या टी शर्टवर ९९९ नंबर आहे. त्या करता त्याने आरटीओला किती पैसे दिले असतील?
sachoten@hotmail.com 

BLOG : आयपीएल फीवर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Blog on first win of kolkata knight riders in ipl season 6 by ravi patki