23 February 2019

News Flash

CSK च्या फायनलमधील कामगिरीच्या प्रश्नावर एमएस धोनीने शांतपणे दिले ‘हे’ उत्तर

भुवनेश्वर कुमारच्या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर फाफ डुप्लेसिसने लाँग ऑनला षटकार खेचला आणि वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जची एक भावनात्मक बाजू पाहायला मिळाली.

भुवनेश्वर कुमारच्या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर फाफ डुप्लेसिसने लाँग ऑनला षटकार खेचला आणि वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जची एक भावनात्मक बाजू पाहायला मिळाली. डुप्लेसिसच्या त्या षटकारामुळे चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या ११ व्या सीझनची अंतिम फेरी गाठली. विजयानंतर लगेचच डग आऊटमध्ये बसलेल्या चेन्नईच्या खेळाडूंनी मैदानावर धाव घेत डुप्लेसिस आणि शार्दुल ठाकूर या आपल्या सहकाऱ्यांना मिठी मारली.

चेन्नईसाठी हा विजय खास आहे कारण दोनवर्षाच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केलेल्या या संघाने थेट अंतिम फेरी गाठली. २०१३ च्या सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी सापडल्यामुळे या संघावर २०१५ मध्ये दोनवर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे २०१६ आणि २०१७ च्या मोसमात या संघातील खेळाडू पुणे आणि गुजरात संघाकडून खेळले.

प्रेक्षक गॅलरीत बसलेली सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्नी आणि चेन्नईच्या अन्य खेळाडूंच्या पत्नीच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद ओसांडून वाहताना दिसत होता. चेन्नईचा संघ सातव्यांदा तर महेंद्रसिंह धोनी आठव्यांदा आयपीएलची अंतिम फेरी खेळणार आहे. आयपीएलच्या ११ सीझनमध्ये सातवेळा अंतिम फेरी गाठणे खूप मोठी गोष्ट आहे.

संघातील अन्य खेळाडू विजयाच्या आनंदामध्ये हरवून गेले होते पण धोनी नेहमीप्रमाणे शांत आणि संयमी दिसत होता. सामन्यानंतर धोनीला प्रतिक्रिया विचारली असता त्याने सांगितले कि, फक्त प्लेऑफ जिंकून चालणार नाही, सीएसकेला पुढचा सामनाही जिंकावा लागेल. आठव्यांदा आयपीएलची फेरी गाठल्याबद्दल काय वाटते ? या संजय मांजरेकरच्या प्रश्नावर धोनी म्हणाला कि, आम्ही जिंकतो तेव्हा नेहमीच आनंद होतो. आयपीएलमधल्या पहिल्या दोन संघांना नेहमीच आणखी एक संधी मिळते.

धोनीने या आयपीएलमध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला ज्यामुळे संघाचा भरपूर फायदा झाला. त्याने अंबाती रायुडूला सलामीला पाठवले आणि रायुडूने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत ५८५ धावा केल्या आहेत. धोनी सुद्धा स्वत: उत्तम फॉर्ममध्ये असून त्याने या सीझनमध्ये ४५५ धावा केल्या आहेत.

 

First Published on May 23, 2018 9:36 am

Web Title: csk emotional after win over srh
टॅग Csk,Ipl,Srh