आयपीएलचे दहा हंगाम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर अकराव्या हंगामात क्रीडा प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मोसमाच्या मध्यावर प्रत्येक संघ मालकांना खेळा़डूंची अदलाबदल करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याआधी फुटबॉलमध्ये Mid-Season Transfer Window ही पद्धत प्रचलित होती, यानंतर अकराव्या हंगामात आयपीएलमध्येही या पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.

आयपीएलचा अकरावा हंगाम सध्या मध्यावर पोहचला असून, प्रत्येक संघाने आपल्या १४ सामन्यांपैकी जवळपास ७ सामने खेळले आहेत. प्रत्येक संघमालकाने काही खेळाडूंना कोट्यवधीची बोली लावत आपापल्या संघात समाविष्ट करुन घेतलं आहे. मात्र आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये ज्या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आलेली नाहीये, अशा खेळाडूंची अदलाबदल करण्याची संधी, Mid-Season Transfer Window माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

१) Mid-Season Transfer Window म्हणजे काय?
प्रत्येक संघ मालकांना आपल्या संघातील चांगली कामगिरी करणाऱ्या व फारसा प्रभाव न पाडू शकणाऱ्या खेळाडूंची यादी करुन त्यांची अदलाबादल करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून लिलावामध्ये ज्या खेळाडूंना आपल्या संघात घेता येणं शक्य झालं नाही, अशा खेळाडूंसाठी संघमालक पुन्हा एकदा प्रयत्न करु शकतात.

२) Mid-Season Transfer Window कधी सुरु होणार?
२९ एप्रिल ते १० मे या कालावधीदरम्यान Mid-Season Transfer Window ही सुविधा संघमालकांसाठी उपलब्ध राहणार आहे. या कालावधीत संघमालक खेळाडूंची अदलाबदल करु शकतात.

३) कोणत्या खेळाडूंची अदलाबदल केली जाऊ शकते?
Mid-Season Transfer Window साठी प्रत्येक खेळाडू उपलब्ध नसून काही ठराविक खेळाडूंसाठी ही सोय असणार आहे. ज्या खेळाडूंना आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये विशेष प्रभाव दाखवता आलेला नाहीये, त्याच खेळाडूंना Mid-Season Transfer Window चा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गंत कोणते खेळाडू पात्र असणार आहेत याची माहिती घेऊयात…

  • आंतरराष्ट्रीय व प्रथम श्रेणी दर्जाचे खेळाडू
  • २८ व्या सामन्यानंतर २ पेक्षा कमी सामने खेळणारे आंतरराष्ट्रीय खेळाडूच या योजनेअंतर्गत अदलाबदल होऊ शकतात
  • प्रथम श्रेणी दर्जाचे सर्व खेळाडू अदलाबदलीसाठी पात्र ठरले आहेत
  • ज्या दोन संघमालकांमध्ये खेळाडूंची देवाण घेवाण होणार आहे, त्या दोन्ही संघांचं यासाठी एकमत होणं गरजेचं आहे.

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने नमूद केलेल्या नियमांनुसार सध्याच्या घडीला, अॅलेक्स हेल्स, जेपी ड्युमिनी, फाफ डु प्लेसिस, टिम साऊदी, ईश सोधी यासारखे खेळाडू Mid-Season Transfer Window च्या माध्यमातून दुसऱ्या संघासाठी खेळताना दिसू शकतात. आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही या घडामोडींना आपला दुजोरा दिला आहे.