चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १३ धावांनी विजय मिळवला. रिषभ पंतची ७९ धावांची खेळी आणि विजय शंकर याची ५४ धावांची खेळीही दिल्लीच्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. चेन्नईने दिल्लीसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र ते पार करताना दिल्लीच्या फलंदाजांचे प्रयत्न काहीसे कमी पडले असेच दिसून आले. हा सामना काहीसा चुरशीचा झाला. मात्र दिल्लीला अखेर चेन्नईपुढे गुडघे टेकावे लागले.

मुंबईविरुद्धचा सामना गमावल्यानंतर चेन्नईने दिल्लीविरुद्ध २० षटकात २११ धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीला सामना जिंकण्यासाठी २१२ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. मात्र ते गाठणं दिल्लीच्या टीमला शक्य झालं नाही.  पहिल्या चेंडूपासून चेन्नईच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करुन दिल्लीच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. मात्र डु प्लेसी – वॉटसन जोडी फुटल्यानंतर दिल्लीने काही काळ सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला, मात्र धोनी-रायडू जोडीने दिल्लीच्या प्रयत्नांवर पाणी फिरवलं.

दिल्लीकडून अमित मिश्रा, विजय शंकर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. सामना जिंकण्यासाठी दिल्लीला पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळी करावी लागणार आहे. श्रेयस अय्यरने याआधीच्या सामन्यात आक्रमक खेळी करुन आपली चुणूक दाखवून दिली होती.

  • ग्लेन मॅक्सवेल रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत, दिल्लीचा चौथा गडी माघारी
  • ठराविक अंतराने श्रेयस अय्यर चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद, दिल्लीला तिसरा धक्का
  • आसिफच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या नादात मुनरो बाद, दिल्लीचा दुसरा गडी माघारी
  • कॉलिन मुनरो – पृथ्वी शॉ जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • फटकेबाजी करण्याच्या नादात पृथ्वी शॉ माघारी, दिल्लीला धक्का. केएम आसिफला मिळाली विकेट
  • दिल्लीची सावध सुरुवात, पृथ्वी शॉचे दोन सुरेख चौकार
  • २० षटकांत चेन्नईची २११ धावांपर्यंत मजल, दिल्लीला विजयासाठी २१२ धावांचं आव्हान
  • अंबाती रायडू – महेंद्रसिंह धोनीची फटकेबाजी, चेन्नईने ओलांडला २०० धावांचा टप्पा
  • ठराविक अंतराने शेन वॉटसन माघारी, चेन्नईला तिसरा धक्का
  • ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर सुरेश रैना बाद, चेन्नईला दुसरा धक्का
  • चेन्नईला पहिला धक्का, विजय शंकरच्या गोलंदाजीवर फाफ डु प्लेसिस माघारी
  • दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी
  • चेन्नईने गाठला १०० धावांचा टप्पा
  • शेन वॉटसनचं आक्रमक अर्धशतक, फाफ डु प्लेसिसची वॉटसनला उत्तम साथ
  • चेन्नईने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा
  • शेन वॉटसन – फाफ डु प्लेसिस जोडीकडून चेन्नईच्या डावाची आक्रमक सुरुवात
  • दिल्लीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय