18 January 2019

News Flash

पोलार्ड नेहमीच आमचा तारणहार, रोहित शर्माने केलं कौतुक

अतिशय रंगतदार अशा या सामन्यात मिळालेल्या विजयाचं श्रेय रोहितने कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना दिलं.

कायरन पोलार्ड

आयपीएलच्या ११ व्या हंगामात मुंबईच्या संघाचं भवितव्य काय असणार अशी अनेकांनाच शंका असताना गेल्या काही सामन्यांमध्ये संघाला मिळणारं यश पाहता या शंका काहीशा कमी झाल्या आहेत. बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये मुंबईच्या संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघावर ३ धावांनी विजय मिळवला आणि प्ले ऑफसाठी या संघाच्या हाती आणखी संधी असल्याचं स्पष्ट झालं. मुख्य म्हणजे घरच्याच मैदानावर मिळालेल्या या विजयामुळे संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानेही सुटकेचा नि:श्वास सोडला असं म्हणायला हरकत नाही. अतिशय रंगतदार अशा या सामन्यात मिळालेल्या विजयाचं श्रेय रोहितने कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना दिलं. पोलार्डच्या अर्धशतकी खेळीनं मुंबईच्या धावसंख्येत महत्त्वाची भूमिका बजावली हेसुद्धा रोहितने स्पष्ट केलं.

आपल्या संघातील खेळाडूंचं कौतुक करत रोहितने त्यांची भूमिका या विजयासाठी किती महत्त्वाची ठरली हे सर्वांसमोर स्पष्ट केलं. वेस्ट इंडिज संघातील खेळाडू कायरन पोलार्ड हा मुंबईच्या संघासाठी बऱ्याचदा तारणहार होतो हे क्रिकेट रसिकांचच नव्हे, तर खुद्द रोहितचंही म्हणणं आहे. पोलार्डचं कौतुक करत रोहित म्हणाला, ‘पोलार्ड नेहमीच आमच्यासाठी सामना जिंकवून देणारा एक हक्काचा खेळाडू ठरला आहे. त्याला काही काळ संघाबाहेर ठेवणं हा निर्णय खरंच खूप कठीण होता. पण, त्याला पुन्हा संघात घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे, असं आम्ही ठरवलं. पोलार्डनेही या सर्व गोष्टी सार्थ ठरवल्या. मुख्य म्हणजे संघातून वगळल्यामुळे त्याचीही निराशा झाली होती. पण, आज त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे ते पाहता त्याने पुन्हा एकदा आपलं कौशल्य सर्वांनाच दाखवून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे, असंच म्हणावं लागेल.’

वाचा : IPL 2018 – शिक्षणासाठी मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूने सोडलं क्रिकेट

मुंबई आणि पंजाबच्या संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात यजमान मुंबईच्या संघाने पंजाबसमोर १८७ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ज्याचा पाठलाग करणाऱ्या पंजाबच्या संघाला मुंबईच्या गोलंदाजांनी १८३ धावांवर रोखलं आणि हा सामना खिशात टाकला. या विजयानंतर गुणतालिकेमध्ये मुंबईचा संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे आता यंदाच्या आयपीएलमध्ये पुढील सर्व सामन्यांमध्ये चांगलीच रंगत पाहायला मिळणार हे मात्र खरं.

First Published on May 17, 2018 8:41 am

Web Title: kieron pollard did what he does best says rohit sharma as mi wins over kxip ipl 11