आयपीएलच्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्स इलेव्हन पंजाब संघावर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो वादळी खेळी करणारा फलंदाज कृणाल पांडया. सामना नाजूक वळणावर असताना त्याच्या १२ चेंडूत केलेल्या ३१ धावांच्या खेळीने सामना पूर्णपणे पलटला आणि कृणालने लोकांची वाहवा मिळवली. पण त्याला ही वादळी खेळी करण्यासाठी बळ कुठून मिळालं असेल? असा प्रश्नदेखील चाहत्यांना पडला. या प्रश्नांचं उत्तर स्वतः कृणालनेच दिलं.

सामना जिंकल्यानंतर कृणाल पांड्याने पत्रकार परिषदेत पत्रकारमित्रांशी दिलखुलास संवाद साधला. त्यावेळी अशी वादळी खेळी करण्यासाठी त्याला प्रेरणा आणि बळ कुठून मिळालं, यामागचं गुपित कृणालने सांगितलं.

कृणाल म्हणाला की पंजाब संघाविरुद्ध झालेला सामना हा आमच्यासाठी करो या मरो पद्धतीचा होता. हा सामना जिंकण्यावाचून आम्हाला पर्यायच नव्हता. पण सर्वात महत्वाचे म्हणजे बंगळुरूबरोबर झालेल्या सामन्यात मी चांगली खेळी करू शकलो नव्हतो. त्याची सल मनात होती आणि म्हणूनच मी वादळी खेळी करू शकलो.

रोहित शर्माने १७व्या षटकात मुजीबला २ षटकार खेचले. नंतर १८व्या षटकातही त्याने तडाखेबाज फटके मारले. त्यामुळे सामन्याला गती मिळाली. त्याच गतीवर स्वार होऊन मीदेखील फटकेबाजी केली. माझ्या कालच्या खेळीवर मी खूप आनंदी आहे. पण मागच्या सामन्यात मात्र चांगली खेळी न केल्यामुळे मी थोडासा निराश झालो होतो, असं त्यानं कबुल केलं.

आमच्या संघाची फलंदाजी खूप चांगली आणि लवचिक आहे. कोणताही फलंदाज कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो आणि चांगली कामगिरी करू शकतो,ही आमच्यासाठी समाधानी बाब आहे, असं पण तो म्हणाला.

कालच्या सामन्यातील विजयानंतर मुंबईचे प्ले-ऑफसाठीचे जिवंत आहे. कालच्या विजयाने मुंबईला ५ गुणतक्त्यात ५व्या क्रमांकावर पोहोचवले आहे. आता मुंबईचा पुढचा सामना ६ मे रोजी कोलकात्याशी होणार आहे.