बंगळुरू आणि हैदराबाद या दोन संघांमध्ये गुरुवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात बंगळुरूने २१८ धावा ठोकल्या. तर या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने २०४ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात धावांचा पाऊस पडला. सामन्यात एकूण ४२२ धावा करण्यात आल्या. निश्चितच त्याची झळ गोलंदाजांना बसली. मात्र या सामन्यात एक अशी गोष्ट घडली जी गोष्ट या आधी घडलेली नव्हती.

या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांना चांगलाच मार पडला. मात्र त्यात गोलंदाज बासील थम्पीने केवळ चार षटकात तब्बल ७० धावा खर्चिल्या. आयपीएलच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा देण्याचा थम्पीने विक्रम केला. या आधी हैदराबाद संघाकडून खेळताना इशांत शर्माने सर्वाधिक ६६ धावा दिल्या होत्या. २०१३ साली झालेल्या आयपीएलमध्ये हा अजब विक्रम झाला होता. चैन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याला मार पडला होता. त्यानंतर कालच्या सामन्यात हा विक्रम मोडीत निघाला.

थम्पीने एकूण ७० धावा दिल्या. मात्र त्याला बंगळुरूचा एकही गडी बाद करता आला नाही. या सामन्यात हैदराबादकडून ३ गोलंदाजांनी, तर बंगळुरूकडून २ गोलंदाजांनी ४० किंवा त्यापेक्षा अधिक धावा दिल्या.