दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने भारताचा कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील त्याचा सहकारी विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विराट कोहली सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही असे डिव्हिलियर्सने म्हटले आहे.

२०११ पासून कोहली आणि डिव्हिलियर्स आरसीबीसाठी एकत्र खेळत आहे. आयपीएलच्या इतिहासात या दोन्ही स्टार क्रिकेटपटूंनी आपल्या फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना अनेक आनंदाचे क्षण दिले आहेत. आयपीएलमध्ये कोहली आणि डिव्हिलियर्सने दोनवेळा दोनशे धावांची भागीदारी केली आहे. ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये अशी विक्रमी भागिदारी करणारी जगातील ही एकमेव जोडी आहे.

आयपीएलमध्ये कोहलीच्या नावावर ४६१९ धावा आहेत तर डिव्हिलियर्सने ३५९५ धावा केल्या आहेत. २०१६ मघ्ये कोहलीने ९७३ धावा तडकवताना चार शतके ठोकली होती तर डिव्हिलियर्सने ६८७ धावा करताना एक शतक ठोकले होते.

नुकताच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. यावेळी कसोटी मालिकेत विराटने सर्वाधिक धावा केल्या. त्याखालोखाल डिव्हिलियर्स दुसऱ्या स्थानावर होता. दक्षिण आफ्रिकेत कोहलीने सहा वनडे सामन्यात ५५८ धावा केल्या. यामध्ये चार शतकांचा समावेश होता. या दौऱ्यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कोहलीने ८७१ धावा केल्या.