इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत आवश्यक क्षणी फटके बाजी करण्याऐवजी रंगत संपल्यानंतर मनोरंजक षटकार खेचणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या कामगिरीवर प्रचंड टीका झाली. सातव्या क्र मांकावर फलंदाजीला उतरल्याबद्दल धोनीवर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही तोफ डागली. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात धोनीचा फलंदाजीचा क्रम चेन्नईसाठी महत्त्वाचा ठरेल.

फलंदाजीचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या शारजा येथील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवाला प्रामुख्याने चेन्नईचा फिरकी मारा जबाबदार आहे. यात २०वे षटक तर राजस्थानसाठी अत्यंत महागडे ठरले होते. त्यानंतर फलंदाजांना विशेषत: मुरली विजय, के दार जाधव आणि धोनी यांना आपली भूमिका चोख बजावता आली नाही.

सॅम करन, जाधव आणि ऋतुराज गायकवाड यांना फलंदाजीला अग्रक्रमाने पाचारण करीत सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्याचा धोनीचा निर्णय चुकीचा ठरला, पण तरीही फॅफ डय़ू प्लेसिसने  कमी चेंडूंत अधिक धावांचे आव्हान पेलण्यासाठी हिमतीने लढा दिला. मात्र फटके बाजीची क्षमता असलेल्या धोनीने आपला फलंदाजीचा पवित्रा बदलला नाही. आता दीर्घ सीमारेषा असलेल्या दुबईच्या मैदानावर धोनीच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

सामना ‘टाय’ झाल्यानंतर ‘सुपर ओव्हर’चा थरार जिंकल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे.मोहित शर्मा, कॅगिसो रबाडा आणि आनरिख नॉर्किए यांच्यावर दिल्लीच्या वेगवान माऱ्याची धुरा आहे. शिम्रॉन हेटमायरला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे.

दिल्लीच्या फलंदाजीच्या फळीत पृथ्वी शॉ, शिखर धवन, ऋषभ पंत, कर्णधार श्रेयस अय्यर आणि मागील सामन्याचा नायक मार्कस स्टॉइनिस असे एकापेक्षा एक फलंदाज आहेत. चेन्नईच्या पीयूष चावला आणि रवींद्र जडेजा या अनुभवी गोलंदाजांची लय बिघडवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७:३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स  सिलेक्ट १

अश्विनबाबत साशंकता

रविचंद्रन अश्विनला झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे तो चेन्नईविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे दिल्लीला गोलंदाजीच्या माऱ्यात बदल करावा लागणार आहे. सराव सत्रानंतर फिजिओ पॅट्रिक फरहार्ट याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनी दिली. अश्विन अनुपलब्ध झाल्यास अनुभवी अमित मिश्रा हा अक्षर पटेलच्या साथीने फिरकी गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध आहे.