आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या सुरुवातीलाच चेन्नई सुपरकिंग्जचा संघ टीकेचा धनी बनतो आहे. सलग दोन सामन्यांतला पराभव, धोनीचं फलंदाजीसाठी उशीरा येणं आणि फलंदाज करत असलेली निराशा यामुळे चेन्नईचे चाहते सध्या नाराज आहेत. अनेक माजी खेळाडूंनीही धोनीच्या नेतृत्वशैलीवर टीका केली आहे. गरज असताना धोनी फलंदाजीसाठी उतरत नसल्याची चाहत्यांची तक्रार आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू अजय जाडेजाने धोनीच्या नेतृत्व क्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

दिल्लीविरुद्ध चेन्नई सुपरकिंग्जला १७६ धावांचं आव्हान होतं. या सामन्यातही धोनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. “मी पुन्हा तेच म्हणेन, धोनीच्या फलंदाजी क्रमाबद्दल मी समाधानी नाहीये. पाठीमागून लढून कोणतंही युद्ध जिंकलं जात नाही. लष्करात असं म्हटलं जातं की ज्यावेळी सैन्याचा जनरल मैदानावर उतरतो तेव्हा ते युद्ध संपल्याचं चिन्ह असतं. क्रिकेटमध्ये, जे खेळाडू सलामीला येऊन खेळत असतात त्यांच्याकडे युद्ध जिंकण्याची चांगली संधी असते. जर तुमच्याकडे असे शिपाई आहेत की जे स्वतःच्या जिवावर तुम्हाला जिंकवून देतील तर तुम्ही पाठीमागे राहून रणनिती आखू शकता. पण चेन्नईच्या बाबतीत असं काही दिसत नाहीये.” Cricbuzz संकेतस्थळाशी बोलताना जाडेजानं आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – IPL 2020 : गोलंदाजी आणि फलंदाजीत आमची कामगिरी चांगली होत नाहीये – धोनी

“आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी सध्या फक्त आयपीएल खेळतो आहे. जी तरुण पिढी त्याला आता खेळताना पाहत आहे त्यांच्यासाठी धोनीचं असं वाईट चित्र तयार व्हायला नको असं माझं मत आहे.” दिल्लीविरुद्धचा सामना संपल्यानंतर चेन्नईला ७ दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. २ ऑक्टोबर रोजी चेन्नईचा सामना सनराईजर्स हैदराबादविरुद्ध रंगणार आहे.