भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानं आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. “आता वेळ आली आहे जेव्हा बंगळुरूला कर्णधारपदासाठी विराट कोहलीच्या पुढे विचार करावा लागेल. जर बंगळुरूच्या टीम मॅनेजमेंटमध्ये आपण असतो तर विराटला कर्णधारपदावरून हटवलं असतं,” असं मत गंभीरनं व्यक्त केलं. २०१३ पासून बंगळुरूनं एकदाही आयपीएलची स्पर्धा जिंकली नाही, याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. परंतु २०१३ च्या आयपीएलच्या सामन्यांदरम्यान त्यांच्यात झालेला वाद हा अद्यापही कोणी विसरलेलं दिसत नाही.

विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांनीही क्रिकेटमध्ये दिल्लीच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यावेळी गंभीर जरी ज्येष्ठ खेळाडू असला तरी विराट एका सामन्यादरम्यान त्याच्याशी भिडल्याचं दिसलं होतं. आयपीएलच्या सहाव्या हंगामादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान सामना खेळवला जात होता. मॅच दरम्यान एका गोष्टीवरून गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला होता. मैदानावर झालेला हा असा वाद होता ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

मैदानावर घडलेल्या या घटनेनंतर माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात याची चर्चा धाली होती. तसंच गंभीर आणि कोहली यांच्यातील संबंधही चांगले नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु यावर नंतर गंभीरनं स्पष्टीकरण दिलं होतं. आयपीएलच्या सामन्यादरम्यान दोघांमध्ये जे वाद झाले त्यात व्यक्तीगत असं काहीही नव्हतं. जर पुन्हा तो विराट विरोधात मैदानावर उतरला असता तर पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असती असंही त्यानं स्पष्ट केलं होतं. मैदानावरील त्यांचा वाद पाहिल्यानंतर त्यांना दंडही ठोठावण्यात आला होता. मैदानावर गंभीरचा खेळ जितका उत्तम होता तितकाच गंभीर आक्रमकही होता. अनेकदा पाकिस्तानच्या खेळाडूंसोबतही तो मैदानावर भिडला होता.