आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दुसरा सामना आज दुबईत रंगणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्स संघासमोर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचं आव्हान असणार आहे. एकापेक्षा एक मातब्बर खेळाडूंमुळे दिल्ली संघ व्यवस्थापनासमोर संघात नेमकी कोणाला संधी द्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच यंदाच्या हंगामात अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन आश्विन हे दोन खेळाडू दिल्लीत दाखल झाले आहेत. अजिंक्य रहाणे गेल्या काही हंगामांपासून राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करत होता. पण यंदा दिल्लीकडून शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत यासारख्या खेळाडूंमुळे अजिंक्यला संघात स्थान मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.

दिल्लीच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींगने अजिंक्यला संघात स्थान मिळणार की नाही याबद्दल माहिती दिली. “अंतिम ११ साठी अजिंक्य हा पहिली पसंती नाहीये, पण त्याची तयारी चांगली झालेली आहे. मी गेल्या काही दिवसांपासून त्याच्यासोबत काम करतोय आणि टी-२० मध्ये फलंदाजी सुधारण्यासाठी त्याला मी काही टिप्स दिल्या आहेत. संघातील निवडीबद्दल मी त्याच्याशी बोललेलो आहे. पहिल्या सामन्यासाठी त्याचा नक्की विचार केला जाऊ शकतो पण खात्रीने काही सांगता येणार नाही.” पाँटींगने माहिती दिली.

दरम्यान पंजाबविरुद्ध पहिल्या सामन्याआधीच दिल्लीला मोठा धक्का बसला आहे. संघाचा महत्वाचा गोलंदाज इशांत शर्मा सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो सलामीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. असं झाल्यास दिल्ली इशांतच्या जागेवर कोणाला संधी देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : मंकडींग करुन स्पर्धा जिंकता येईल पण मनात पोकळ भावना तयार होते !