आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या संघासमोर लागलेलं शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीये. शारजाच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात चेन्नईने संघात ३ बदल केले. रोहित शर्माच्या जागेवर कर्णधारपदी आलेल्या पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनीही आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत चेन्नईच्या आघाडीच्या फळीतील ४ फलंदाजांना अवघ्या ३ धावांमध्ये माघारी धाडलं.

अवश्य पाहा – नाव मोठं, लक्षण… IPL मध्ये या खेळाडूंनी केली साफ निराशा

यानिमीत्ताने आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी धावा करुन ४ बळी गमावणाऱ्या संघांच्या यादीत आता चेन्नईचं नाव घेतलं जाणार आहे. पाहूयात आकडेवारी…

  • २/४ – कोची टस्कर्स केरळ विरुद्ध डेक्कन चार्जर्स – २०११
  • ३/४ – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स – २०२०*
  • ५/४ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स – २०१४

ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात सलामीवीर ऋतुराज गायकवाडला पायचीत करुन माघारी धाडलं. यानंतर अंबाती रायुडूही जसप्रीत बुमराहच्या आखुड टप्प्याच्या चेंडूच्या जाळ्यात अडकला. पाठोपाठ जगदीशन आणि फॉर्मात असलेला फाफ डु-प्लेसिसही माघारी परतल्यामुळे चेन्नईच्या समोरचं संकट अधिकच वाढलं. गुणतालिकेत चेन्नईचा संघ सध्या तळातल्या स्थानावर आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये एकाही सामन्यात पराभव झाल्यास चेन्नईचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल.

अवश्य वाचा – IPL 2020 : रोहित शर्माची दुखापत कितपत गंभीर?? मुंबई इंडियन्सने दिली माहिती