युएईमध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली. आयपीएलच्या सुरूवातीला चेन्नईच्या संघातील सपोर्ट स्टाप आणि खेळाडूंना मिळून १३ सदस्यांना करोनाची लागण झाली. यामध्ये दोन खेळाडूंचा समावेश होता. त्यातच भर म्हणून सुरेश रैना आणि हरभजन सिंह यांनी खासगी कारण देत स्पर्धेतून माघार घेतली. यामुळे सुरुवातीला चेन्नई संघाला संघ बांधणी करताना अनेक अडचणी आल्या. रैना आणि भज्जी यांची नावे सीएसके संघाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हटवण्यात आली आहेत.

इनसाइड स्पोर्टच्या एका रिपोर्ट्सनुसार, सुरेश रैना आणि हरभजन सिंह यांचा करार (कॉन्ट्रैक्ट) रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याबाबत इनसाइड स्पोर्टने संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. १३ व्या सत्रासाठी दोन्ही खेळाडूंना कराराचे पैसे दिले जाणार नाहीत. सीएसकेकडून रैनाला ११ कोटी तर भज्जीला २ कोटी रुपये या सत्रासाठी दिले जाणार होते. पण या हंगामासाठी सीएसकेकडून दोघांनाही पैसे मिळणार नाहीत. रैनाला ११ कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. तर २०१८ मध्ये भज्जीला दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.

सीएसकेने रैना आणि भज्जीसोबतचं कॉन्ट्रैक्ट रद्द केल्यानंतर इतर संघाने त्यांच्यासोबत करार केला तर पुढील हंगामात यांना खेळताना पाहू शकतो. पुढील वर्षी आयपीएलची लिलावप्रक्रिया होण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत यांना खरेदी करण्याची संधी छोट्या लिलावात मिळू शकते. आयपीएलमधील विक्रम पाहता सुरेश रैनाला कोणताही संघ घेण्यास तयार होऊ शकतो. मात्र, भज्जीचं वय पाहात तो अनसोल्डच राहू शकतो.