विजयी सलामीसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात आज झुंज

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

दुबई : इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटच्या (आयपीएल) रविवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात फिरकीपटूंचे द्वंद्व पाहायला मिळणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन्ही संघांकडे प्रतिभावान फिरकीपटूंचा भरणा असून यांपैकी कोणता संघ विजयी सलामी देण्यास यशस्वी होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीचे पारडे जड मानले जात आहे. जेसन रॉयने स्पर्धेतून माघार घेतली असली तरी शिम्रॉन हेटमायर, मार्कस स्टोयनिस, अ‍ॅलेक्स कॅरी असे धडाकेबाज विदेशी फलंदाज दिल्लीकडे उपलब्ध असून अय्यर, ऋषभ पंत आणि पृथ्वी शॉ यांच्या रूपात भविष्यातील तारेही त्यांच्या ताफ्यात आहेत. रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, संदीप लामिच्छाने असे दर्जेदार फिरकीपटू दिल्लीकडे असून ‘आयपीएल’मध्ये नेहमीच फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून आले आहे.

पंजाबकडे मुजीब-उर-रेहमान, रवी बिश्नोई, कृष्णप्पा गौतम असे नव्या दमाचे फिरकीपटू असून दिल्लीच्या फलंदाजांसाठी ते डोकेदुखी ठरू शकतात. यंदा प्रथमच पंजाबचे नेतृत्व के. एल. राहुलकडे सोपवण्यात आले असून फलंदाजीत त्याला धडाकेबाज ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मयांक अगरवाल यांची साथ लाभेल. मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉट्रेल यांच्या वेगवान जोडीवरही चाहत्यांचे लक्ष असेल.

अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या पंजाबने गेल्या तीनही वर्षांपासून सलामीचा सामना जिंकला आहे, त्यामुळे यंदाही चाहत्यांना त्याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल. त्याचबरोबर अय्यर आणि राहुल यांना भारताचे भविष्यातील कर्णधारपद मिळवण्यासाठी दावेदारी पेश करण्याची संधीही आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, हिंदी १ (दोन्ही एचडी वाहिन्यांवर)