शारजा क्रिकेट स्टेडियमवरच राजस्थान रॉयल्स द्विशतकी धावसंख्यांसह दोन विजय मिळवत इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) हंगामाला दिमाखदार प्रारंभ केला होता. परंतु अन्य मैदानांवर झालेल्या तीन सामन्यांत राजस्थानला पराभव पत्करावा लागला. पुन्हा शारजात आलेला राजस्थानचा संघ शुक्र वारी बलाढय़ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी उत्सुक आहे.

शारजात कमावलेले यश राजस्थानला तुलनेने मोठय़ा दुबई आणि अबू धाबीच्या मैदानांवर अबाधित राखता आले नाही. त्यामुळे सलग तीन सामन्यांत पराभव पत्करल्याने गुणतालिकेत सहाव्या स्थानावर त्यांची घसरण झाली आहे. याशिवाय सर्वोत्तम ११ खेळाडूंची संघबांधणी करण्यातही ते अपयशी ठरत आहेत. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स संघात परतल्यास त्यांना फायदा होऊ शकेल. परंतु तो सध्या विलगीकरणात असल्याने ११ ऑक्टोबरनंतरच उपलब्ध होऊ शकेल.

पहिल्या दोन सामन्यांत दिमाखात फटके बाजी करणारा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन सध्या धावांसाठी झगडत आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल, वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी आणि अंकित रजपूत यांना संधी दिली. परंतु राजस्थानचे नशीब मात्र पालटले नाही. जैस्वाल दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. याचप्रमाणे रजपूतने तीन षटकांत ४२ धावा दिल्या, तर त्यागीने ३६ धावांत एक बळी मिळवला. सलामीवीर जोस बटलरला सूर गवसला, हे राजस्थानच्या पथ्यावर पडू शकेल. बटलरने ४४ चेंडूंत ७० धावा केल्या.

गोलंदाजीत जोफ्रो आर्चर आणि टॉम करन यांच्यावर राजस्थानची मदार आहे. फिरकी गोलंदाज राहुल तेवातियाला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.

दुसरीकडे, पाच सामन्यांपैकी चार विजय मिळवणारा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ सर्वच आघाडय़ांवर सरस आहे. अय्यर, सलामीवीर पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत आपली भूमिका चोख बजावत आहेत. मार्कस स्टॉइनिसनेही दोन सलग अर्धशतके झळकावली आहेत.

गोलंदाजीत कॅ गिसो रबाडाने (१२ बळी) ‘आयपीएल’मधील गोलंदाजांच्या यादीत अग्रस्थान मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आनरिख नॉर्किएसुद्धा संघाच्या गरजेनुसार कामगिरी दाखवत आहे. इशांत शर्माच्या जागी संघात आलेल्या हर्षल पटेलने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध ३४ धावांत २ बळी मिळवून लक्ष वेधले, पण मुंबईविरुद्ध ४३ धावा दिल्याने तो महागात पडला. दुखापतीतून सावरल्यानंतर परतलेल्या रविचंद्रन अश्विनने २६ धावांत एक बळी घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

* सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ सिलेक्ट