पंजाबविरुद्धच्या लढतीत राजस्थानकडून बटलर सज्ज

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

शारजा : संजू सॅमसन स्वप्नवत सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे, तर जोस बटलर सज्ज झाल्यामुळे राजस्थान रॉयल्सची फलंदाजी आणखी भक्कम झाली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या किं ग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात चाहत्यांना आणखी एकदा षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे.

कुटुंबीयांसमवेत संयुक्त अरब अमिरातीमध्ये उशिराने दाखल झालेल्या बटलरला विलगीकरणाच्या नियमामुळे पहिल्या सामन्याला मुकावे लागले. मात्र रविवारी यशस्वी जैस्वालच्या साथीने तो डावाची सुरुवात करील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमवारीत स्टीव्ह स्मिथ त्याच्या तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकेल. याशिवाय टॉम करन आणि जोफ्रो आर्चरमुळे राजस्थान चार परदेशी खेळाडूंची स्थाने निश्चित करू शकेल.

युवा सॅमसनने चेन्नईच्या गोलंदाजांची लय बिघडवताना ३२ चेंडूंत वेगवान ७४ धावा केल्या. मग अखेरच्या षटकात आर्चरने चार षटकारांची लयलूट केली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या सामन्यात पंजाबने मिळवलेल्या ९७ धावांच्या दमदार विजयात के. एल. राहुलचे आघाडीवरील नेतृत्व महत्त्वाचे ठरले. या सामन्यात त्याने सात षटकारांची आतषबाजी करीत ६९ चेंडूंत नाबाद १३२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रि के टपटू ग्लेन मॅक्सवेल धावांसाठी झगडत आहे. पंजाबच्या गोलंदाजीची मदार प्रामुख्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेलवर आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७:३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स  सिलेक्ट १