दिल्लीविरूद्धच्या सामन्यात हैदराबादने तुफान फटकेबाजीच्या जोरावर दोनशेपार मजल मारली. डेव्हिड वॉर्नर, वृद्धिमान साहा या सलामीवीरांनी केलेली झंजावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी यांच्या बळावर हैदराबादने २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारली.

हैदराबादविरूद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. हैदराबादने केन विल्यमसनला संघात घेत जॉनी बेअरस्टोला संघाबाहेर बसवले. प्रियम गर्गच्या जागी वृद्धिमान साहाला संघात घेत सलामीवीर-यष्टीकक्षक अशी दुहेरी जबाबदारी दिली. हैदराबादने फलंदाजीमध्ये केलेला हा प्रयोग पुरेपूर यशस्वी ठरला. वृद्धिमान साहाने सुरुवातीच्या दोन षटकांत दमदार फटकेबाजी केली. त्यानेच दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ‘बर्थडे बॉय’ कर्णधार डेव्हिड वॉर्नरने फटकेबाजीची जबाबदारी सांभाळत दिल्लीकरांना दणका दिला. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी पॉवर प्ले च्या ६ षटकांत तब्बल ७७ धावा कुटल्या. डेव्हिड वॉर्नरने पॉवरप्ले मध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. पण ३४ चेंडूत ६६ धावा करून तो माघारी परतला.

‘बर्थडे बॉय’ वॉर्नरचं दमदार अर्धशतक…

त्यानंतर साहाने तुफान फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हैदराबादच्या संघाकडून खेळताना वॉर्नर-साहा जोडीने अवघ्या ५२ चेंडूत (८.४ षटकांत) शतक गाठले. वॉर्नरने बाद झाल्यावरही साहाने फटकेबाजी केली. पण साहाला शतकाने हुलकावणी दिली. तो ४५ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८७ धावा करू शकला.

वृद्धिमान साहाची ८७ धावांची खेळी…

दोन्ही सलामीवीर माघारी परतवल्यानंतर मनिष पांडे आणि केन विल्यमसन जोडीने शेवटपर्यंत खिंड लढवली. मनिष पांडेने ३१ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या. तर विल्यमसनने नाबाद ११ धावा केल्या.

मनिष पांडेची दमदार खेळी…

रविचंद्रन अश्विन आणि नॉर्ये यांनी प्रत्येकी १-१ बळी टिपला.