पंजाब आणि कोलकाता यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताच्या संघाने गेला सामना त्यांच्या फलंदाजीच्या बळावर जिंकला होता, तर पंजाबने त्यांच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे १२६ धावांच्या आव्हानाचा यशस्वी बचाव केला होता. अशा परिस्थितीत लोकेश राहुलने अनपेक्षितपणे पहिलं षटक टाकण्यासाठी ग्लेन मॅक्सवेलला बोलावलं. समोर गोलंदाजीसाठी गेल्या सामन्यात ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारा नितीश राणा होता.

ग्लेन मॅक्सवेलने आतापर्यंत या स्पर्धेत गोलंदाजीत फारशी कमाल दाखवलेली नाही. त्यामुळे राहुलच्या या निर्णयाबाबत साशंक होते. मॅक्सवेलने पहिला चेंडू शुबमन गिलला टाकला. त्यावर गिलने १ धाव काढून नितीश राणाला स्ट्राईकवर आणलं. सामन्याच्या दुसऱ्या आणि राणाच्या पहिल्याच चेंडूवर मॅक्सवेलने टाकलेला चेंडू नितीश राणाने टोलवला, पण मागच्या बाजूला असलेल्या ख्रिस गेलने त्याचा सुंदर आणि सोपा झेल पकडला. गेल्या सामन्यात दमदार अर्धशतक ठोकणाऱ्या राणाला या सामन्यात मॅक्सवेलने खातंही उघडू दिलं नाही.

पाहा नितीश राणाची विकेट-

दरम्यान, गेल्या सामन्यात नितीश राणाने ५३ चेंडूत ८१ धावांची खेळी केली होती. संघाला १९४ धावांपर्यंत पोहोचवण्यात राणाने मोलाची भूमिका बजावली होती.