गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात करुन आयपीएलच्या तेराव्या हंगामाची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जला लागोपाठ दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्सने १६ धावांनी तर दिल्ली कॅपिटल्सने ४४ धावांनी चेन्नईवर मात केली. दोन्ही सामन्यांत चेन्नईच्या फलंदाजांनी निराशाजनक खेळ केला. दिल्लीविरुद्धचा सामना गमावल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या संघाची कामगिरी चांगली होत नसल्याचं मान्य केलं आहे.

“आमच्यासाठी हा सामना अजिबात चांगला गेला नाही. मैदानावर दव नव्हतं…खेळपट्टीही अपेक्षेपेक्षा खूप स्लो होती. गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात आमची कामगिरी चांगली होत नाहीये याचा आम्हाला फटका बसतोय. सुरुवात संथ झाल्यानंतर दबाव वाढत गेला आणि त्याचं दडपण इतर खेळाडूंवर आलं. या गोष्टीवर आम्हाला उपाय शोधावा लागणार आहे.” सामना संपल्यानंतर धोनीने आपली प्रतिक्रिया दिली. फिरकीपटूंनाही आपली भूमिका चोख बजावी लागेल असं धोनीने सांगितलं.

दिल्लीविरुद्ध सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने सुरेख रणनिती आखत चेन्नईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. कगिसो रबाडाचा अखेरच्या षटकांमध्ये मोठ्या खुबीने वापर करत श्रेयसने दिल्लीच्या फलंदाजांना फटकेबाजी करण्याची संधीच दिली नाही.