आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून गतविजेते मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या हंगामातली सर्वात आश्वासक गोष्ट म्हणजे अष्टपैलू कायरन पोलार्डचं फॉर्मात परतणं…कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेत कायरन पोलार्डचा संघ यंदा धडाकेबाज कामगिरी करतो आहे. त्यामुळे अशीच कामगिरी पोलार्डने आयपीएलमध्येही करावी अशी इच्छा मुंबई इंडियन्सच्या कँपमध्ये असेल. कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीरने यासाठी मुंबईच्या टीम मॅनेजमेंटला एक सल्ला दिला आहे.

अवश्य वाचा – एका क्लिकवर जाणून घ्या आयपीएल २०२० चं संपूर्ण वेळापत्रक

“पोलार्डने CPL मधला फॉर्म आयपीएलमध्ये कायम राखावा अशी मुंबई इंडियन्सच्या संघातील प्रत्येकाची इच्छा असणार आहे. पोलार्डची बॅटिंग पाहून जयवर्धने नक्कीच खुश झाला असेल. कायरन पोलार्डच्या या फॉर्मचा तुम्हाला वापर करुन घ्यायचा असेल तर त्याला फलंदाजी करताना चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकाच्या खाली पाठवू नका. पोलार्ड मुंबईसाठी महत्वाचा खेळाडू आहे.” गौतम गंभीर Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता.

कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेतही पोलार्डने आपल्या फलंदाजीची ताकद दाखवत तुफान फटकेबाजी केली आहे. पोलार्डचा ट्रिंबागो नाईट रायडर्स हा संघ स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना हरलेला नाहीये. त्यामुळे पोलार्ड आयपीएलमध्येही आपला हाच फॉर्म कायम राखतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – …तर आंद्रे रसेल आयपीएलमध्ये द्विशतक झळकावू शकतो !