युएईमध्ये IPLचा हंगाम सुरू झाला. पहिल्या आठवड्यात प्रत्येक संघाचा किमान एक सामना झाला. भारतीय आणि परदेशी फलंदाजांनी आपली चमक दाखवली. त्यात अंबाती रायडू, मयंक अग्रवाल, फाफ डु प्लेसिस, रोहित शर्मा, लोकेश राहुल या फलंदाजांनी दमदार खेळी केली. या साऱ्या फलंदाजांपैकी सर्वोत्तम फलंदाज कोण या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने त्याच्या दृष्टीने सर्वोत्तम फलंदाज कोण? याबद्दल मत व्यक्त केलं.

राहुलने ठोकलेल्या धडाकेबाज शतकानंतर वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज इयन बिशप याने राहुलचं कौतुक केलं. “त्याने स्वत:च्या खेळीची ज्याप्रकारे उभारणी केली ते मला आवडलं. त्याने अर्धशतक झळकावलं तेव्हा मी सामना पाहत होतो. मला त्याची खेळी पाहून वाटलं की तो केवळ मैदानावर स्थिरावण्याच्या दृष्टीने खेळतोय. पण त्यानंतर मात्र त्याने खेळीत चांगलाच समतोल राखला. त्याला मिळालेली जीवदानं जाऊद्या, त्याने केलेली फटकेबाजी पाहा. त्याच्या याच खेळीमुळे मला तो एक परिपूर्ण फलंदाज वाटला”, असं इयन बिशप म्हणाला. इयन बिशपच्या या मताला सहमती दर्शवत गंभीर म्हणाला, “इयन बिशप यांचं राहुलबद्दलचं मत मलाही मान्य आहे. सध्याच्या घडीला मला असं वाटतं की राहुल हा IPLमधला सर्वोत्तम फलंदाज आहे!”

राहुलने ठोकलं दमदार शतक

राहुलने बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या. त्यात १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. याचसोबत राहुलची आजची वैयक्तिक धावसंख्या ही IPLच्या इतिहासातील कर्णधाराने झळकावलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. २०१७च्या IPLमध्ये डेव्हिड वॉर्नरने हैदराबादचे कर्णधारपद भूषवताना ५९ चेंडूत १२६ धावांची खेळी केली होती. कोलकाताविरोधात त्याने हा पराक्रम केला होता. त्यानंतर राहुलने तो विक्रम मोडला.