करोनाच्या धोक्यानंतर अखेर १९ सप्टेंबरपासून IPL 2020ची सुरूवात झाली. करोनामुळे ही स्पर्धा भारतात न होता युएईमध्ये खेळवली जात आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या ८ संघांपैकी ६ संघांचे कर्णधार भारतीय आहेत, तर हैदराबाद आणि राजस्थानच्या संघाची धुरा परदेशी खेळाडूच्या खांद्यावर आहे. IPLमध्ये सर्वोत्तम कर्णधार कोण याबद्दल प्रश्न विचारला की बहुतांश वेळा उत्तर हे महेंद्रसिंग धोनी किंवा रोहित शर्माच हेच मिळतं. सर्वाधिक अनुक्रमे तीन आणि चारवेळा स्पर्धेचे विजेतेपद मिळवून या दोन कर्णधारांनी आपलं नेतृत्वकौशल्य सिद्ध केलं आहे. याशिवाय हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरदेखील प्रत्येक सामन्यात नेत्याप्रमाणे पुढे उभा राहून संघासाठी लढत असतो. पण न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिस याने मात्र या तिघांव्यतिरिक्त एका चौथ्याच खेळाडूची निवड सर्वोत्तम कर्णधार म्हणून केली.

स्कॉट स्टायरिस स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, “स्टीफन फ्लेमिंग हा मी आयुष्यात पाहिलेल्या कर्णधारांपैकी सर्वोत्तम आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार असलेला फ्लेमिंग सध्या चेन्नई प्रशिक्षक आहे. तो ज्याप्रकारे नेतृत्व करायचा तशाच प्रकारे तो प्रशिक्षणही देतो. चेन्नईच्या सुमार कामगिरीमुळे तो पत्रकार परिषदेत थोडासा अस्वस्थ दिसला. असं आधीही घडलं आहे. पण मला असं वाटतं की तो अशाप्रकारे का वागला ते आपण पाहायला हवं. तो सामन्यातील प्रक्रियेबद्दल बोलत होता. तो खेळाडूंच्या कामगिरीवर नाराज होता. कारण तुम्ही जिंका किंवा हरा, सामन्यातील काही गोष्टींवर तुमचं नियंत्रण असतं. ते नियंत्रण खेळात दिसत नसल्याने तो अस्वस्थ दिसून आला.”

“फ्लेमिंग हा सध्या त्याचं सर्वस्व पणाला लावतो आहे. चेन्नईच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करावी यासाठी तो खूप प्रयत्न करतो आहे. त्यामुळे मैदानावर काही घडलं की लगेच त्याच्याही चेहऱ्याचे हावभाव बदलताना दिसतात. कारण हेच की CSKने पुन्हा दमदार कामगिरी करून दाखवावी”, असं ब्रायन लाराने त्याच कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं.