वयाच्या ४८ व्या वर्षातली एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल अशी उर्जा घेऊन मैदानात उतरणाऱ्या प्रवीण तांबेला यंदाच्या आयपीएल हंगामात संधी मिळाली आहे. IPL 2020 साठी कोलकाता नाईट रायडर्सने २० लाखांच्या बोलीवर प्रवीणला आपल्या संघात घेतलं होतं. परंतू प्रवीणने कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याला यंदाची आयपीएल खेळता येणार नाही असं निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय क्रिकेट बोर्डाशी संलग्न असलेला खेळाडू बाहेरील देशांतील लिगमध्ये सहभागी होऊ शकत नाही. प्रवीण तांबेने नेमका हाच निर्णय मोडल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेत खेळत असताना त्रिंबागो नाईट रायडर्स संघाकडून प्रवीणने बहारदार कामगिरी केली. यानंतर चाहत्यांच्या भावनेचा आदर करत कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रवीण तांबेला संघाच्या प्रशिक्षण वर्गात काम करण्याची संधी दिली आहे. प्रवीण आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी फिरकीपटूंना मार्गदर्शन करणार आहे. KKR चे CEO वेंकी मैसून यांनी ही माहिती दिली.

CPL स्पर्धेत प्रवीणला यंदा फार कमी संधी मिळाल्या. परंतू आपल्याला मिळालेल्या प्रत्येक सामन्यात प्रवीणने स्वतःची छाप पाडली. तसेच मैदानात सरावादरम्यान, खेळाडूंना मार्गदर्शन करताना, मदत करण्यात प्रवीण नेहमी तत्पर असतो. युएईमधील खेळपट्ट्यांवर त्याच्या अनुभवाचा संघातील फिरकीपटूंना फायदा होईल असं मत मैसूर यांनी व्यक्त केलं. १९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या, KKR चा नवीन खेळाडू अली खानचं पाकिस्तान कनेक्शन आणि इतर गोष्टी