आरसीबी आणि मुंबईमध्ये आयपीएलमधील दहावा सामना सुरु आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासह विराट कोहलीच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. टी २० क्रिकेटमध्ये १५० सामन्यात नेतृत्व करणारा विराट कोहली तिसरा भारतीय खेळाडू झाला आहे. या आधी असा पराक्रम धोनी आणि गौतम गंभीर यांनी केला आहे.

विराट कोहलीने २०१३ मध्ये आरसीबी संघाची धुरा सांभाळली आहे. तर २०१७ मध्ये विराटकडे भारतीय टी २० संघाचं नेतृत्व आलं. आतापर्यंत कर्णधार म्हणून विराट कोहलीने १५० सामने खेळले आहे. आयपीएलमध्ये आरसीबीकडून विराट कोहलीने आतापर्यंत ११३ सामन्यात नेतृत्व केलं आहे. यामध्ये ५० सामन्यात विजय तर ५६ सामन्यात पराभव पहावा लागला आहे. आयपीएलमध्ये विराटच्या विजयाची टक्केवारी ५१.७४ इतकी आहे. याशिवाय भारतीय संघाकडून ३७ सामन्यात विराट कोहलीने नेतृत्व केलं आहे. यामध्ये २२ सामन्यात विजय मिळवला आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नईचा कर्णधार एम. एस धोनीने आतापर्यंत सर्वाधिक टी २० सामन्यात नेतृत्व केलं आहे. धोनीने आतापर्यंत २७३ सामन्यात नेतृत्व केलं आहे. तसेच भारताचा माजी सलामी फलंदाज गौतम गंभीर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गंभीरने कोलकाता आणि दिल्ली संघाचं नेतृत्व केलं आहे. गंभीरने कोलकाता संघाला दोन वेळा आयपीएल चषक जिंकून दिला आहे.