IPL 2020 CSK vs KXIP: सलग तीन पराभवांमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या चेन्नईच्या संघाची गाडी अखेर रविवारी रूळावर आली. पंजाबविरूद्धच्या सामन्यात चेन्नईच्या संघाने निर्विवाद वर्चस्व राखत दणदणीत विजय मिळवला. कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने चेन्नईला १७९ धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली. पंजाबच्या गोलंदाजांना घाम फोडत या दोघांनी चेन्नईसाठी IPLमधील सर्वोत्तम सलामी दिली आणि १० गडी राखत संघाला विजय मिळवून दिला.

फाफ डु प्लेसिस पहिल्या सामन्यापासूनच चांगली खेळी करताना दिसत होता. पण शेन वॉटसनला मात्र अखेर पाचव्या सामन्यात सूर गवसला. पहिल्या चार सामन्यांमध्ये त्याला दोन आकडी धावसंख्या गाठणंही कठीण जात होतं. पण रविवारच्या सामन्यात त्याने नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीला माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने डिझेलच्या इंजिनाची उपमा दिली. डिझेलवर चालणाऱ्या गाडीचं इंजिन सुरू व्हायला वेळ लागतो, पण एक इंजिन सुरू झाली की गाडी सुसाट पळते. त्याचा दाखला देत त्याने वॉटसनला ती उपमा दिली.

“१९ सप्टेंबरपासून चेन्नईचा संघ वॉटसन नावाचं डिझेल इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न करत होतं. अखेर रविवारी (४ ऑक्टोबरला) ही इंजिन सुरू झालं आणि त्याने ‘सांबा’ फाफ डु प्लेसिसच्या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांना संपूर्ण स्टेडियमच्या चकरा मारून आणल्या”, अशी हटके टिप्पणी सेहवागने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर टाकलेल्या व्हिडीओमध्ये केली.

१७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वॉटसन आणि डु प्लेसिस या दोघांनी तुफान फटकेबाजी केली. वॉटसनने आपलं विसावं अर्धशतक पूर्ण केलं. तर डु प्लेसिसने १५वं अर्धशतक ठोकलं. डु प्लेसिसच्या नाबाद ८७ आणि वॉटसनच्या नाबाद ८३ धावांच्या बळावर चेन्नईने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याआधी, पंजाबच्या डावात कर्णधार राहुलने एकाकी झुंज देत अर्धशतक ठोकले होते.