गुणतालिकेत तळातल्या स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने गेल्या ३ सामन्यांमध्ये धडाकेबाज कामगिरी करण्याचा सपाटा लावत अव्वल ३ संघांना धक्का दिला. बंगळुरु, मुंबई आणि दिल्ली यांच्यावर मात करत पंजाबने स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. शिखर धवनच्या शतकी खेळाच्या जोरावर दिल्लीने पंजाबविरुद्ध सामन्यात १६४ धावांपर्यंत मजल मारली. परंतू पंजाबने हे आव्हान निकोलस पूरनच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं. पंजाबविरुद्ध झालेल्या पराभवानंतर दिल्लीच्या संघात चिंतेचं वातावरण तयार झालं असून यापुढील सामने अधिक जबाबदारीने खेळणं गरजेचं असल्याची कबुली कर्णधार श्रेयस अय्यरने दिली आहे.

“आमच्यासाठी हा महत्वाचा क्षण आहे, या पराभवामुळे संघातील त्रुटींकडे लक्ष देण्याची गरज आहे. यापुढे अशाच कठीण परिस्थितीमध्ये तुल्यबळ संघांविरोधात आमचा सामना होणार आहे. आतापर्यंत आम्ही खूप चांगला खेळ केला आहे, पण जे झालं ते आता पाठीमागे सोडायला हवं. सर्व खेळाडूंनी आपली जबाबदारी ओळखून चांगला खेळ करण्याची गरज आहे. प्ले-ऑफसाठी आम्हाला एका विजयाची गरज आहे, त्यामुळे यापुढील सामन्यांसाठी गरजेनुसार रणनिती आखली जाईल.” सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्रेयस अय्यरने कबुली दिली.

पंजाबविरुद्ध सामन्यात शिखर धवनने एकाकी झुंज देत शतक झळकावलं. मात्र कर्णधार अय्यर, पंत, स्टॉयनिस, हेटमायर हे सर्व फलंदाज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरले. दिल्लीकडून गोलंदाजांनी सामन्यात प्रयत्नांची शर्थ केली, परंतू पंजाबला विजयापासून ते रोखू शकले नाहीत.