हैदराबादविरूद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. हैदराबादने संघात तीन बदल केले. केन विल्यमसनला संघात घेत जॉनी बेअरस्टोला संघाबाहेर बसवले. प्रियम गर्गच्या जागी वृद्धिमान साहाला संघात घेत सलामीवीर-यष्टीकक्षक अशी दुहेरी जबाबदारी दिली. तर खलील अहमदला संघाबाहेर करत नदीमला संघात स्थान दिले. हैदराबादचा फलंदाजांमध्ये केलेला बदल पुरेपूर यशस्वी ठरला.

वृद्धिमान साहाने सुरुवातीच्या दोन षटकांत दमदार फटकेबाजी केली. त्यानेच दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ‘बर्थडे बॉय’ कर्णधार डेव्हिड वॉर्नरने फटकेबाजीची जबाबदारी सांभाळत दिल्लीकरांना दणका दिला. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी पॉवर प्ले च्या ६ षटकांत तब्बल ७७ धावा कुटल्या. डेव्हिड वॉर्नरने पॉवरप्ले मध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. पण ३४ चेंडूत ६६ धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर साहाने तुफान फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. साहाने या दमदार खेळीच्या जोरावर दोन पराक्रम केले. पॉवर प्ले च्या षटकांमध्ये सर्वोत्तम स्ट्राईक रेट असणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने TOP 5 मध्ये स्थान मिळवलं. IPL कारकिर्दीत पॉवरप्लेमध्ये किमान ४०० पेक्षा जास्त चेंडू खेळत त्याने १३७.५०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

तसेच १९०पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने धावा काढत दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक करण्याचा विक्रमही आज पुन्हा एकदा घडला. वॉर्नर आणि साहा दोघांनी दमदार खेळ करत अर्धशतके ठोकली. याआधी २०१६मध्ये गेल – कोहली जोडीने तर २०१७मध्ये ख्रिस लीन-सुनील नरिन जोडीने असा पराक्रम केला होता.

दरम्यान, हैदराबादच्या संघाकडून खेळताना वॉर्नर-साहा जोडीने अवघ्या ५२ चेंडूत (८.४ षटकांत) शतक गाठले. वॉर्नरने बाद झाल्यावरही साहाने फटकेबाजी केली. पण साहाला शतकाने हुलकावणी दिली. तो ४५ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८७ धावा करू शकला.