सुरुवातीलाच अपयशी ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाला इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सध्या लयीत असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या सामन्यात दमदार विजयाची नोंद करण्याच्या निर्धाराने मुंबईचा संघ मैदानात उतरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईला २०१२ नंतर एकाही हंगामात पहिली लढती जिंकता आलेली नाही. शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धही त्यांना अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागला. मात्र पाच वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला झोकात पुनरागमन करण्याची कला अवगत आहे. त्याशिवाय गेल्या हंगामात मुंबईने दोन्ही सामन्यांत कोलकाताला सहज धूळ चारली होती. म्हणूनच या वेळीही मुंबईचे पारडे जड मानले जात आहे.

दुसरीकडे कर्णधार ईऑन मॉर्गनच्या कोलकाताने बलाढ्य सनरायजर्स हैदराबादला नमवले. गेल्या दोन वर्षांत बाद फेरीची संधी हुकलेला कोलकाताचा संघ या वेळी अधिक समतोल वाटत आहे. युवा भारतीय फलंदाजांसह चेन्नईतील खेळपट्टीसाठी पोषक असे अनुभवी फिरकीपटूही त्यांच्या ताफ्यात आहेत.

… म्हणूनच हार्दिक गोलंदाजीपासून दूर!

इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत सातत्याने गोलंदाजी केल्यावर हार्दिक पंड्याचा खांदा काहीसा दुखावला. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाच्या फिजिओने दिलेल्या सल्ल्यानुसार तो पुढील काही लढती गोलंदाजी करणे टाळून फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करणार आहे. त्याच्या खांद्यावर अतिरिक्त भार येऊ न देण्याचे संघ व्यवस्थापनाने ठरवले आहे, अशी माहिती मुंबईचा क्रिकेट संचालक झहीर खानने दिली.

कोलकाताची मदार भारतीय खेळाडूंवर

नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक आणि वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा या भारतीय खेळाडूंवर कोलकाताची प्रामुख्याने मदार आहे. शुभमन गिलला सातत्याने फलंदाजी करावी लागणार आहे. पॅट कमिन्स, मॉर्गन, रसेल या विदेशी त्रिकुटाला वैयक्तिक कामगिरीवर लक्ष द्यावे लागेल. हरभजन सिंग, वरुण च्रकवर्ती आणि शाकिब अल हसन या प्रभावी फिरकीपटूंमुळे कोलकाता मुंबईवर वरचढ ठरू शकतो. मॉर्गनचे कल्पक नेतृत्व कोलकातासाठी मोलाचे ठरेल.

फलंदाजांनी कामगिरी उंचावण्याची गरज

बेंगळूरुविरुद्ध चुकीचे फटके खेळण्याबरोबरच मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावण्यात फलंदाज अपयशी ठरल्यामुळे मुंबईला अपेक्षित धावसंख्या रचता आली नाही. विशेषत: हार्दिक पंड्या गोलंदाजी करत नसल्याने त्याच्याकडून संघाला फलंदाजीत दमदार योगदानाची अपेक्षा आहे. क्विंटन डीकॉकच्या विलगीकरणाचा काळ संपला असून तो मंगळवारच्या लढतीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे ख्रिस लीनला पुन्हा संघाबाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराला ट्रेंट बोल्ट आणि मार्को जान्सने या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांची साथ लाभणे आवश्यक आहे. फिरकीपटू राहुल चहर मुंबईसाठी निर्णायक भूमिका बजावू शकतो.

* वेळ : सायंकाळी ७.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोटर््स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 mumbai indians await their first win abn
First published on: 13-04-2021 at 00:40 IST