भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाला आपल्या संघातील सर्व सहकारी त्यांच्या घरी सुखरुप परतल्यानंतरच आपण घरी जाणार असल्याचं सांगितलं आहे. माझ्या संघातील सर्व खेळाडू त्यांच्या मायदेशी परतल्यानंतरच मी दिल्लीमधून रांचीसाठीच्या विमानात बसेल असं धोनीने संघ व्यवस्थापनाला स्पष्टपणे सांगितलं आहे. आपल्या आधी परदेशातून आयपीएल खेळण्यासाठी आलेल्या चेन्नईच्या खेळाडूंची आणि त्यानंतर भारताच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या चेन्नईच्या खेळाडूंची घरी जाण्याची व्यवस्था करावी असं धोनीने म्हटलं आहे. मी सर्वजण गेल्यानंतरच इथून निघाणार आहे असं धोनीने व्यवस्थापनाला कळवलं आहे.

संघ सहकाऱ्यांबरोबर नुकतीच धोनीने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मिटिंग घेतली. आयपीएल भारतामध्येच होत असल्याने परदेशातून आलेल्या खेळाडूंना आणि सपोर्टींग स्टाफला घरी जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रथम प्राधान्य द्यायला हवं. त्यानंतर भारतीय खेळाडूंची व्यवस्था करण्यात यावी, असं मत धोनीने मांडलं.

“हे हॉटेल सोडणारा मी सीएसकेचा शेवटचा खेळाडू असेल, असं माहीभाईने आम्हाला सांगितलं. सर्व परदेशी खेळाडूंनी आधी त्यांच्या मायदेशी जाण्यासाठी निघावं त्यानंतर भारतीय खेळाडूंचा विचार करण्यात यावा असंही त्याने म्हटलं. तो गुरुवारी सायंकाळी रांचीसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. सर्व खेळाडू सुखरुप घरी पोहचल्यानंतरच तो निघणार आहे असं त्याने सांगितलं,” अशी माहिती सीएसकेच्या एका खेळाडूने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.

चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने आपल्या परदेशी खेळाडूंना मायदेशी पाठवण्यासाठी चार्टड प्लेन्सची व्यवस्था केली आहे. दिल्ली विमानतळावरुन दहा जणांची आसन व्यवस्था असणारी विमाने राजकोट आणि मुंबईसाठी गुरुवारी सकाळी रवाना झाली. सायंकाळी निघाणाऱ्या विमानांनी मुंबई आणि बंगळुरुमधील खेळाडूंना सोडण्यात येणार आहे. आज (६ मे २०२१ रोजी) सायंकाळी रांचीसाठी रवाना होणार आहे.

मंगळवारी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. कोलकाता, चेन्नई संघातील काही खेळाडू आणि टीममधील सपोर्टींग स्टाफला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर बीसीसीआयने तातडीने हा निर्णय घेत स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याचं जाहीर केलं. खेळाडू आणि स्पर्धेशी संबंधित व्यक्तींच्या सुरेक्षेसाठी आम्ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितलं.