प्रत्येक भारतीयाची गरज असलेल्या मिठासाठी ब्रिटिशांच्या जुलमाविरुद्ध गांधीजींनी ‘सत्याग्रह’ करून दांडीयात्रा केली. आपणही आपल्याचकडून आपल्यावर होत असलेल्या मिठाच्या ‘अत्याग्रह’विरुद्ध आपापल्या परीने असहकार पुकारून आरोग्ययात्रा घडवू.

आज बारा मार्च! दांडी यात्रेचा दिवस! बरोब्बर शहाऐंशी वर्षांपूर्वी म्हणजेच १२ मार्च १९३० या दिवशी महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला प्रारंभ केला. या दांडीयात्रेचा इतिहास खूप काही शिकवून जातो. समुद्र किनाऱ्यालगतच्या गावातले लोक मिठागराचा व्यवसाय करत. त्या वेळच्या ब्रिटिश सरकारला भारतीयांचं हे स्वावलंबित्त्व कसं सहन होणार? त्यामुळे साहजिकच आपला अधिकार दाखवण्यासाठी जुलूम करणे या दबावयंत्राचा त्यांनी वापर केला व भारतीय मीठ उत्पादन बेकायदा ठरवलं. त्यांनी भारतीय मिठागरे बंद केली व स्वत:चं मीठ उत्पादन सुरू करून त्यावर कर बसविला.

Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

‘मीठ’ हा सर्वाच्याच अन्नाचा अविभाज्य घटक असल्याने या गोष्टीचा सर्वाच्याच जीवनावर आणि मानसिकतेवर परिणाम झाला. महात्मा गांधींनी या अन्यायाविरुद्ध असहकार पुकारून लढायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी प्रथम जनजागृती केली. त्यानंतर साबरमती आश्रम ते दांडी अशी पदयात्रा करायचं ठरवलं. साबरमती आश्रम ते दांडी हे अंतर २४० मैल (३९० कि. मी.) इतकं आहे. ही पदयात्रा गांधीजींनी १२ मार्च १९३० ला सुरू करून २४ दिवसांनी म्हणजेच ६ एप्रिल १९३० या दिवशी संपविली व मिठाचा कायदा रद्द करविला. या पदयात्रेला दांडीयात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह म्हणतात.

आता प्रश्न पडेल की दांडीयात्रेचा आणि या सदराचा काय संबंध आहे? हो, संबंध जरूर आहे. कारण गांधीजींची दांडीयात्रा हा मिठाच्या कायदेशीर उपलब्धतेसाठी केलेला ‘सत्याग्रह’ होता. ती गरज होती, परंतु सध्याच्या लाइफस्टाइलमुळे या उपलब्ध झालेल्या मिठाचा ‘अत्याग्रह’ होतोय की काय असं वाटू लागलंय! त्यामुळे तो अत्याग्रह मोडून काढायची वेळ आलेली आहे.

मीठ म्हणजे सोडियम आणि क्लोराईड या खनिजांचं संयुग असलेलं रसायन. या सोडियमची जगण्यासाठी प्रत्येकालाच आवश्यकता असते. एक वेळ मनुष्य साखर (गोड) न खाता राहू शकेल; परंतु मिठाविना जीवन एकदम अळणी होतं, बेचव होतं. (आपल्या जिभेवर खारट चव समजणाऱ्या टेस्टबडस् असतात.) सकाळी सकाळी बऱ्याच जणांना चहाबरोबर ‘खारी’ नसेल तर कसंसच होतं. काही जणांना जेवणात भाजी नसली तरी चालते; परंतु लोणचं मात्र पानात हवंच. लोणच्याचं म्हणाल तर बहुतेकांकडे लिंबू, कैरी, मिरची वगैरे वर्षभराची लोणची असतातच. याशिवाय गाजर, फ्लॉवर, हळद, आवळा, करवंद वगैरे बऱ्याच प्रकारची सीझनल लोणचीही असतात. मग काय, पोहे, उपमा, घावन, आप्पे असं काहीही केलं तरी लोणचं (किंवा सॉस) हे हवंच. लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात मसाला आणि मीठ असतं. मीठ हे चवीसाठी तर असतंच; परंतु लोणचं टिकवण्यासाठी याचा मुख्यत: उपयोग होतो. शिवाय भरपूर तेल घातलेली फोडणी असते. (तेलाचा वापरही चवीबरोबरच प्रिझर्वेटिव्ह म्हणून होतो.) या सर्वामुळे लोणचं रुचकर लागतं आणि ते चाखल्याने जिभेवरच्या आंबट-खारट चवीच्या टेस्टबडस् उत्तेजित होतात व लाळ उत्पन्न करतात. याचा परिणाम म्हणून भूक लागते.

परवाच एक जण आलू परोठय़ावरही चिमटीने मीठ भुरभुरून खाताना पाहिलं. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून तेच म्हणाले, ‘‘मला असं मीठ घातलं नाही तर अन्न खाल्ल्यासारखं वाटतचं नाही. लहानपणापासूनची सवय आहे ना!’’ मी त्यांना म्हटलंदेखील ‘‘अहो, या परोठय़ात व्यवस्थित मीठ आहे. हे असं वरून मीठ घातल्यानं शरीरात मिठाचं प्रमाण जास्त होईल नाही का?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘म्हणजे उच्च रक्तदाब होईल असंच म्हणायचंय ना तुम्हाला? अहो, झाल्यावर बघू. मी तर डॉक्टरांना सांगणार आहे औषधं स्ट्राँग दिली तरी चालतील पण माझं हे मीठ कमी करू नका बुवा!’’ या उत्तरावर मी गप्प राहण्यापलीकडे काय करणार होते?

याचाच अर्थ आपण आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ खातो आहोत याची बऱ्याच जणांना कल्पना असते. आहारशास्त्र सांगतं की, योग्य प्रमाणात मिठाचं (सोडियमचं) सेवन केल्यानं रक्तदाब, हृदयाचं कार्य व्यवस्थित चालतं. मज्जातंतू व स्नायूंचं कार्यही व्यवस्थित चालतं. उलटी, अतिसारानं झालेलं डिहायड्रेशन भरून काढलं जातं. म्हणजेच शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी मिठाचा उपयोग होतो. यासाठी दररोज १२०० ते १५०० मिलीग्रॅम इतक्या सोडियमची गरज लागते. ही गरज भागवण्यासाठी मोठय़ा माणसांना अंदाजे सहा ग्रॅम तर लहान मुलांना चार गॅ्रम एवढं मीठ दिवसाकाठी खाणं गरजेचं असतं. (हे प्रमाण सर्वसाधारण आहे. व्यक्तीचं वय, अंगकाठी, व्यायाम वगैरेप्रमाणे हे प्रमाण बदलू शकतं.) एवढं सोडियम मिळण्यासाठी चहाचा सपाट चमचा मीठ पुरेसं आहे; परंतु खूप उन्हात काम करणाऱ्यांना, खूप घाम येत असेल तर, उलटय़ा-जुलाब होत असल्यास तसेच खेळाडूंना किंवा व्यायाम करणाऱ्यांना जादा मिठाची गरज लागते.

आता भारताबद्दल बोलायचं झालं तर बहुतेक जण दररोज दोन ते अडीच चमचे मिठाचं सेवन करतात म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. बघा ना, खारी बिस्किटं त्यावर चीझ घालून किंवा खारट अशा डिपमध्ये बुडवून खाल्ली जातात. शिवाय निरनिराळे वडे, सामोसे, कचोरी, स्पाइसी सांबार, भजी, पावभाजी (लोणी नव्हे तर बटर घालून), मसाला पापड, मिसळपाव, भेळ, रगडापॅटीस यांसारखे ऑलटाइम आणि एनीटाइम फेव्हरिट पदार्थ तर खाल्ले जातातच त्यात भर म्हणून चकली, कडबोळी, शेव, फरसाण, ढोकळे, चिवडा असे पदार्थ नैमित्तिक न राहता नित्याचे झाल्याने या पदार्थाची पाकिटे जिकडे तिकडे पाहायला मिळतात. शिवाय मोमोज, बर्गर, नूडल्स, चायनीज, मेक्सिकन, इटालियन पिझ्झा- पास्ता वगैरेसारखे पदार्थ आपण आपल्या नेहमीच्या यादीत आणले आहेत. काही विशेष कार्यक्रम असल्यास मसालेदार पंजाबी पदार्थ, बिर्याणी, भरपूर मीठ असलेली लस्सी आणि वेगवेगळे सूप्सचे प्रकार खाल्ले जातात. घरी पंगत बसली की, डाव्या बाजूला प्रथम मीठ वाढलं जातं पण मला गंमत वाटते ती एका गोष्टीची आणि ती म्हणजे नैवेद्याच्या ताटामध्ये मात्र कटाक्षानं मीठ टाळलं जातं. म्हणजे चुकून कोणी तरी मीठ वाढलंच तर ते त्वरित काढून टाकलं जातं. (कारण काहीही असो.) या सर्व पदार्थामधून शरीरात जाणारं सोडियमचं प्रमाण खूपच असतं. मिठाच्या या अतिसेवनाने उच्च रक्तदाब, हृदयविकार, वजनवाढ होऊ शकते. याशिवाय रक्तवाहिन्यांचे विकार, मधुमेह, ऑस्टीओपोरोसिस अशा विकारांनाही खतपाणी घातलं जातं. एक वेळ घरचं खाणं आपण सांभाळू शकतो; परंतु बाहेरून आणलेले (वा खाल्लेले) प्रोसेस्ड स्नॅकफूड हे (जवळजवळ ८० टक्के) जास्त मीठ खाण्यात येण्यामागेच मुख्य कारण आहे. वर नमूद केलेले विकार हे जीवनशैलीशी निगडित आहेत. मिठाचं अतिसेवन ही आता सवयच नव्हे तर तिचं व्यसनात रूपांतर झालेलं दिसतंय ही सवय आपल्यात निसर्गत: आलेली नाही तर ती आपण (इतर व्यसनांप्रमाणे) लावून घेतलेली असते. लहान बाळाच्या जिभेला किंचितसा जरी मिठाचा कण लागला तरी ते बाळ कसंसच तोंड करतं; परंतु तेच मूल मोठं होत असताना त्याला निरनिराळ्या स्नॅक्सद्वारे जास्तीचं मीठ खाण्याची सवय लागते व त्या सवयीचं व्यसन केव्हा बनलं हे कळतही नाही.

मग आता यावर काय करायचं? त्याचं उत्तर आहे व्यसनमुक्त व्हायचं. त्यासाठी मनानं एकदा ठरवलं तर हे काम फारसं अवघड नाही. संशोधनातूनही हेच सिद्ध झालंय. शास्त्रज्ञांना असं दिसून आलं की केवळ घरी बनवलेले आणि त्यामध्येही जाणीवपूर्वक कमी मीठ घातलेले पदार्थ सहा आठवडे खाल्ले की जिभेला कमी मीठ खाण्याची सवय लागते (कारण निसर्गातल्या बहुतेक सर्व पदार्थामध्ये जीवनाश्यक असे योग्य तेवढय़ा प्रमाणात क्षार असतात). अशा वेळी एखाद्या पदार्थात थोडेसंही मीठ अधिक पडलं तर तो पदार्थ खाणं नकोसं वाटतं. याचाच अर्थ केवळ तळलेल्या, मसालेदार, प्रोसेस्ड पदार्थाचं सेवन कमी केलं की या व्यसनाला आळा बसतो आणि नको असलेली वजनवाढ आणि इतर विकारही आटोक्यात राहायला मदत होते.

तेव्हा प्रत्येकानंच दररोज आपल्या शरीरात किती मीठ जातंय यावर बारीक लक्ष ठेवायचं आणि मनावर नियंत्रण ठेवून आपल्याला योग्य असा आहार ठेवायचा. ‘आपलं आरोग्य आपल्याच हाती’ असं जर आहे तर या आरोग्य ‘संपदे’मध्ये हा मिठाचा (अतिसेवनाचा) खडा का टाकायचा?

लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रत्येक भारतीयाची गरज असलेल्या मिठासाठी ब्रिटिशांच्या जुलुमाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह करून दांडीयात्रा केली. आपणही आपल्याचकडून आपल्यावर होत असलेल्या ह्या मिठाच्या ‘अत्याग्रह’ विरुद्ध आपापल्या परीने असहकार पुकारून अधिक मीठ सेवनाला दांडी मारू या. आणि अशी ही ‘दांडी’ यात्रा आरोग्ययात्रा करू या.

– अंजली श्रोत्रिय
health.myright@gmail.com