महाराष्ट्रात नाटक लिहिणाऱ्या व्यक्तीला ‘नाटककार’ असे संबोधले जाते. ज्याला डोळ्यासमोर दिसलेले नाटक कागदावर मांडता येते. ज्या लिखाणाला अतिशय आकर्षक दृश्यात्मकता असल्याने त्या लिखित संहितेभोवती जाणत्या, अजाणत्या; पण उत्सुक कलाकारांचा वेढा पडतो आणि त्या संहितेला आपल्या भावनेचे, पोताचे आणि रंगाचे स्वरूप बहाल करून त्या संहितेचा प्रयोग सादर होतो तिथे नाटक जन्म घेते. नाटक ही संहिता नसते. चांगल्या दिग्दर्शकाच्या जाणिवेने संहितेला दिलेले ते गोळाबंद जिवंत स्वरूप असते.

मला लिखाणाची उपजत आवड असल्याने मी पूर्वी काही नाटके लिहिली. ती नाटके मी स्वयंप्रेरणेने लिहिली नाहीत. महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये परंपरेने चालत आलेली आणि जोपासलेली प्रायोगिक नाटकांची अतिशय जिवंत प्रणाली आहे. अनेक उत्साही, संवेदनशील तरुण मुले-मुली आपल्या उमेदवारीच्या काळात या प्रायोगिक नाटकांच्या रंगीत गर्दीत सामील होतात. कोणत्याही हिशोबापलीकडे जगण्याचे आयुष्यातले काही बेभान दिवस असतात, त्यात तुम्हाला सोबत देऊन, तुमच्या अंगातल्या कलागुणांचा वापर करून काही चांगले साकारणारे कुणी भेटले की तुम्ही अशा नाटकांच्या कामात सहभागी होता. महाराष्ट्रात हे फारच आपसूकपणे आणि नकळत घडते. कारण नाटक आपल्या आजूबाजूला खेळते असते आणि वाहत असते.

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
ghorpade ghat pune history
Video: ऐतिहासिक घोरपडे घाट…जुन्या पुण्याची गोष्ट सांगणारा अमूल्य वारसा!
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग ११८:पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी होती १८ एकरची प्रशस्त ‘नातूबाग’

माझे तसेच झाले. पुण्यात राहत असताना मोहित टाकळकर या अतिशय हुशार आणि दृश्यात्मकतेची  प्रगल्भ जाण असलेल्या उत्साही मुलाने Progressive Dramatic Association  या पुण्यातील प्रख्यात नाटय़संस्थेत उमेदवारी करून स्वत:चे कालसुस्वरूप प्रयोग करायला अनेक तरुण मित्रांना हाताशी घेऊन नवी मांडणी करायला घेतली. नाटकाबाहेरच्या माणसांना नाटकाकडे आकर्षित होण्यासाठी एक नवी ताजी ऊर्जा देणारी, कालसुसंगत, बुद्धिमान माणसे कारणीभूत ठरतात. अशी अनेक माणसे बहुधा दिग्दर्शकीय भूमिकेत असतात. ते आपापल्या नाटय़संस्थेचे प्रवर्तक असतात. महाराष्ट्रात अशा हुशार आणि इतरांना प्रेरणा देत आपल्याभोवती जमवून, त्यांच्यातले उत्तम गुण हेरून नाटक बांधणाऱ्या दिग्दर्शकांच्या अनेक पिढय़ा आहेत. डॉ. जब्बार पटेल यांच्यापासून- म्हणजे अगदी कालपरवापासून सुरुवात केली तरी आजच्या काळात कितीतरी चांगल्या माणसांनी उत्तम नव्या संस्था उभारून सतत चांगली प्रयोगशील नाटके उभी केली आहेत. चंद्रकांत कुलकर्णी, अतुल पेठे, चेतन दातार, संदेश कुलकर्णी ही यातल्या काही माणसांची महत्त्वाची उदाहरणे. यातल्या प्रत्येक माणसाने नाटक बसवताना नुसते काम केलेलं नाही, तर आपापल्या पिढीमध्ये महाराष्ट्रात चांगले नट, संगीतकार, लेखक तयार केले आहेत. मोहित टाकळकर आणि त्यापुढे अगदी आत्ताचा आलोक राजवाडे ही या व्यवस्थेतील पुढील पिढीची क्रमानुसार महत्त्वाची नावे आहेत.

मी पुण्यात असताना बारा-चौदा वर्षांपूर्वी मोहित टाकळकरच्या ऊर्जेने आणि त्याच्या बुद्धिमान, प्रयोगशील विचारांनी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला लाभलेल्या वेगळ्या दृश्यात्मक जाणिवेने अतिशय भारावून गेलो होतो. मला कुणीतरी ओळखीचे आणि आपले म्हणणे समजून घेणारा सहकारी मिळाल्याचा फार आनंद झाला होता.

मी नाटके लिहायला लागलो ते त्याच्या शांत आश्वासक कबुलीमुळे. तो मला म्हणाला होता की,तू संकोच न करता तुला हवे ते मोकळेपणाने लिही. मी त्याचे नाटक बसवेन. संकोच यासाठी, की मी त्यापूर्वी कधीही नाटक लिहिले नव्हते. आणि त्याहीपेक्षा गंभीर गोष्ट ही होती, की मी त्याआधी कोणतीच नाटके पाहिलेली नव्हती. लहानपणी नाही, कारण घरात असलेले हिंदी चित्रपटांचे अतोनात वेड आणि मराठी नाटकांचा कंटाळा. शाळा-कॉलेजात नाही, कारण बारावीची परीक्षा संपताच मी चित्रपटाच्या सेटवर उमेदवार म्हणून कामाला लागलो होतो. त्यामुळे आंतर- महाविद्यालयीन स्पर्धाचा, एकांकिकांचा अजिबातच अनुभव नाही. नाटकाचे जग माझ्यासाठी नवे होते.

समूहाला सोबत घेऊन सर्जक काम करणे हे अजिबात सोपे नसते. विशेषत: प्रायोगिक नाटक ही जी गडबडलेली आणि सांडून घरभर पसरलेली संज्ञा महाराष्ट्रात आहे, त्या व्यवस्थेत नवी दृष्टी आणि नव्या नाटकाचा आकृतिबंध ज्यांना उभारायचा असतो अशा प्रत्येक पिढीतील दिग्दर्शकाला माणसे निर्माण करणे आणि ती सांभाळणे हे काम एखाद्या नटीला चेहरा ताजा ठेवायला जितक्या वेळा आरसा पाहावा लागतो तितक्या वेळा करावे लागते. आणि ती माणसे न दमता ते करतात म्हणून नव्या जाणिवेची नाटके तयार होतात. मोहित मला नाटक लिही म्हणाला तेव्हा त्याला माझ्याकडून नाटकाच्या संहितेचा बांधीव, जुना आणि चिरेबंदी घाट अपेक्षित नव्हता, हे मला आज विचार करताना कळते. त्याला काय हवे होते त्याची नक्की दृष्टी त्याच्याकडे होती. त्याला दृश्यात्मक शक्यता असलेले आजच्या काळातले, जुन्याचा कोणताही प्रभाव नसलेले, न घाबरणारे लिखित साहित्य हवे होते. त्या साहित्याला संहितेचा टप्पा गाळून चांगल्या नटांच्या मदतीने तो फार मोहक आणि अनेकपदरी दृश्यात्मक स्वरूप रंगमंचाचा वापर करून देणार होता. मला नाटक लिहिता येत नाही हा त्याच्यासाठी प्रश्नच नव्हता. कारण ज्याला परंपरेने नाटकाची संहिता म्हणतात त्याच्या पलीकडे जाऊन आधुनिक दृश्यकलेत असतो तसा नाटकाचा अनुभव देण्याचे त्याचे प्रयत्न चालू होते. नाटक नाही; नाटकाचा अनुभव. आणि त्यापेक्षाही पुढील काही.

हे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या काळात लिहिणारा आणि वाचणारा समाज हा बघणाऱ्या समाजात परावर्तित होत होता. आमची पिढी बघत होती. ऐकत होती. आणि त्यामुळे नाटक या माध्यमात नाटककाराचा शब्द हा जो आजपर्यंत प्रमाण मानला गेला होता, त्याला नाटकाची गुंतागुंतीची दृश्यात्मक रचना आव्हान देणार होती.

नाटक लिहिणाऱ्या माणसाला त्यावेळीसुद्धा नवा शब्द नव्हता. आजही नाही. म्हणून मला ‘नाटककार’ असे म्हटले गेले. पण मी नाटककार नव्हतो आणि कधीही होऊ शकलो नाही. नाटककार ही जास्त विस्तृत आणि बांधीलकी असलेली जागा आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक लिहिता माणूस हा त्याला जरी वाटले तरी लेखक नसतो, त्याप्रमाणे नाटके लिहून कुणीही नाटककार होऊ शकत नाही. मी झालो नाही. माझ्या लिखाणाची प्रशंसा करायला, मला पुरस्कार द्यायला आणि माझ्या कामाची समीक्षा करायला ‘नाटककार’ ही संज्ञा वापरली गेली. २००६ साली नाटके लिहायचा थांबूनही मी माझ्या कामाच्या छापील वर्णनात ती संज्ञा वापरत राहिलो. आणि मला सावकाश काही वर्षांनी हे लक्षात आले, की आपण भूमिकेने आणि लिखाणाच्या रचनेने कधीही नाटककार नव्हतो. नाटक हे आपले मूळ माध्यम नाही. एका हुशार आणि ताज्या बुद्धीच्या आकर्षणाने आपण नाटकासाठी साहित्य निर्माण केले; त्यापलीकडे काही नाही.

२००४ ते २००६ या काळात अतिशय वेगाने मी चार नाटके लिहिली. हा काळ माझ्या आयुष्यातला फार छोटा, पण खूप भारावलेला काळ होता. मला माझे काम आवडत होते. मोहित म्हणाला की मी उत्साहाने लिहीत होतो. ती सर्व नाटके बसवली गेली, मला ती पाहता आली. त्यातल्या दोन नाटकांच्या संहिता प्रसिद्ध झाल्या. फार मोठय़ा मनाने आणि अतिशय आपुलकीने देशभर नाटक करणाऱ्या लोकांनी त्या काळात माझ्याशी मैत्री केली, मला त्यांच्यासोबत बोलण्याची, फिरण्याची संधी दिली. महाराष्ट्रात विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे आणि चेतन दातार या तीन माणसांनी मला नुसतेच मुख्य प्रायोगिक नाटकाच्या वातावरणात नेऊन फिरवले नाही, तर मी पुढे सातत्याने नाटकासाठी लिखाण करीन, या विश्वासाने मला अनेक साधने, गोष्टी आणि काही उत्तम आठवणी दिल्या. मी जेव्हा आज नाटक लिहीत नाही, तेव्हा मी या तीन माणसांचा नक्कीच विश्वासघात करीत आहे याची जाणीव मला होते.

आज हे आठवण्याचे कारण म्हणजे मी पुण्यातील एका नाटय़गृहात बसलो आहे. विनोद जोशी नाटय़महोत्सवाचा आज पहिला दिवस आहे. दरवर्षी आमचे उत्साही आणि अतिशय कार्यरत मित्र अशोक कुलकर्णी यांच्या प्रचंड मेहनतीमुळे पुण्यात एका साध्या, पण सुंदर कार्यक्रमात साहित्य आणि रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे रंगभूमीवर चांगले काम करणाऱ्या पाच मुलांना एक लाख रुपयांची एक फेलोशिप दिली जाते. नऊ  वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमाचा मी सर्वात पहिला फेलो आहे. मला त्यावेळी एक लाख रुपये मिळाले आणि त्याचे काय काय घ्यायचे आणि कुठे प्रवास करायचे याची स्वप्ने पाहत मी स्टेजवरून विजय तेंडुलकरांना ‘thank you’ म्हणालो तेव्हा ते मला म्हणाले की, ‘आभार मानलेस तर हे पैसे परत घेईन. आभार मानायचे नाहीत आणि खर्चाचा हिशोब द्यायचा नाही. तू ते पैसे हवे तसे उडव. त्यासाठीच ते तुला दिले आहेत.’

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com