News Flash

एकच तिकीट

मला स्वत:विषयी कणव आणि एक दुर्दैवाची भावना दाटून आली होती.

मी एकटय़ाने थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिला तेव्हा मला स्वत:विषयी कणव आणि एक दुर्दैवाची भावना दाटून आली होती. मी याआधी असे कधी केले नव्हते. सिनेमा हा नेहमी घरच्यांसोबत आणि मित्रमंडळ असले की बघायची गोष्ट आहे अशी अस्सल भारतीय सवय मनाला होती. सिनेमा बघताना विस्फारलेल्या डोळ्यांनी समोरच्या उजळलेल्या पडद्याकडे पाहत राहणे, हॉरर सीनला जोरात किंचाळणे, सिनेमा चालू असताना मधेच मागे वळून पाहिले की शेकडो माणसांचे पडद्यावर नजर रोखलेले अद्भुत चेहरे दिसतात.. त्या माणसांकडे उलटे बसून पाहत राहणे असली सर्व कृत्ये मी लहानपणी कुटुंबीयांसोबत सिनेमा पाहताना वर्षांनुवर्षे मोकळेपणाने केली. नवीन सिनेमा लागला की सगळ्या नातेवाईकांना फोनाफोनी करून, आदल्या दिवशी जाऊन आगाऊ तिकिटे आरक्षित करून, सिनेमाच्या दिवशी नवे कपडे घालून सर्वासोबत पाहायचा तो खरा सिनेमा! टीव्हीवर लागणारा शनिवार-रविवारचा सिनेमा घरात येत असला तरी तो घोळक्याने साजरा करायची पद्धत घरामध्ये होती. म्हणजे अमिताभचा सिनेमा असला की रविवारी संध्याकाळी आई मुद्दाम भेळ वगरे करून ठेवीत असे, पाण्याचे जग भरून ठेवत असे.. म्हणजे मधे कुणालाही उठायला नको.

मला नववीत असताना वार्षिक परीक्षेला गणिताच्या पेपरचे खूप टेन्शन आले होते. बाबा म्हणाले, की मस्त जाऊन एक सिनेमा पाहून ये. दुसऱ्या दिवशी पेपर नव्हता. मधे एक सुट्टी होती. मी खूप उदास आणि शांत होतो. मला हे माहीत होते, की माझा पुरेसा अभ्यास झालेला नाहीये. मला गणिताची अजिबातच गोडी नव्हती. बाबा ‘सिनेमा पाहून ये’ म्हणाले याचे मला आश्चर्य वाटले नाही. बरेच वाटले. जगाची पर्वा न करता आणि कुणालाही न घाबरता असले निराळेच उपाय करणे ही त्यांची सवय होती. पण वार्षिक परीक्षा चालू असताना माझ्यासोबत येणार कोण? मित्रांनी मला वेडय़ात काढले असते. तर मी एकटाच रिक्षा करून गेलो आणि त्याच दिवशी रिलीज झालेला सुभाष घईंचा ‘रामलखन’ हा चित्रपट बघून आलो. खरे सांगायचे तर बाबांनी सुचवलेल्या या उपायाचा मला फार फायदा झाला. मनावर आलेले मळभ निघून गेले. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी पाठ असलेली सगळी गाणी पाहायला मिळाली. घरी आल्यावर मी अभ्यास न करता शांतपणे झोपून गेलो आणि सकाळी ताज्या मनाने गणिताची सगळी उजळणी केली. मला पेपर फार अवघड गेला नाही.

पण सिनेमा पाहताना मला सारखे एकटे आणि अपराधी वाटत होते. मी याआधी एकटय़ाने सिनेमा पाहायला आलेली माणसे पाहिली होती. अशी माणसे बाल्कनीत सहसा नसत. खाली बसलेली असत. बिचारी दिसत. ती पान खाऊन थुंकत असत. त्यांच्यासोबत कुणीही नसलेली माणसे. शहरात वेळ काढणारी माणसे. कॉलेजची मवाली मुले. नोकरी नसलेले बेकार तरुण. परत जायची बस रात्री उशिरा आहे म्हणून थिएटरमध्ये वेळ काढणारे उपनगर आणि आजूबाजूच्या गावांतील लोक. मला या माणसांविषयी एक परकेपणा होता. जगण्याचा एकच मार्ग माहीत असलेल्या पठडीबाज समाजातील लोकांना दुसऱ्या प्रकारे जगणाऱ्या माणसांची कींव आणि घृणा फार पटकन् येते. मी अशाच पांढरपेशा समाजाचा भाग होतो- ज्यांना आपल्यापलीकडे असलेले इतर कोणत्याही प्रकारचे जगणे माहीतच नव्हते. आज पहिल्यांदा कोणत्याही कारणाने का होईना, मी अशा माणसांपकी एक झालो होतो- जी सिनेमाला एकटी जातात, ज्यांना सिनेमाला जायला सोबत कुणी नसते, किंवा त्यांना सोबत नको असते. मी मध्यंतरात एकटय़ाने पॉपकॉर्न विकत आणून खाल्ले. आजूबाजूची सगळी कुटुंबे हसायला लागली की मी कावराबावरा होऊन त्यांच्याकडे पाहत बसलो. एकटय़ाने करमणूक कशी करून घ्यायची याचे ज्ञान मला माझ्या समाजरचनेत मिळाले नव्हते. एकटय़ाने करून घ्यायची करमणूक म्हणजे आपण काहीतरी चोरून व्यभिचार केला आहे अशी काहीशी भावना माझ्या मनात तयार झाली असावी. सिनेमा संपेपर्यंत मी आपण एकटय़ाने येऊन चांगले केले की वाईट, अशाच विचारात होतो. घरी माझ्या माणसांमध्ये परत येईपर्यंत हा सगळा विचार विरून गेला होता आणि मी अगदी निवांत, मजेत होतो.

सिनेमाचा अभ्यास करायला लागलो तेव्हा माझे मन समोर दिसणाऱ्या पडद्यावरील प्रतिमेविषयी जास्त सतर्क झाले. रशियन चित्रपट दिग्दर्शक अन्द्रेय तारकोव्स्की यांचा ‘मिरर’ हा चित्रपट पहिल्यांदा पाहताना एका क्षणी मी माझ्या बसलेल्या खुर्चीतून उठलो आणि पडद्यासमोरील पहिल्या रांगेत जाऊन एकटा बसलो. माझ्यासमोर भव्य पडद्यावर धुंवाधार पावसात एक लाकडी घर जळत होते. कॅमेरा पडद्यावर संवादांच्या पलीकडे जाऊन एखाद्या कादंबरीत किंवा कवितेत असतो तसा गूढ अनुभव मांडत होता. पुढील सर्व चित्रपट मी विस्फारलेल्या डोळ्यांनी पहिल्या रांगेत एकटय़ाने बसून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहात पाहिला. आणि तिथे माझे एकटय़ाचे आणि चित्रपटाचे काहीतरी नाते पक्के झाले असे मला वाटते. पल्लेदार संवाद, कर्णकर्कश्श संगीत आणि नटांचे रंगवलेले चेहरे याचा आनंद घ्यायला जी घोळक्याची सामूहिक ऊर्जा लागते तशी ऊर्जा समोर चाललेल्या पडद्यावरील चित्रपटाला नको होती. त्या चित्रपटाला माझे संपूर्ण लक्ष हवे होते. मी आणि तो दिग्दर्शक यांच्यात एक वैयक्तिक संवाद सुरू होत होता.

जास्त संवेदनशीलतेने आणि अपार उत्सुकतेने मी जगातले वेगवेगळे चित्रपट पाहू लागलो तसा मी पुस्तकांचा वाचक म्हणून सुधारलो. मी संगीताचा श्रोता म्हणून जास्त सतर्क झालो. प्रगल्भ नाही; सतर्क. समोर सादर होणारा अनुभव शांतपणे स्वीकारून मनात रुजवून ठेवायला मी सक्षम झालो. घोळक्यातला एक अशी माझी स्वप्रतिमा हळूहळू पुसली जाऊ लागली. मला सोबतीची गरज वाटेनाशी झाली.

पुढे युरोपमध्ये जाऊन राहायला लागलो तेव्हा तिथे जगताना, प्रवास करताना एकटय़ाने आस्वाद घ्यायला आलेल्या प्रेक्षकांच्या लक्षणीय संख्येमुळे स्वत:विषयी वाटणारे वैचित्र्य कमी होत गेले आणि मी एकटय़ाने गाणे ऐकायला, चित्रपट पाहायला किंवा मुद्दाम प्रवास करून जाऊन चित्रांचे वा दृश्यकलेचे चांगले प्रदर्शन पाहायला स्वत:ला अधिकाधिक ढकलू लागलो. मी वाचक, श्रोता आणि प्रेक्षक म्हणून जास्त सुसंस्कृत व्हायला मला मदत झाली.

गोल्डस्पॉटच्या बाटल्यांवर लोखंडी ओपनर जोरात फिरवीत आवाज काढायचा एकपडदा चित्रपटगृहांचा एक काळ होता. त्यानंतर चित्रपट, त्याचे बघायचे तंत्रज्ञान बदलले. आणि गेल्या वीस-पंचवीस वर्षांत हे तांत्रिक आणि दृश्यात्मक बदल न थांबता होतच राहिले. आणि लहानपणी थिएटरला एकटय़ाने जावे लागले म्हणून खजील झालेला मी कुठच्या कुठे दुसऱ्या टोकाला येऊन पोहोचलो. इतका दुसऱ्या टोकाला, की मला आता लोकांच्या गर्दीत बसून सध्याच्या असंस्कृत प्रेक्षकांसोबत थिएटरमध्ये सिनेमा जाऊन बघायची शिसारी येते. माणसे काही तरी ओरबाडायला आल्यासारखी थिएटरमध्ये हपापल्यासारखी खातात. सिनेमा पाहताना मोठमोठय़ाने बोलतात. निम्मे लोक फोनवर काहीतरी वाचत बसलेले असतात किंवा कुजबुजत बोलत असतात. आणि उरलेले प्रेक्षक एकमेकांना गोंजारणे, एकमेकांच्या कानात काहीतरी सांगत बसणे असले काहीतरी करीत असतात. प्रेक्षागृहातले दहा टक्के लोक सिनेमाच्या प्रेमाने तो पाहायला आलेले असतात. बाकी लोकांना रिकामा वेळ इतर कोणत्या पद्धतीने घालवावा याचे ज्ञान किंवा कल्पना नसते म्हणून ते तिथे येतात. मला आजच्या काळातल्या भारतीय प्रेक्षकांचे फार वाईट वाटते. नवे पैसे आणि नवा उन्माद अंगात चढलेला हा आजचा प्रेक्षक मला तितकाच अपरिचित आणि विचित्र वाटतो; जितका लहानपणी त्या जुन्या, अंधाऱ्या चित्रपटगृहांत एकटय़ाने येऊन वेळ काढणारा प्रेक्षक वाटायचा. सिनेमा आणि सिनेमागृहे अनेक प्रकारची वैचिर्त्ये काळानुसार पोटात घेत असतात.

– सचिन कुंडलकर

kundalkar@gmail.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 3:13 am

Web Title: sachin kundalkar article on cinema theater
Next Stories
1 माझी बदललेली दिवाळी
2 दोन रात्री (भाग दोन)
3 दोन रात्री
Just Now!
X