16 November 2019

News Flash

स्त्री समजावून घेताना

माझ्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री माझी आई.  क्षमा करणारी. खूप राबणारी, सगळ्यांना सांभाळून घेणारी.

संघर्ष वाहिनीचे सहकारी रमेश बोरोले आणि त्यांच्या पत्नी शैला यांच्यासमवेत अमर हबीब.

अमर हबीब

अमर हबीब यांचे आईवडील मूळचे उत्तर प्रदेशचे. ते महाराष्ट्रात आले आणि पुढे अंबाजोगाई येथे स्थायिक झाले. शालेय शिक्षण घेत असताना ते राष्ट्र सेवा दलाकडे खेचले गेले. १९७४ ला मराठवाडय़ात विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. आणीबाणीचाही त्यांनी निषेध केला. मिसाखाली अटक होऊन त्यांनी १९ महिने तुरुंगवास भोगला. ‘छात्र-युवा संघर्ष वाहिनी’ या संघटनेतही अमर हबीब यांनी सहभाग घेतला. १९८० पासून त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी ग्रामीण समुदायाच्या समस्या समजून घेतल्या. गावोगावी भटकंती करून शेतकरी चळवळीचा विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहचविला. अंबाजोगाईला ज्वारी परिषद घेतली. ‘भूमिसेवक’ हे साप्ताहिक चालवले. आंबेठाण येथे राहून संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही दिले. त्यांनी शेतकरी प्रश्नांवर विपुल लेखन केले आहे. अलीकडे त्यांनी शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हावेत म्हणून किसानपुत्रांचे आंदोलन सुरू केले आहे.

माझ्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री माझी आई.  क्षमा करणारी. खूप राबणारी, सगळ्यांना सांभाळून घेणारी. पुढे शैला लोहिया, वसुधाताई धागमवार, माया देशपांडे यांच्या सहवासात स्त्रीच्या अनेक रूपांची, अफाट बुद्धिमत्तेची प्रचीती आली. मणिमाला, नूतन, कांचन, कनक अशा किती तरी युवती संघर्ष वाहिनीत होत्या. आंदोलनातील त्यांचं रूप आशादायी होतं, पुढे शेतकरी संघटनेतूनही स्त्रीच्या ताकदीचा प्रत्यय येत गेला. अनेक स्त्रिया समजत गेल्या.. अम्मीजानपासून सुरू झालेला स्त्री समजावून घेण्याचा प्रवास अथकपणे सुरूच आहे..

आमचं गाव अंबाजोगाई. मराठवाडय़ातलं तालुक्याचं ठिकाण. येथेच आम्ही लहानाचे मोठे झालो. मुसलमान कुटुंब. त्यातही वडील उत्तर प्रदेशातून आलेले. आई दिल्लीची. त्यांना मराठी अजिबात येत नव्हतं. आई थेट निरक्षर. वडिलांना उर्दू जेमतेम लिहितावाचता येत असे. गावात उर्दू माध्यमाची शाळा असतानासुद्धा वडिलांनी आम्हा भावंडांना मात्र मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं. त्यांनी त्या वेळेस काय विचार केला असेल कोणास ठाऊक? बहुधा, येथेच राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे, असा व्यवहारी विचार त्यांनी केला असावा. त्यांच्या अनुभवातून त्यांना हा व्यवहार कळला असावा.

मला दोन बहिणी आणि एक भाऊ. मी सर्वात लहान म्हणून आईचा लाडका. माझ्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री, माझी आई. आम्ही तिला अम्मीजान म्हणायचो. स्त्री म्हणजे आई. मायेची ऊब. क्षमा करणारी, खूप राबणारी आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी. माझ्या बालमनाच्या पाटीवर रेखाटलं गेलेलं स्त्रीचं हे पहिलं चित्र. माझे आई-वडील अन्य प्रांतातून आलेले. त्यामुळे संपूर्ण राज्यात कोणी नातेवाईक नाही. दोन मोठय़ा सख्ख्या बहिणी. कळू लागलं तसतसं त्याही अंतर ठेवून वागू लागल्या. गल्लीतल्या खाला, मावशी, आत्या, बडी आपा, भाभी बोलायच्या. मुलींनी मात्र बोलणं बंद केलं. चौथीनंतर वर्गात मुली नसत. चौथीपासून मॅट्रिकपर्यंत शाळेतल्या मुलींशी बोलण्याचा योग आल्याचं मला आठवत नाही. या वयात मनात एक गाठ तयार झाली. मुलींशी अंतर ठेवून वागायचं, हे कोणीही न शिकवितादेखील अंगवळणी पडलं. मुलींच्या बाबतचं कुतूहल असायचं. बोलावंसंही वाटायचं, पण शक्य व्हायचं नाही.

खेळाचा नाद होता. राष्ट्र सेवादलात जाऊ लागलो. डॉ. लोहियांनी सेवादलाचं कलापथक सुरू केलं. त्यातही सहभागी झालो. तेथे मुली असायच्या. पण तेथेही मुलींशी बोलणं क्वचितच व्हायचं. शैला लोहिया (भाभी) आम्हाला खूप प्रेमाने वागवायच्या. त्या छान गायच्या. नृत्य करायच्या. अभिनय करायच्या. कविता आणि गोष्टी लिहायच्या. शैला लोहिया यांच्या व्यक्तिमत्त्वातून पहिल्यांदा कला आविष्कार होताना पाहायला मिळाला. आईकडून उमजलेल्या ममतेच्या प्रतिमेला कलात्मकतेची झालर लागली.

कॉलेजात गेलो. तेथे मुली असायच्या. त्यांच्याशी दबकत दबकत बोलायचो. एव्हाना आम्ही ‘सामाजिक कार्यकर्ते’ वगैरे झालो होतो. आपली ‘पोझिशन’ खराब होता कामा नये, असं उगीचंच वाटायला लागलं होतं. मुलीसुद्धा आमच्याशी बोलताना आदरयुक्त अंतर ठेवूनच असायच्या.

नंदुरबार जिल्हय़ाच्या अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडय़ाच्या रांगांतील आदिवासी भागात गेलो तेव्हा तेथे डॉ. वसुधाताई धागमवार भेटल्या. त्या वेळेस त्यांनी कायद्यात पीएच.डी. केलेली होती. आदिवासींच्या जमिनीचा प्रश्न होता. मला त्यातलं काही समजत नव्हतं. ताई उलगडून सांगायच्या. पहाटेच आम्ही उठून आदिवासी पाडय़ांकडे जायला निघायचो. समोर एक वाटाडय़ा असायचा. आम्ही दोघे त्याच्या मागे चालायचो. वसुधाताई वाटेत कधी मला सोन-गवत दाखवायच्या. त्याचं महत्त्व समजून सांगायच्या. तर कधी एखादा पक्षी दाखवून त्याचं नाव आणि त्याची वैशिष्टय़ं सांगायच्या. सलीम अलींचं जाडजूड पुस्तक त्यांच्याकडे होतं. रात्री आकाशातील तारे दाखवायच्या. ‘अमर, तो पाहा अभिजीत तारा. १२ वर्षांनी दिसतो.’ वगैरे. स्त्रीतील अफाट बुद्धिमत्तेची प्रचीती मला वसुधाताई धागमवार यांच्या सहवासात आली.

मराठवाडा विद्यार्थी आंदोलनात काही काळ मी बीडला होतो. या आंदोलनात मुलींचा सहभाग तसा कमीच होता. तरी बीडला उषा ठोंबरे (दराडे) आणि सुशीला मोराळे या तरुणींमध्ये अधिकाऱ्यांशी विशेषत: पोलिसांशी दोन हात करण्याची धमक पाहिली. स्त्रीचं एक नवं रूप माझ्यासमोर आलं. आतापर्यंत मी फक्त पाहत होतो. आपल्या आपण विचार करीत होतो. आपले निष्कर्षही काढीत होतो. पण स्त्री प्रश्नावर, स्त्री-पुरुष संबंधांवर कोणाशी बोललो नव्हतो. चर्चा केली नव्हती. स्त्री प्रश्नावर पहिल्यांदा बोलता आले ते संघर्ष वाहिनीत काम करताना.

‘छात्र-युवा संघर्ष वाहिनी’ ही संपूर्ण क्रांतीसाठी लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेली युवकांची संघटना. देशभरातील हजारो युवक या संघटनेचे सभासद होते. सगळे तिशीच्या आतले. कारण या संघटनेच्या नियमानुसार तीस वर्षांचे वय ओलांडलेल्या व्यक्तीला सभासद राहता येत नसे. मी या संघटनेचा राष्ट्रीय संयोजक होतो. म्हणून मला देशभरातील युवकांशी संवाद साधता आला. सुधाकर जाधव माझे सहकारी. प्राध्यापक माया देशपांडे यांच्याशी त्याचं लग्न झालेलं होतं. एका बाळाची आई. संघर्ष वाहिनीच्या निमित्ताने माया देशपांडे यांची ओळख झाली. स्त्री-पुरुष संबंधावर पहिल्यांदा त्यांच्याशी बोलता आलं. मायाने हा गुंता नीटपणे समजावून सांगितला.

जेपींच्या आंदोलनामुळे बिहारमध्ये मोठय़ाप्रमाणात मुली सार्वजनिक कामात आल्या होत्या. मणिमाला, नूतन, कांचन, कनक अशा कितीतरी युवती संघर्ष वाहिनीत होत्या. या सगळ्या जुझारू, लढवय्या होत्या. त्यांनी स्त्री प्रश्न तळमळीने, अभ्यासपूर्ण आणि आक्रमक पद्धतीने मांडला. या काळात बोधगया परिसरातील हजारो एकर जमीन तेथील मठांच्या ताब्यातून मुक्त करून ज्या त्या शेतकऱ्यांना परत करण्याचे आंदोलन सुरू झाले होते. या मुली त्या आंदोलनात उतरल्यामुळे त्या भागातील स्त्रियाही सहभागी झाल्या. ‘औरत के सहभाग बिना हर बदलाव अधुरा है’ ही घोषणा त्याच आंदोलनात जन्माला आली. हे आंदोलन पूर्णाशाने नसलं तरी काही अंशी सफल झालं. जमिनीचे तुकडे शेतकऱ्यांच्या नावे करण्याची वेळ आली तेव्हा संघर्ष वाहिनीने कुटुंबातील स्त्रियांच्या नावे करण्याचा आग्रह धरला. शेवटी सरकारला ते मान्य करावं लागलं. कदाचित देशातील ही पहिली घटना होती जेथे मालकी हक्कांत स्त्रियांची नावं लिहिली गेली. शेतकरी महिला आणि त्यांचा मालकी हक्क हा प्रयोग बोधगया परिसरात झाला, त्याचे श्रेय वाहिनीतील या युवतींना जातं.

संघर्ष वाहिनीत असताना आमचं वय तिशीच्या आतलं होतं. आम्ही विविध विषयांवर रात्र-रात्र चर्चा करीत असू. स्त्री प्रश्न बहुतेक वेळी स्त्री विरुद्ध पुरुष याच पद्धतीने मांडला जायचा. साधारणपणे मार्क्‍सवादी प्रभावाखालील मांडणी असायची. स्त्री-मुक्तीवादी नेत्यांशी ही विचारसारणी मिळतीजुळती असायची. आम्ही कोणत्याही विचारसरणीला बांधलेले नव्हतो. प्रामाणिकपणे जग समजावून घेण्याची धडपड करणारे होतो.

मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीच्या काळात मी औरंगाबादला होतो. बापू काळदाते यांच्या घरीच राहायचो. ते त्या वेळी खासदार होते. त्यांच्या कामात शक्य तेवढी मदत करायचो. याच काळात शांताराम आणि मंगलची घनिष्ठ ओळख झाली. मंगलची धडाडी आणि शांतारामचा समजूतदारपणा. हे कार्यकर्ता जोडपं विलक्षण होतं. अत्यंत हाल सोसून त्यांचा संसार चालला होता. त्यांच्या नात्याचं मला कौतुक वाटायचं. आदरही वाटायचा.

याच काळात माझं लग्न झालं. आशा ही माझ्या बहिणीची वर्गमैत्रीण. तिला सामाजिक कामाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. मी आणीबाणीत तुरुंगात असताना तिच्याशी पत्रव्यवहार झाला होता. जेलमधून सुटून आल्यावर मला भेटायला म्हणून माझ्या बहिणीसोबत ती अंबाजोगाईला आली होती. ती अहमदनगर जिल्ह्य़ातील धर्मातरीत ख्रिश्चन कुटुंबातली. आम्ही लगेच लग्नाचा निर्णय केला. आमच्या वडिलांना मुलीच्या निवडीबद्दल तक्रार नव्हती. त्यांना वाटत होतं की, तिने मुसलमान व्हावं. मला त्याची गरज वाटत नव्हती. आशा मेडिकल कॉलेजमध्ये स्टाफ नर्स होती. तिला क्वार्टर मिळालं होतं. आम्ही एकत्र राहू लागलो. यानंतर मला स्त्रीचं नवं रूप अनुभवता आलं.

माया देशपांडेच्या सल्ल्यानुसार गर्भारपणाचं नऊ महिने मी आशा सोबत राहिलो. आशाची आई लहानपणीच वारलेली. घरात हीच थोरली. आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे परकेपणा आलेला. बाळंतपण अंबाजोगाईतच करायचं ठरलं. तिला वॉर्डात नेलं. तेव्हा तिच्या बरोबर कोणीच नव्हतं. तिची सहकारी मैत्री ण तेवढी होती. वार्डातल्या नस्रेस ओळखीच्या होत्या. मी कोणाचंच बाळंतपण पाहिलं नव्हतं. कल्पनेनेच अस्वस्थ झालो होतो. माझी अस्वस्थता तेथील डॉ. भावठाणकर यांच्या लक्षात आली. त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये नेले. आणि सांगितलं, ‘बाळंतपण हा आजार नाही. ही नैसर्गिक क्रिया आहे. आदीम काळापासून चालत आलेली..’ माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि मला शांत वाटायला लागलं.

याच काळात शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू झालं होतं. शेतकरी म्हणजे एक दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या प्रक्रियेतील घटक. या आंदोलनात स्त्रियांचा सहभाग मोठा होता. स्त्री प्रश्न जाणून घेण्याचं जे कुतूहल होतं तेच कुतूहल घेऊन आम्ही शेतकरी आंदोलनात सहभागी झालो होतो. लवकरच शरद जोशी यांना शेतकरी आंदोलनात स्त्री प्रश्न मांडण्याची आवश्यकता वाटू लागली. चांदवडला प्रचंड मोठा स्त्रियांचा मेळावा झाला. दारू दुकान बंदी, स्थानिक स्वराज्य संस्थात स्त्रियांचा पॅनल उभा करणं करीत हे आंदोलन स्त्रियांच्या मालमत्तेच्या हक्काला जाऊन भिडलं. जमिनीचा एक भाग कुटुंबातील स्त्रीच्या नावे करून देण्याचं आवाहन शरद जोशी यांनी केलं. त्याला ‘लक्ष्मी मुक्ती’ असं नाव देण्यात आलं. शेतकरी आंदोलनाने स्त्रियांचा प्रश्न हा सर्जकांचा प्रश्न असल्याची जाणीव करून दिली. व स्त्रीची नवी ‘हैसियत’ माझ्यासमोर उभी राहिली.

अम्मीजान पासून सुरू झालेल्या स्त्री समजावून घेण्याच्या प्रवासाला येथे पूर्णविराम लागला असं मी मानत नाही. किंबहुना आता खरा प्रवास सुरू झाला आहे असं मला वाटतं.

habib.amar@gmail.com

chaturang@expressindia.com

संघर्ष वाहिनीचे सहकारी रमेश बोरोले आणि त्यांच्या पत्नी शैला यांच्यासमवेत अमर हबीब.

First Published on November 17, 2018 2:55 am

Web Title: article about amar habib explaining the woman