|| डॉ. भारत पाटणकर

चळवळीचा विचार करताना महात्मा जोतिराव फुले यांनी जी सामाजिक फळी बांधण्याची संकल्पना मांडली ती होती ‘स्त्रीशूद्रातिशूद्र’ अशा शब्दात व्यक्त केलेली. कोणत्याही जनचळवळीची शक्ती अशा समाज विभागांच्या भक्कम सहभागातूनच उभी राहू शकते. स्त्रियांचा सहभाग जेवढा कमी तेवढय़ा प्रमाणात त्या चळवळीचे यश अवघड. विद्यार्थीदशेतल्या चळवळीपासून ते आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर अनुभवलेल्या सर्व चळवळींपर्यंत हे सत्य मला अनुभवायला मिळाले आहे. त्याचबरोबर ‘ज्या चळवळीत स्त्री कार्यकर्त्यांचा सहभाग कमी त्या चळवळींच्या चुका जास्त’ हे सूत्रही मला या प्रदीर्घ कालखंडात ध्यानात आले.

स्त्रीशक्तीचे दर्शन मला विद्यार्थीदशेतल्या चळवळीत झाले होतेच, पण खरे दर्शन मात्र मला शेतमजूर – गरीब शेतकऱ्यांच्या चळवळीने घडवले. मी त्या वेळी अवघा पंचवीस वर्षांचा होतो. ‘मागोवा’ गटाच्या कामकाजात मी सहभागी झालो होतो. १९७४ च्या गिरणी कामगारांचा एक ऐतिहासिक संप मी साक्षीदार म्हणून अनुभवला होता. शहादा, तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा या तत्कालीन धुळे जिल्ह्यतील परिसरामधल्या चळवळींमध्ये मी सहभाग सुरू केला होता. या पाठोपाठ मी स्वत: एक कार्यकर्ता म्हणून अंगावर जबाबदारी घेतलेली चळवळ माझ्या गावी आम्ही उभारली. धुळे जिल्ह्यप्रमाणेच ‘श्रमिक संघटना’ या नावाने उभारली १९७२-७३-७४ च्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर ही चळवळ उभी राहिली. या चळवळीत हजारोंच्या संख्येने स्त्रिया सहभागी झाल्या. धुळे जिल्ह्यतल्या आदिवासी भागापेक्षा हे अवघड होतं. कारण तिथली चळवळ प्रामुख्याने आदिवासी स्त्री-पुरुषांची बनली होती. आणि इकडे मात्र या स्त्रिया वेगवेगळ्या जातींमधल्या होत्या. त्यांच्यामध्ये जातींची उतरंड होती. जातीच्या अदृश्य भिंती होत्या. त्यांनी एकत्र येऊन लढा उभारण्यासाठी या परिस्थितीवर मात करणं अटळच होतं. त्यांनी तशी मात केली.

स्त्रिया म्हणूनही त्यांचं स्थान पुरुष शेतमजूर-गरीब शेतकऱ्यांपेक्षा कनिष्ठ होतं. त्यांनी ताठ मान करून घोषणा देणं आणि रस्त्यावरच्या मोर्चात सहभागी होणं, या दडपणाला झुगारून दिल्याशिवाय शक्य नव्हतं. हे धाडस त्यांच्याच थरातल्या पुरुषांच्या संदर्भात दाखवण्याबरोबरच ते शोषक जमीनदार असलेल्या पुरुष धनदांडग्यांविरुद्ध दाखवणंसुद्धा गरजेचं होतं. तेही त्यांनी दाखवलं. खुल्या मैदानामध्ये त्यांनी आरोळी ठोकली, ‘‘आम्हीही माणसं आहोत.’’

या लढय़ाच्या निमित्तानं मी पहिली स्त्री कार्यकर्ती रणरागिणी म्हणून पाहिली ती माझी आईच. अनेक वर्षांनंतर ती पुन्हा लढय़ाच्या मैदानात उतरली. याआधी मी तिचं, सामाजिक कार्यात भाग घेणारी कार्यकर्ती हे स्वरूप पाहिलं होतं. शिबिरांमध्ये सहभागी होताना पाहिलं होतं. पण या वेळी रस्त्यावरची आणि लांब पल्ल्यानं चालणारा संघर्ष संघटित करणारी, मागण्यांचं स्वरूप ठरवणारी, मोर्चात घोषणा देणारी कार्यकर्ती म्हणून मला तिचं दर्शन झालं. तिच्या तारुण्याच्या काळात समाजवादी पक्ष किंवा डावा समाजवादी पक्ष यांच्या नेतृत्वाखाली जरी स्त्रियांच्या चळवळी होत्या तरीही त्या चळवळी स्वायत्त नव्हत्या. पुरुष कार्यकर्त्यांची प्रभुत्वशाली भूमिका त्यात होती. १९७३-७४ मध्ये संघटित होत गेलेल्या या चळवळीत इंदूताई पाटणकर याच प्रमुख संघटक होत्या. त्यांची, चळवळीविषयीची समज या चळवळीमागची प्रमुख शक्ती होती. त्यांचे संघटनकौशल्यसुद्धा या प्रसंगी कळीचे ठरलेले होते.

मी माझ्या आईलाच एक नवीन समर्थ कार्यकर्ती म्हणून पुढे येताना पाहात होतो. तिच्यात एक नवे बळ संचारलेले पाहात होतो. विधवा, परित्यक्ता, अन्यायग्रस्त  स्त्रियांना मदत करणारी सामाजिक कार्यकर्ती. एकंदरीनेच गरीब, कष्टकरी कुटुंबाच्या अडचणी सोडवणारी कार्यकर्ती या नात्याने तिची ओळख होती. प्रतिसरकारमध्ये ज्या, एका हाताच्याच बोटावर मोजण्याइतक्या कार्यकर्त्यां होत्या त्यापैकी एक कृतिशील, धाडसी कार्यकर्ती म्हणून तिची ओळख होती. श्रमिक संघटनेच्या चळवळीची बांधणी करण्यात पुढाकार घेणारी कार्यकर्ती म्हणून ती नव्याने घडली. स्वत:ची नवी ओळख तिने निर्माण केली.

कासेगावमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शाखा होती. माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली  काम केलेले कार्यकर्तेच पक्षाचे पुढारी होते. त्यांना शेतमजूर-गरीब शेतकऱ्यांची चळवळ मान्य नव्हती. त्यांनी माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या बाबतीत आईकडे तक्रार केली. ‘‘भारत आणि त्याचे मित्र (यात त्यांच्यापैकीही काहींची मुले होती) चुकीचे काम करीत आहेत. शेतमजुरांना संघटित करून शेतकऱ्यांविरुद्ध उठवीत आहेत. हे सर्व आमच्याविरुद्ध आहे. त्याला थांबवा.’’ असे त्यांचे म्हणणे होते. इंदूताईंनी त्यांना ठामपणे सांगितले की, ‘‘भारत आणि त्याचे मित्र योग्यच करीत आहेत. शेतमजूर-गरीब शेतकरी त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या शोषणाला संपवण्यासाठी उभे राहात आहेत. उलट जर तुम्ही खरेच कम्युनिस्ट असाल तर या मुलांना तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. मी स्वत:च आता ही चळवळ बांधण्यात पुढाकार घेत आहे.’’

आमच्या कासेगावच्या घरीच कम्युनिस्ट पक्षाची शिबिरे होत असत. नेते येत असत. या शिबिरातून त्यांना काय कळले हाच प्रश्न इंदूताईंना पडला होता. मी कम्युनिस्ट पक्षात नाही हेपण आईला चांगले माहीत होते. त्याची कारणे तिला पटलेली होती. कम्युनिस्ट पक्ष ज्या चळवळी बांधतात त्या शोषणाचा अंत करण्याकडे जाणारी पक्की दिशा असलेल्या नसतात. समाजातले जे घटक सर्वात जास्त शोषण होणारे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या प्रमुख सहभागाने आणि त्यांचे हित मध्यवर्ती ठेवून चळवळी करण्याची त्यांची रीत नाही असे आमचे म्हणणे होते. जातीय शोषण, स्त्रियांचे शोषण या मुद्दय़ांना तर ते फारसे महत्त्वच देत नाहीत अशी आमची त्यांच्यावर टीका होती. ही टीका या पक्षांच्या नेतृत्वालाही राग आणणारी होती. पण एक जुन्या पिढीतली कार्यकर्ती म्हणून आईला राग येण्याऐवजी तिने आमच्या भूमिकेचे स्वागत केले. इंदूताई पाटणकर नव्या पिढीच्या, नव्या विचारांच्या स्वागताला उभ्या राहिल्या. एवढेच नाही तर त्यांनी या भूमिकेचे प्रवक्तेपण सुरू केले! भूमिकेच्या पातळीवर आणि व्यवहाराच्याही पातळीवर त्या आमूलाग्र नव्या घडल्या.

इंदूताईंच्या अशा नव्या स्वरूपातल्या आणि झोकून देण्याच्या पद्धतीने काम करण्याच्या रीतीने चाललेल्या सहभागामुळे चळवळीतला स्त्रियांचा सहभाग प्रचंड वाढला. एकटय़ा कासेगाव गावचा मोर्चा दीड ते पावणेदोन हजारांच्या सहभागाचा होता. स्त्रियांचा सहभाग निम्म्यापेक्षाही जास्त होता. कासेगावची लोकसंख्या त्या काळात दहा हजारांपेक्षा कमी होती!

दलित जातींमधून, बलुतेदार आणि शेतकरी जातींमधून आलेल्या स्त्रियांचा सहभाग तेवढय़ाच टक्केवारीने होता. त्या त्या गल्ल्यांमध्ये स्त्रियांमधून संघटक निर्माण झाल्या. धाडसाने बोलणे सुरू झाले. जातीच्या उतरंडीमुळे आलेला मनातला दुरावा, उच्च-नीच भावना यांच्यावर मात करण्याची शक्ती यांच्यामध्ये आली. मी स्वत: लहानपणापासून शेतीतली कष्टाची कामे उन्हात-पावसात केलेली असल्यामुळे याबाबतीत असलेली परिस्थिती मला प्रत्यक्ष अनुभवातून माहीत होती. आज ती परिस्थिती बदलताना मी अनुभवत होतो. दुराव्याचे, उतरंडीचे, तिरस्काराचे रूपांतर प्रेम आणि मैत्रीमध्ये होत असलेले दिसत होते. त्यामुळेच मोठा सहभाग आणि पक्की एकजूट निर्माण होत होती. धनदांडग्या आणि शेतदांडग्या धुरिणांनी जातीच्या, भावकीच्या पायावर केलेला फूट पाडण्याचा प्रयत्न जनतेने उधळून लावला होता.

तळागाळातल्या स्त्रिया बदलत होत्या. फूट पाडण्याचा प्रयत्न उधळण्यात सर्वात जास्त भूमिका त्यांनीच पार पाडली होती. स्त्री असल्यामुळे त्यांच्या कुवतींमध्ये स्वयंप्रेरणेतली माया जी असणारच ती त्यांच्या मदतीला आली होती.

धुळे जिल्ह्यत, शहादा – तळोदा – नंदुरबार – अक्कलकुव्याकडे यापेक्षासुद्धा जास्त जुनी आणि विकसित झालेली चळवळ होती. अजूनही आदिवासींमध्ये सांस्कृतिक-सामाजिक-आर्थिक एकसंधता होती. पण तेवढय़ाच प्रमाणात दुसऱ्या बाजूला मालदारांची दडपशाही आणि दहशतपण होती. या सर्वातूनही एक वादळी चळवळ उभी राहिली होती. जातीची उतरंड एकजुटीच्या आड येण्याचा फारसा मुद्दा नव्हता. स्त्रियांना जास्त स्वातंत्र्य, जास्त स्वायत्तता असल्याने त्यांचा सहभाग होणे जास्त सुलभ होते. सोपे नव्हतेच, पण तुलनेने सुलभ होते.

या पाश्र्वभूमीवर श्रमिक संघटनेच्या तिथल्या चळवळीतून कार्यकर्त्यांचे मोहोळ उठले. पुरुष कार्यकर्त्यांबरोबरच स्त्री कार्यकर्त्यां गावोगावच्या तरुण मंडळांमधून पुढे आल्या. त्यापैकी काही जणी तर एकंदर चळवळीचे नेतृत्व करू लागल्या. समर्थपणे, मोठमोठय़ा सभांमध्ये घणाघाती भाषणे करू लागल्या. बैठकांमध्ये स्वत:चे विचार मांडू लागल्या.

भुरीबाई, ठगीबाई, इंदूबाई, हिरकणा अशी अनेक नावे घेता येतील. या आणि इतर काहीजणी एकंदर चळवळीमध्ये पुढाकार घेत असत. भुरीबाई तर स्वत:चे विचार, एकंदर भूमिकेला धक्का न लावता, भाषणाच्या माध्यमातून विस्तारित करण्याची प्रचंड कुवत असणारी कार्यकर्ती बनली. एक वेगळी भूमिका घेऊन आणीबाणीपूर्वीची विधानसभा निवडणूक त्या काळी श्रमिक संघटनेने लढवली होती. या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून संघटनेने भुरीबाईची निवड केली होती. कष्टकरी जनतेची, पैसे नसलेली, शोषकांच्या दडपशाहीला आव्हान देणाऱ्या चळवळीची आणि स्वत: शेतमजुरी करणारी, शेतमजूर कुटुंबातली स्त्री उमेदवार ताकदीने या लोकशाही प्रक्रियेला सामोरी गेली. न घाबरता संघटनेबरोबर उभी राहिली. या निवडणुकीत जरी पराभव झाला तरी भुरीबाईच्या वादळी सहभागामुळे आणि संघटनेने केलेल्या झंझावाती प्रचारमोहिमेमुळे ही निवडणूक एक ठसा उमटवून गेली. विचारांची घुसळण घडवून गेली. गरीब माणसेसुद्धा निवडणुकीच्या काळातल्या सर्व दबावाला झुगारून देऊन लोकशाहीचे खरे स्वरूप प्रस्थापित करू शकतात याचे दर्शन या मोहिमेतून घडवले गेले. भुरीबाई या सर्वात आघाडीवर होती.

ठगीबाई ही श्रमिक संघटनेच्या परिसरातील ‘स्त्रीमुक्ती’ संघटनेचे काम करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या फळीतून घडलेली कार्यकर्ती. तिने स्वत:ची समज प्रचंड ताकदीने विकसित केली. श्रमिक मुक्ती दलाच्या चळवळीत तिचा सहभाग मोलाचा राहिला. ठगीबाईसुद्धा शेतमजूर – गरीब शेतकरी थरातून आलेली कार्यकर्ती. पण ती धाडसी बनत गेली. तिची समज वाढत गेली. शोषणमुक्तीच्या चळवळीची भूमिका तिने आत्मसात केली. केवळ आत्मसात केली असे नाही तर अशी भूमिका मांडण्याची कुवत तिने विकसित केली. गेल्या वर्षी शहाद्याला झालेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या साहित्य संमेलनामध्ये स्त्रीमुक्ती चळवळीविषयीच्या सत्रात ठगीबाईने केलेली मांडणी ही आश्चर्यकारकरीत्या, इतर सहभागी असलेल्या संशोधन क्षेत्रात चांगले कार्य केलेल्या स्त्रीमुक्ती चळवळीतल्या व्यक्तींपेक्षा सरस होती. ग्राम्शीची ‘ऑर्गॅनिक इंटलेक्चुअल’ ही कल्पना प्रत्यक्षात उतरलेली पाहायची असेल तर ठगीबाईमध्ये ती मूर्तिमंत दिसते असे माझे मत झाले.

नेहमीच्या जगण्याची दररोजची ‘लढाई’ म्हणजेच कसेतरी जिवंत राहण्याची लढाई निकराने करावी लागणाऱ्या घटकांमधून या स्त्रिया पुढे आल्या. आजही त्यांना अशीच लढाई लढायला लागत आहे. यातूनही असा समजदार जिवंतपणा जोपासणे अशक्यप्राय वाटणारे आहे. पण त्यांनी ते शक्य बनवले.

हिरकणा ही प्रसिद्ध आदिवासी आणि परिवर्तनशील कवी वाहरू सोनावणे या आमच्या सहकाऱ्याची सहचारिणी. पूर्णवेळ कार्यकर्त्यांबरोबर सहजीवन जगण्याचे दिव्य जगत जगत तिनेही स्वत:ला विकसित केले. एकेमेकांच्या साथीने सर्व प्रसंगांना तोंड देत संसाराचा आणि चळवळीचा गाडा पुढे नेला. स्त्रीमुक्तीची चळवळ, आदिवासी एकतेची चळवळ, श्रमिकांची चळवळ या सर्वामध्ये सहभाग केला. खंड पडू दिला नाही.

या दिव्य घटना आहेत. एका अर्थाने या अघटित प्रक्रिया आहेत. अंतरीच्या ओढीतूनच यांचा जन्म होऊ शकतो.

krantivir@gmail.com