21 February 2019

News Flash

माणूसपणाकडे..

मिलिंद चव्हाण यांना सामाजिक क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव सलग चार लेखांतून दर शनिवारी..

मिलिंद चव्हाण सामाजिक क्षेत्रात काम करताना

‘‘माणसाला माणूसपण नाकारणाऱ्या जात, लिंग, धर्म, पंथ, प्रांत, वंश, लैंगिकता, राष्ट्र, वर्ण अशा भेदांविरोधात आपण आवाज उठवला पाहिजे आणि आपले ज्ञान आणि कौशल्य समग्र मानवांच्या मुक्तीसाठी वापरले पाहिजे, हा दृष्टिकोन काम करता करता पक्का होत गेला. ’’ याच भूमिकेतून काम करणाऱ्या मिलिंद चव्हाण यांना सामाजिक क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव सलग चार लेखांतून दर शनिवारी..

मिलिंद चव्हाण १९९१ पासून पुरोगामी चळवळीत कार्यरत असून ‘मासूम’ या संस्थेबरोबर त्यांनी पंधरा वर्ष काम केले. दरवर्षी पुण्यात, राज्यात ठिकठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘लोकशाही उत्सवा’च्या संयोजनात महत्त्वाची भूमिका. विविध चळवळी-आंदोलनात सहभाग. समानता, सामाजिक न्याय, स्त्रियांवरील हिंसाचार, धर्मनिरपेक्षता, मानवी हक्क, पुरुषत्व-मर्दानगी, इत्यादी विषयांवर संस्था-संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी-युवा व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षणांमध्ये प्रशिक्षक-व्याख्याता म्हणून सहभाग. ‘स्त्रियांवरील हिंसाचार’, ‘समानतेसाठी पुरुषांबरोबर काम’ इत्यादी मुद्दय़ांवर काही संस्थांसाठी सल्लागार म्हणून काम.

कोणत्याही पालकांची आपल्या मुलांबद्दल स्वप्ने असतात, तशीच माझ्याही पालकांची होती आणि ती टिपिकल मध्यमवर्गीय होती. १९९१ मध्ये देशाने स्वीकारलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या काळाशी तर ती अतिशय सुसंगत होती. भांडवली अर्थव्यवस्थेत ‘अधिकाधिक पैसा मिळवणे’ हीच ‘यशा’ची व्याख्या असल्याने, तुमचा ‘कल’, ‘पिंड’ वगैरे गोष्टी फिजूल ठरतात. पण ‘अर्थव्यवस्थेसह इतर व्यवस्थाही आपल्या स्वप्नांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात’, ही समज तेव्हा नव्हती. (उदाहरणार्थ भांडवली पितृसत्ताक व्यवस्थेत करिअर करायचे ते घर सांभाळूनच, हे बहुतांश स्त्रियांचे स्वप्न असते आणि पुरुषांनी मात्र करिअरवरच लक्ष केंद्रित करायचे असते!)

माझे शालेय शिक्षण कोकणातल्या पोलादपूर तालुक्यात कापडे बुद्रुक या गावी झाले. आई मंदाकिनी शिक्षिका होती तर वडील रामचंद्र हे छोटे दुकान चालवत आणि शिकवण्या घेत. त्यांचे दोघांचेही आईवडील पुण्यातले. त्यामुळे आपल्या मुलाने पुण्यात जाऊन शिकावे, असे त्यांना वाटे. त्यानुसार माझी रवानगी पुण्यात शास्त्र शाखेत झाली. मात्र बारावीला मी नापास झाल्याने त्यांना आणि मलाही खूप धक्का बसला. दरम्यान, सेल्समन वा इतर कामे करून मी पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केले. पुढे नेमके काय करायचे आहे, याची स्पष्टता नव्हती. ती असायलाच हवी का आणि कशासाठी? व्यक्तीला ज्यात आनंद वाटतो तेच त्या व्यक्तीचे करिअर का होऊ नये? हा पुन्हा व्यवस्थेशी निगडित असलेला प्रश्न. मग कला शाखेत बहि:स्थ विद्यार्थी म्हणून बारावीची परीक्षा देऊन चांगले गुण मिळाले! त्यात तत्त्वज्ञान या विषयात ऐंशीपेक्षा जास्त गुण मिळाल्याने मला आणखीनच धक्का बसला! आता तरी आपल्या मुलाची गाडी ‘मार्गाला’ लागेल, ही पालकांची अपेक्षा होती. पण घडायचे काही वेगळेच होते.

१९९१ मध्ये पुणे जिल्ह्य़ात प्रौढ साक्षरता मोहीम सुरू होती. शक्य आहे त्यांनी प्रौढांना शिकवण्याच्या कामात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन वर्तमानपत्रात आले होते. माझ्याकडे भरपूर वेळ असायचा. त्यामुळे दिलेल्या ठिकाणी संपर्क साधला. मात्र प्रौढ साक्षरता वर्ग ग्रामीण भागात असल्याने वर्ग चालवण्याच्या कामात सहभागी होता येणार नाही, पण साक्षरतेसाठी जाणीवजागृती व्हावी म्हणून पथनाटय़ शिबिरे घेणे, यासारख्या कामात सहभागी होता येईल, असे कळले. हा गट भारत ज्ञान विज्ञान समितीचा होता. या कामात आनंद आणि समाधान मिळू लागले. वाचन, अभ्यास करण्यापेक्षा केवळ काहीतरी कृती करत राहणे जास्त महत्त्वाचे आहे, असे तेव्हा वाटे.

‘चांगले’ काम करत राहायचे, या ऊर्मीतून वर्तमानपत्रातील एका आवाहनानुसार एका संघटनेकडे गेलो. एका संस्थेमार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ती संघटना चालवली जात होती आणि काही उपक्रम सुरू होते. बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा मी संबंधित संस्थेमार्फत दुर्गम आदिवासी भागातील एका कामात सहभागी होतो. त्यामध्ये त्या संस्थेच्या शाळेतील आठवी-नववीचे विद्यार्थीही सहभागी होत असत. मशीद पाडल्याबद्दल त्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केल्यावर धक्काच बसला! लहानपणी कोकणात गणपती विसर्जनाला हिंदूंबरोबर मुसलमानही असतात आणि मोहरममध्ये ताबूतासमोर मुसलमानांबरोबरच हिंदूही नाचतात, हे पाहिलेल्या आणि पुण्यात एकटा राहात असताना, जोहरा शेख यांनी मुलाप्रमाणे वागवल्याचा अनुभव असल्याने मला हा ‘आनंद’(?) समजण्यापलीकडचा होता! धर्मवादी राजकारण स्त्रियांच्या, मानवी हक्कांच्या आणि लोकशाहीच्या विरोधात असते, याची समज तेव्हा नव्हती. पण यथावकाश सामाजिक कामाबाबतच्या दृष्टिकोनातले फरक लक्षात येऊ लागले. प्रस्थापितांच्या दृष्टीने ‘सामाजिक कामा’चा अर्थ परिस्थिती ‘जैसे थे’ राखणे असा असतो तर परिवर्तनवाद्यांच्या दृष्टीने लोकशाही- धर्मनिरपेक्षता- समतेवर आधारित, भेदभाव, हिंसा आणि शोषण यांपासून मुक्त समाज निर्माण होण्यासाठी काम करणे हा असतो, हे उमगत गेले.

साक्षरता आंदोलनात पुण्यातल्या वस्त्यांमध्ये केलेले काम समाजातील विषमतांबाबतची समज वाढवणारे होते. निरक्षरांमध्ये स्त्रियांचे प्रमाण अधिक असल्याने साक्षरता वर्गाला स्त्रियांचा प्रतिसाद असे. काही स्त्रियांना सायकल शिकवण्याचाही आम्ही प्रयत्न केला. स्त्रियांचे दुय्यम स्थान, कौटुंबिक हिंसाचार, जातीभेद हे गंभीर प्रश्न आहेत, हे वस्त्यांमध्ये काम करताना लक्षात येत गेले. एका वस्तीत दिवाळीनंतर एका बाईंनी खाण्याचा आग्रह केला. मात्र घरीच नाश्ता केला असल्याने मी नकार दिला. त्यावर, ‘तुम्हाला आमच्या हातचं चालत नाही का?’ असा प्रश्न बाईंनी विचारला. माझ्या मनात असे काहीच नव्हते. पण त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून मुद्दामहून त्यांच्याकडे लाडू-चिवडा खाल्ला. त्यांनतर कुठेही गेलो तरी थोडे का होईना खाणे, चहा घेणे किंवा निदान पाणी पिणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात आले. आपण कार्यकर्ते म्हणून कसे वागतो, याकडे लोकांचे बारकाईने लक्ष असते. कार्यकर्ता म्हणून आपली ऊठबस केवळ प्रस्थापितांबरोबर असून चालणार नाही, तर शोषित वंचित गटांप्रति आपली बांधिलकी असेल, हे समजत गेले. माणसाला माणूसपण नाकारणाऱ्या जात, लिंग, धर्म, पंथ, प्रांत, वंश, लैंगिकता, राष्ट्र, वर्ण अशा भेदांविरोधात आपण आवाज उठवला पाहिजे आणि आपले ज्ञान आणि कौशल्य समग्र मानवांच्या मुक्तीसाठी वापरले पाहिजे, हा दृष्टिकोन नंतर पक्का होत गेला.

नर्मदा बचाओ आंदोलनात शाळा चालवण्याच्या निमित्ताने नर्मदेच्या किनारी काही महिने जाऊन राहण्याचा अनुभव शहरातल्या कामापेक्षा वेगळा होता. विकासाच्या नावाखालील विस्थापन आणि आदिवासींचा लढा जवळून पाहता आला. मेधा पाटकरांबरोबर काम करणे हा विलक्षण अनुभव होता. प्रचंड अभ्यास आणि सर्वस्व झोकून देऊन काम करणे याचा त्या वस्तुपाठ आहेत. त्यानंतर डहाणूच्या आदिवासी भागात बालशिक्षणासाठी कार्यरत ‘ग्राममंगल’ संस्थेतील अनुभव, पुण्यातील सामाजिक-आर्थिक संशोधन करणाऱ्या संस्थांबरोबर माहिती एकत्रित करण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागात केलेले काम समाजाच्या वंचित-शोषित गटाबाबतची माझी संवेदनशीलता वाढवणारे ठरले. हे काम करतानाच बहि:स्थ एम.ए. (मराठी) पूर्ण केले.

‘मासूम’ या स्त्रीवादी संस्थेबरोबर पंधरा वर्षे केलेले काम लिंगाधारित समानता, हिंसाचार, मानवी हक्क, लोकशाही मूल्ये इत्यादी मुद्दय़ांबाबतचे आकलन समृद्ध करणारे होते. मनीषा गुप्ते, रमेश अवस्थी आणि ‘मासूम’मधील सहकाऱ्यांबरोबर काम करताना संस्थात्मक काम आणि संघटनात्मक काम या दोन्हींची बलस्थाने आणि मर्यादा लक्षात येत गेल्या. स्त्रियांवरील हिंसा थांबावी म्हणून पुरुषांबरोबर काम, त्याचाच भाग म्हणून पुरुषांसाठी चालवलेले व्यसनमुक्तीचे गट, नववीच्या विद्यार्थ्यांबरोबर सुरू केलेले लोकशाहीबाबतचे मूल्यशिक्षण, कार्यकर्त्यांची प्रशिक्षणे अशा अनेक कार्यक्रमांमधून सामाजिक विषयांची व्यामिश्रता लक्षात येत गेली. प्रशिक्षणावर असलेला भर समज वाढवण्यासाठी महत्त्वाचा होता. प्रशिक्षक म्हणून माझी कामाची सुरुवातही याच काळात झाली. अनेक संस्था-संघटनांसाठी, कार्यकर्ते, गाव/वस्ती पातळीवरील लोक, सरकारी अधिकारी अशा विविध समूहांबरोबर प्रशिक्षक/ सल्लागार/ मेंटॉर म्हणून काम करताना जातीव्यवस्था, पितृसत्ता, वर्गव्यवस्था इत्यादींची आपली समज अधिक सखोल होत जाते. एखाद्या विषयाची गुंतागुंत आपल्याला ‘समजली’ अशी अंतिम अवस्था नसते तर विषय समजणे ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असते आणि ती आयुष्य संपले तरी संपणारी नाही, याची जाणीव या कामांमधून होते. महाराष्ट्रातील एका जातीत पुरुषांनी मटण खाल्लेले चालते मात्र, स्त्रीने -तिला खावेसे वाटत असेल तरी- खायचे नाही, हे काही काळापूर्वी मराठवाडय़ात गेलो असताना समजले! स्त्रियांची सुंता करण्याची क्रूर पद्धत फक्त आफ्रिकेत आहे, असा माझा समज होता. मात्र भारतातही विशिष्ट गटांमध्ये ही कुप्रथा आहे, हे या प्रथेविरुद्ध आवाज उठवणे सुरू झाल्यावर अलीकडेच समजले.

कुठलाही कार्यकर्ता, परिवर्तनवादी संस्था-संघटना (किंवा कलाकार वा कोणीही संवेदनशील ‘माणूस’) समकालीन सामाजिक वास्तवापासून दूर राहूच शकत नाही. गुजरातमधील २००२च्या मानवसंहारानंतर ‘मासूम’ने पुण्यात ‘लोकशाही उत्सव’ सुरू केला आणि राज्यात इतरत्रही आता तो आयोजित केला जाऊ लागला आहे. या उत्सवाचा प्रमुख संयोजक म्हणून काम करताना, एकूणच लोकशाही व्यवस्थेबाबतची समज वाढत गेली. या प्रक्रियेत शांता रानडे, रा. प. नेने, सुनीती सु. र. आणि अंजली मुळे या वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कायम प्रोत्साहन दिले. सामाजिक कार्यात स्वत:चे स्वतंत्र स्थान असताना या चौघांनीही पुढची पिढी तयार व्हावी म्हणून दिलेले प्रोत्साहन त्यांची मुद्दय़ांबाबतची बांधिलकी दर्शवते. ‘लोकशाहीत कोणीच कोणाचा शत्रू नसतो, असतात ते वैचारिक विरोधक’ हे नेने सरांचे वाक्य कायमचे लक्षात राहिले आहे.

सामाजिक कामातच भेटलेल्या सीमा काकडेबरोबर पुढचे आयुष्य एकत्रित घालवायचे ठरले आणि आंतरजातीय, शिवाय नोंदणी पद्धतीने लग्न केले म्हणून घरच्यांचा रोष ओढवून घेतला. काही वर्षांनी तो रोष मावळला. सीमाच्या आई सविता आणि वडील श्रीकांत यांचा मात्र पाठिंबा होता. तो महत्त्वाचा ठरला. माझ्या आईमुळे आणि सीमामुळे आयुष्य समृद्ध झाले. कोणी एक ‘पायाचा दगड’ न होता दोघेही एकमेकांच्या प्रगतीसाठी एकमेकांना प्रोत्साहन देत असतो. आज सीमा रोजगार हमी या विषयात पीएच.डी. करते आहे आणि मी ही आता सामाजिक काम करता करता नीट अभ्यास करावा, यासाठी प्रयत्न करतोय!

स्त्रियांवरील हिंसेविरोधात बोलायचे असेल तर तुम्हाला पितृसत्तेबरोबरच जातीव्यवस्था, आर्थिक विषमता आणि एकूण सर्वच प्रकारच्या हिंसेविरोधात बोलावे लागते. या जाणिवेतूनच शिस्तीच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेला विरोध आणि सकारात्मक पद्धतीने शिस्त रुजवण्यासाठी काम करणाऱ्या अ-भय अभियानात, तसेच पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अ‍ॅण्ड डेमोक्रसी या गटाबरोबर, नागरी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या लोकस्वतंत्रता संघटनेबरोबरही कार्यरत आहे. या क्षेत्रात आलो नसतो तर कदाचित एक संकुचित नागरिक म्हणूनच जगत राहिलो असतो. सामाजिक कामाने मला अधिक चांगले माणूस बनवले. मुळात, कोणतेच सामाजिक काम एकटी व्यक्ती करू शकत नाही. अनेक जण त्यात आपापला वाटा उचलत असतात. त्यामुळे, खरे तर ‘मी’ला फारसा अर्थच नसतो.

आधी माझ्या कामाबाबत फारसे समाधानी नसलेल्या माझ्या आई-वडिलांना शेवटी मात्र आपल्या मुलाने चांगले काम केले याचे समाधान होते. मलाही आयुष्याची गोळाबेरीज मांडताना, ते नक्कीच असणार आहे!

मिलिंद चव्हाण milindc70@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on February 10, 2018 12:30 am

Web Title: milind chavan experiences while working in social sector