14 December 2017

News Flash

संपूर्ण सक्षमीकरणाकडे ..

कष्टकरी महिलांशी सततच्या संवादातून त्यांच्या गरजा जाणवत गेल्या तसतसे प्रकल्प उभे राहिले.

डॉ. मेधा पुरव सामंत | Updated: July 15, 2017 1:02 AM

कष्टकरी महिलांशी सततच्या संवादातून त्यांच्या गरजा जाणवत गेल्या तसतसे प्रकल्प उभे राहिले. लघुवित्त, विमा योजना, पाळणाघर, विद्यापूर्णा, अन्नपूर्णा महिला मंडळाचे पुनरुज्जीवन. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करायला निघालेली मी त्या परिवाराचं संपूर्ण सक्षमीकरण करायला कधी लागले हे कळलंच नाही. या प्रवासाच्या सुरुवातीला ‘मी’ होते ते ‘आम्ही’ झालो. अन्नपूर्णा परिवार हा ५ संस्थांचा समूह २५ वर्षांत उभा राहिला. ४०० कार्यकर्ते कर्मचारी, १०० सभासद प्रतिनिधी आणि अडीच लाख सभासद असा हा जिव्हाळ्याचा परिवार आहे.

अन्नपूर्णाच्या सुरुवातीची, १९९३ पासूनची १० वर्षे त्याचं कार्यालय माझ्या घरातच होतं. कोथरूडला गांधीभवन परिसरात माझ्या घराच्या जिन्याखालच्या एका छोटय़ा खोलीत दगडाच्या बैठकीला चादर घालून ३/४ माणसं बसतील एवढी बैठक, २ खुच्र्या व एक टेबल एवढय़ा जुजबी सामानासह आमचा ‘लघुवित्त’ कार्यक्रम उभा राहिला.

शून्य कर्मचारी वर्ग, कर्ज द्यायला/खर्चाला पैसे कसे उभे करायचे ते माहीत नाही. कर्ज देणे, हप्ते गोळा करणे, हिशोब लिहिणे, वेगवेगळ्या वस्त्यांमधील महिलांना गट करायला शिकवणे- ही सगळीच कामं मी एकटीच करत होते. माझ्या सहकारिणी म्हणजे शेवंताबाई, लक्ष्मीबाई, जहीदाबी, पाटीलबाई, सोजरबाई, ज्यांच्यापैकी फक्त पाटीलबाईंना लिहिता वाचता येत होतं, बाकी साऱ्या अंगठेबहाद्दूर. पण आमचा उत्साह मात्र दांडगा होता. पुण्यातील वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये माझ्या सहकारिणींच्या ओळखीच्या, नात्याच्या, भाजीवाल्या, फुलं- फळं विकणाऱ्या, मासेवाल्या, कोंबडय़ा-बकऱ्या पाळणाऱ्या महिलांकडे मला घेऊन जात. ‘‘ताईंचं पैसं घेऊन धंदा करा, ताईच्या पैशाला बरकत हाय’’ अशी माझी ओळख करून देत. त्यातील अंधश्रद्धेचा भाग माझ्या तत्त्वांविरुद्ध होता, पण त्यामागील कळकळ माझ्या मनाला भिडत होती. त्यांना वाटे, मेधाताईचं काम खूप वाढावं व आपल्यासारख्यांची गरिबी दूर व्हावी. अनेक अडचणी, मजेदार अनुभव यांनी भरलेले दिवस होते ते. कर्ज घ्यायला महिला, त्यांचे नातेवाईक दूरदूरून येत. आमची दगडाच्या सिंहासनाची, जिन्याखालच्या खोलीतील बँक बघून ‘ही होय बँक’ म्हणत. ३-४ वर्षांनी मी घर बदललं. कोथरूड बस स्टँडसमोरच्या इमारतीत. ‘अन्नपूर्णा’चं ऑफिस विंचवाच्या पाठीवरील बिऱ्हाडासारखं माझ्या गच्चीतील २ खोल्यांत स्थिरावलं. त्या इमारतीमधल्या रहिवाशांनी दर शनिवारी आमच्या गच्चीत भरणाऱ्या बैठकांचा धसकाच घेतला. एवढय़ा बायका, त्यासुद्धा गरीब, अशिक्षित दिसणाऱ्या त्या सोसायटीने कधी बघितल्याच नव्हत्या. त्यामुळे सतत तक्रारी येऊ  लागल्या व शेवटी २००३ मध्ये कर्वेनगर वस्तीत पत्र्याच्या २ खोल्या घेऊन ‘अन्नपूर्णा’चं ऑफिस तिथे हलवलं. वस्त्यांमध्ये महिलांचे गट करण्यासाठी मी फिरत असे. त्यापूर्वी मी चहा घेत नव्हते. पण ‘चहा नको’ म्हटल्यावर थंड आणलं जाई, म्हणून मी चहा प्यायला लागले. बिनदुधाचा, गुळाचा, शेळीच्या दुधाचा अशा सर्व प्रकारचा चहा मी प्यायला शिकले.

कोथरूड, औंध, पद्मावतीच्या वस्त्यांमध्ये, भाजीबाजार, मासळी बाजारात, टपरी दुकानांमध्ये मी कर्जाचे हप्ते गोळा करायला जाई. तेव्हा तिथे काही खासगी सावकार म्हणजे अण्णा/आक्का-मंडळी असत. ते मला त्यांच्यातील एक समजत. ‘‘सरा बाजूला. हितं तुमचं शिकल्याल्यांचं काय काम?’’ म्हणून ते मला बाजूला ढकलत. त्यावेळी माझ्या सभासद मला डोळ्यांनी खुणवत. ‘‘ताई यांना जाऊ दे, तुमचा हप्ता ठेवलाय गोणपाटाखाली.’’

पहिलं कर्ज मी तेव्हा १००० रुपयांचं देत असे. पण २-३ महिन्यांत ते फेडून बायका पुढचं कर्ज मागत. ‘‘आता हजार नको, दोन हजार हवे.’’ म्हणत. रविवार, सुट्टीचा दिवस तर दारासमोर बायका घोळके करून बसून राहात. मग कधी आईकडून, कधी नवऱ्याकडून, तर कधी छोटय़ाशा देणगीतून पैसे उभे करून मी ते वाटत होते, वसूल करत होते, हिशोब लिहीत होते, पैशाने पैसा वाढवत होते. याचबरोबर कुठे बाजारात, गोणपाटावर बसून तर कुठे झोपडपट्टीतल्या एखाद्या चौकात बसून मी सभासदांच्या बैठका घेत होते.  त्यातूनच ‘अन्नपूर्णा’चं लघुवित्त मॉडेल आकाराला येत होतं.

‘ज्या महिलांकडे तारण-जामीन नाही, त्यांचा एकमेकींवरील विश्वास हेच त्यांचं तारण’ याच तत्त्वावर बचत गट चळवळ भारत, बांगलादेश व इतर अनेक देशांत उभी राहिली आहे. पण या तंत्राचे मी अनेक प्रयोग माझ्या सहकारिणींसोबत सुरुवातीला केले. या तंत्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास मी २००० नंतर केला, माझ्या डॉक्टरेटच्या वेळी.

१९९३ ते २००३ या काळात ‘एकमेकींवरील भरोसा हेच तुमचं तारण! एकजूट-एकमूठ’ असं महिलांना शिकवत कधी ४ समविचारी महिलांचा गट केला तर कधी ५ कधी तर कधी ६ तर कधी ८ असे मिळतील तसे गट केले. साधारणपणे २००३ नंतर ५ महिलांचा एक गट हे अन्नपूर्णाचं मॉडेल स्थिरावलं. २००६ पासून २०१२ पर्यंत ३ गटांचं म्हणजे १५ महिलांचं एक केंद्र असाही प्रयोग झाला. पुन्हा २०१२ नंतर ५ च्या गटानेच आमचं कर्जाचं काम चालतं ते आजमितीपर्यंत सुरू आहे.

१९९६ मध्ये मी इंग्लंडमध्ये ससेक्स युनिव्हर्सिटीत ‘महिला व सक्षमीकरण’ हा अभ्यासक्रम करून आले त्यानंतर आवर्जून प्रत्येक महिलेच्या पतीशी संवाद वाढवला. प्रत्येकीला कर्ज देण्यापूर्वी पती-पत्नीची बैठक घेऊ  लागलो. त्याचा फार चांगला परिणाम झाला. आमची विश्वासार्हता वाढली. परतफेड करण्यामध्ये घरातील पुरुषसुद्धा सहभागी झाले. आजमितीला पुणे व मुंबई दोन शहरांत २१ शाखा कार्यालयामधून आमच्या १ लाखाहून अधिक सभासद सुरुवातीच्या १०/१५ हजारांच्या कर्जरकमेपासून २/३ लाखांची कर्जे प्रत्येकी घेत आहेत. व्यवसायामध्ये उलाढाल करत आहेत. घरं बांधत आहेत. मुलांच्या शिक्षणात गुंतवत आहेत. आर्थिक विकासाच्या पायऱ्या चढत आहेत, तशीच ‘अन्नपूर्णा’ परिवाराची वार्षिक आर्थिक उलाढाल १५० कोटींच्या घरात गेली आहे. माझ्या सभासदांसोबत सुरुवातीची १० वर्षे माझा दररोजचा संवाद असे. त्यातूनच मला गरिबी व गरिबीशी निगडित इतर समस्यांची जवळून ओळख झाली.

१९९३ ते २००० पर्यंत मी सभासदांचे अकाली मृत्यू, त्यांची व कुटुंबातील व्यक्तींची आजारपणं ही जवळून पाहिली. त्यातून जाणवलं, की नुसतं कर्ज, बचत कार्यक्रम राबवून उपयोग नाही. आजारपणाचा विमा, जीवनविमा, कुटुंबातील आजारपण, अपघात  यासाठी विम्याची नितांत गरज आहे. २००० ते २००३ या काळात मी जवळजवळ सर्व विमा कंपनीचं दार ठोठावलं ‘स्वस्तात गरिबांसाठी विमा आहे का?’ म्हणून पण नकारघंटा. शेवटी २००३ मध्ये तेव्हाच्या एक हजार सभासद व मी एका बैठकीमध्ये निर्णय घेतला आपणच आपला निधी उभारायचा. एकमेकींना व कुटुंबातील व्यक्तींना आजारपणात मृत्यूप्रसंगी मदत करायची. प्रत्येकी वार्षिक ५० रुपये वर्गणीतून उभा राहिलेला आमचा आरोग्य, जीवन, कुटुंब सुरक्षा निधी आज अडीच लाख सभासद व वार्षिक अडीच कोटी रुपयांची उलाढाल एवढा वाढलाय. जगभरातून आमचं हे मॉडेल पाहायला लोक येतात.

लहान मुलांसाठी पाळणाघरं हवी ही गरज लक्षात आली २००२ मध्ये. त्या वर्षी कर्वेनगर वस्तीत ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. आम्ही नुकतंच छोटं ऑफिस तिथे घेतलं होते. आजूबाजूला राहणाऱ्या आमच्या सभासद त्या घटनेने हादरून गेल्या होत्या. आणि खिशात एक रुपयासुद्धा नसताना मी पहिलं पाळणाघर तिथे सुरू केलं.  ८ तास मुलं सांभाळण्याची, त्याचं महिना २५ रुपये शुल्क. जेमतेम ७/८ मुलांनी सुरू झालेला आमचा ‘वात्सल्यपूर्णा’ उपक्रम आजमितीला २० पाळणाघरं, पुणे, मुंबई मिळून ७०० मुलं, ५० प्रशिक्षित महिलांची टीम आणि वार्षिक ५० लाख रुपयांची उलाढाल इथपर्यंत पोचलाय.

आणखी एक छोटा पण महत्त्वाचा प्रकल्प ‘विद्यापूर्णा.’ एकाकी मातांच्या मुली, मुलांना वार्षिक, शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून २५ लाख रुपये आम्ही वाटतो. हासुद्धा २००३ पासून उभा राहिलेला प्रकल्प! ज्यामध्ये अनेक दाते सहभागी आहेत. महिलांशी सततच्या संवादातून त्यांच्या गरजा जाणवत गेल्या तसतसे प्रकल्प उभे राहिले. त्यामुळे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करायला निघालेली मी त्या परिवाराचं संपूर्ण सक्षमीकरण करायला कधी लागले हे कळलंच नाही. या प्रवासाच्या सुरुवातीला ‘मी’ होते ते ‘आम्ही’ झालो. अन्नपूर्णा परिवार हा ५ संस्थांचा समूह २५ वर्षांत उभा राहिला, ज्यात नि:स्वार्थी, ज्ञानी संचालकमंडळ आहे. ४०० कर्मचारी, जे कार्यकर्त्यांच्या भूमिकेत असतात. १०० सभासद प्रतिनिधी आणि अडीच लाख सभासद असा हा जिव्हाळ्याचा परिवार आहे.

या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे माझ्या आईने स्थापन केलेल्या ‘अन्नपूर्णा महिला मंडळ’ याचे पुनरुज्जीवन. १९७५ मध्ये सुरूझालेली अन्नपूर्णा महिला मंडळाची वाटचाल २००२ मध्ये एका कोंडीत सापडली. १९८२ च्या गिरणी कामगारांच्या संपापासून अन्नपूर्णा महिला मंडळाचे कार्यक्षेत्र बनलं होतं महिलांना खाद्यपदार्थ प्रशिक्षण देणं व विक्री करणं. २००२ मध्ये व्हॅट आला आणि तो सर्व उद्योगांप्रमाणेच ना नफा तत्त्वांवरील संस्थांनाही लागू झाला. एका बाजूला दर दिवशी बदलणारे मार्केट व स्पर्धा आणि दुसऱ्या बाजूला व्हॅटचा बोजा. आईचं वय झालेलं व तिच्यासोबतची टीम अगदीच साध्या महिलांची. त्यामुळे मला यात लक्ष घालावं लागलं, टीकेलाही तोंड द्यावं लागलं.

प्रथम तर पैसे उभे करून ५२ लाख रुपये व्हॅट भरावा लागला. नंतर सर्व महिलांना खूपदा बैठका घेऊन समजावून सांगावं लागलं की अन्नपूर्णा महिला मंडळच्या झेंडय़ाखाली कॅटिरग व्यवसाय करता येणार नाही, तुम्ही प्रशिक्षित आहात, तुम्ही स्वत: करू शकता. तुमची उलाढाल छोटी असेल व तुम्हाला व्हॅट लागणार नाही. हे सर्व सर्वाना पटायला फार वेळ लागला. पण आज जेव्हा पूर्वी अन्नपूर्णात असलेली कॅटिरग युनिट्स स्वत:च्या पायावर चाललेली मी पाहते तेव्हा माझा तो निर्णय योग्यच होता याची मला खात्री पटते.

या सर्व वाटचालीत मी खूप शिकले. अनेक पदव्या घेऊन जे शिक्षण मिळत नाही ते शेवतांबाई-जहीदाबीसारख्या रांगडय़ा मैत्रिणींच्या संगतीने शिकायला मिळालं.

महिलांच्या अनुभव समस्यांवर आधारित विविध सेवा देणारे प्रकल्प उभे राहिले. त्या प्रकल्पांसाठी कर्मचारी काही तळागाळातून घेतले. समाजसेवेचं प्रशिक्षण घेतलेली तरुण टीमही घेतली. प्रत्येक प्रकल्पासाठी सुयोग्य असं नोंदणीकरण करून ५ संस्थांचा ‘अन्नपूर्णा परिवार’ हा संस्थासमूह उभा राहिला. त्यामध्ये विविध व्यक्तींना संचालक मंडळावर निमंत्रित केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या २५ वर्षांच्या वाटचालीत ‘सभासद प्रतिनिधी’ ही संकल्पना घेऊन महिलांना नेतृत्वाची संधी दिली, त्यातून या महिला निर्णयप्रक्रियेत सहभागी झाल्या. असा हा प्रवास ‘आर्थिक सबलीकरणाकडून संपूर्ण सक्षमीकरणाकडे’ जात राहिला.

डॉ. मेधा पुरव सामंत

dr.medha@annapurnapariwar.org

First Published on July 15, 2017 1:02 am

Web Title: success story of annapurna pariwar