शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विविध सरकारी योजना, सरकारी कार्यक्रम आदी अशैक्षणिक कामांमुळे प्रचंड तणावाखाली दबलेल्या शिक्षकांना सध्या मुलांना शिकवायचे की कागदी घोडे रंगवायचे, या प्रश्नाने छळले आहे. त्यातच कामाच्या अतिताणामुळे चोपडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चौगाव शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सरला सोनवणे यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याने शिक्षकांवरील अतिरिक्त कामाच्या दडपणाचे गांभीर्य वाढले आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्याशिवाय निवडणूक कामापासून चावडीवाचनापर्यंत अशी १९ कामे शिक्षकांना करावी लागत आहेत.
सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापनअंतर्गत चाचणी घेणे, या सर्व नोंदवह्य़ा पूर्ण करणे, संकलित मूल्यमापन सत्र एकच्या प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रगतिपुस्तकांवर विद्यार्थ्यांची माहिती भरणे, वयानुरूप समकक्ष वर्गात दाखल झालेल्या मुलांचे सराव वर्ग सुरू करणे, प्रत्येक शनिवारी दीड ते दोन तास चावडीवाचन उपक्रम राबविणे, शिष्यवृत्ती सराव वर्ग तातडीने सुरू करणे आदी शैक्षणिक स्वरूपाच्या कामांबरोबरच अनेक कारकुनी स्वरूपाची कामेही शिक्षकांना सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत करावी लागतात. त्यात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, शैक्षणिक साहित्याची नोंद ठेवणे, गणवेश योजनेची अंमलबजावणी करणे, पटनोंदणी, शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज ऑनलाइन भरणे आदी कामे आहेत. अशा तब्बल १९ कामांची ‘चेकलिस्ट’ सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षकांमध्ये फिरते आहे.
तशात आता निवडणुकीमुळे मतदान केंद्राच्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करून घेणे, १०० टक्के मतदान व्हावे यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन गावामध्ये जनजागृती करणे, गांधी जयंतीच्या दिवशी शाळेत स्वच्छता मोहीम राबविणे अशा एकामागोमाग एक उपक्रमांचा ससेमिरा शिक्षकांच्या मागे लावण्यात आल्याने शिक्षकांच्या तोंडाला फेस येऊ लागला आहे.
या कामांव्यतिरिक्तही वर्षभर जनगणना करा, वृक्षारोपण करा, शाळाबाह्य विद्यार्थी शोधा, अपंग शोधा, जनावरे शोधा, पाणवठे शोधा अशा अनेक कामांचा बोजा शिक्षकांच्या माथी मारला जातो. यात सर्वाधिक भरडले जातात ते जिल्हा परिषदेचे शिक्षक. पण, ‘कामाचा बोजा शहरातील शिक्षकांवरही काही कमी नाही. कारण, गेल्या काही वर्षांत विषयांची संख्या वाढली, पण त्या तुलनेत शिक्षकांची वाढली नाही. त्यातून आकारिक मूल्यमापनामुळे शिक्षकांवर शैक्षणिक कामाचा ताण खूप वाढला आहे,’ अशी तक्रार ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे’चे मुंबई विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली. तर ‘एकीकडे खिचडीची जबाबदारी, तर दुसरीकडे शाळेचे बांधकाम करून त्याचे हिशोब सादर करायचे. दुसरीकडे गणवेशाचे मापे घ्यायची, तर तिसरीकडे निवडणुकीकरिता केलेल्या कामाचा हिशोब द्यायचा. या सर्व कामांबरोबरच नाचवाव्या लागणाऱ्या कागदी घोडय़ांमुळे आम्ही सर्वाधिक त्रस्त आहेत,’ अशी प्रतिक्रिया संगमनेर येथील एका शिक्षकाने दिली.

“शिक्षणाचा अधिकार आणि बदललेला अभ्यासक्रम यामुळे शिक्षण क्षेत्राशी संबंधित नऊ मंडळांकडून शाळांवर परिपत्रकांचा, सूचनांचा सातत्याने भडिमार होतो आहे. तणावाखाली काम करावे लागल्याने ७० टक्के मुख्याध्यापकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांना सहकार्य करणाऱ्या पर्यवेक्षक आणि उपमुख्याध्यापकांची अवस्थाही अशीच आहे. आम्ही कामे तरी किती करायची? पाच-सहा वर्षांत अनेक शिक्षकांचे हृदयविकाराने निधन झाले आहे.”
– प्रशांत रेडीज, प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटना महामंडळ