26 September 2020

News Flash

भारताच्या नकाशातून अंदमान-निकोबार गायब

इयत्ता नववीच्या ‘भूगोल आणि अर्थशास्त्र’ विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार गेल्या वर्षी बाजारात आलेल्या पाठय़पुस्तकातील चुकांची पुनरावृत्ती यंदा नव्याने प्रकाशित झालेल्या पाठय़पुस्तकात करताना पहिल्याच पानावर छापण्यात आलेल्या

| June 15, 2013 04:37 am

इयत्ता नववीच्या ‘भूगोल आणि अर्थशास्त्र’ विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार गेल्या वर्षी बाजारात आलेल्या पाठय़पुस्तकातील चुकांची पुनरावृत्ती यंदा नव्याने प्रकाशित झालेल्या पाठय़पुस्तकात करताना पहिल्याच पानावर छापण्यात आलेल्या भारताच्या नकाशातून पुन्हा एकदा अंदमान-निकोबार बेटांना बंगालच्या उपसागरात बुडविण्यात आले आहे. तसेच, वाहतूक मार्ग, नद्यांचे मार्ग, प्रमुख उद्योगांची, पर्यटन स्थळांची ठिकाणे दाखविणाऱ्या नकाशात देखील भयंकर चुका करून ठेवल्या आहेत.
नववीच्या हिंदी विषयाच्या पाठय़पुस्तकातही यंदा चुकांची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. हाच कित्ता ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ने भूगोलाच्या पाठय़पुस्तकाबाबतही गिरविला आहे. पाठय़पुस्तकाच्या पहिल्याच पानावरील भारताच्या नकाशातून अंदमान-निकोबार ही बेटे गायब आहेत. तर पाठय़पुस्तकभर विखुरलेल्या नकाशांमध्ये भयंकर चुका करून ठेवल्याचा तज्ज्ञ शिक्षकांचा आक्षेप आहे. ‘महाराष्ट्राच्या वाहतूक मार्गाच्या नकाशात शिर्डी, उस्मानाबाद रेल्वे स्टेशनेही गेल्या वर्षीप्रमाणे गायब आहेत. याच नकाशात वसई-दिवा आणि पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग देखील दिसत नाहीत. तर कोकण रेल्वे खेड-गोरेगावच्या मधल्या भागात महाबळेश्वर-पांचगणीच्या फारच जवळ नेली आहे. अलिबागला जवळच लागून रोहे रेल्वे स्टेशन दाखविले आहे. कोकण रेल्वे व इतर मार्ग दाखविताना रेल्वे-वेळापत्रकातील प्रमाणित नकाशा संदर्भासाठी घ्यावा हे मंडळाच्या तज्ज्ञांना कळत नाही काय,’ असा सवाल साठय़े महाविद्यालयातील भूगोलाचे माजी प्राध्यापक विद्याधर अमृते यांनी केला. पुस्तकातील छायाचित्रे अस्पष्ट तर आहेतच; पण, काही छायाचित्रांखालील तळटिपा आशयापेक्षा वेगळ्या वाटतात. तसेच, नकाशातील रंगाच्या छटा उगीचच दाट केल्याने विवरण समजतच नाही, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

चुकीच्या नकाशावरून होणारे गैरसमज
* राज्यात द्राक्षे फक्त नाशिक व सांगली जिल्ह्य़ातच होतात.
* वास्तविक कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्य़ातही द्राक्षे होतात. (नकाशा ४.८)
* नांदेडमध्ये भात पिकतच नाही (नकाशा ४.३)
* मुंबई, भिवंडी, येवला, मालेगाव, हिंगणघाट, जालना, सांगली, मिरज येथे सुती कापड उद्योग नाही.      रत्नागिरीत रासायनिक उद्योग नाही. (नकाशा ५.१)
* ठाण्यातील नद्या पूर्णत: पश्चिमेकडे सरकल्या आहेत. (नकाशा २.३)
* उंदेरी किल्ला मुंबईत आहे (पृष्ठ ४७)

संदर्भ पुस्तकांची नावे नाहीत
अर्थशास्त्राच्या लहान भागासाठी एकूण १७ संदर्भ पुस्तकांची यादी दिली असून अर्थशास्त्रज्ञांची छायाचित्रे (काही ठिकाणी दोन वेळा) छापली आहेत. भूगोलाबाबत मात्र एकाही संदर्भ पुस्तकाचा उल्लेख नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांची छायाचित्रे छापण्याचाही प्रश्न येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 4:37 am

Web Title: andaman nicobar missing from india map in geography book
Next Stories
1 शिक्षण आणि लेखनविषयक अभ्यासक्रम
2 परळच्या श्रमविज्ञान संस्थेचा पेपर फुटला
3 पदवीची दुसरी कटऑफ जाहीर
Just Now!
X