मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा भाग असलेल्या बेस्टच्या भाडय़ात फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात वाढ झाल्यानंतर घटलेल्या प्रवासी संख्येला येत्या शैक्षणिक वर्षांत आणखी गळती लागण्याची शक्यता आहे. या भाडेवाढीनुसार विद्यार्थी पासाचे दर किमान १२५ रुपयांवरून ३०० रुपये एवढे करण्यात आले आहेत. दुपटीने वाढलेल्या या दरांमध्ये विद्यार्थ्यांना सवलत मिळावी, अशी सूचना बेस्ट समिती सदस्यांनी केली होती. मात्र अशी सवलत दिल्यास किंवा विद्यार्थी पासातील भाडेवाढ मागे घेतल्यास अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला मोठा फटका बसेल, असे सांगत प्रशासनाने ही सूचना फेटाळून लावली आहे. परिणामी यंदाच्या शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांना किमान ३०० रुपये भाडे भरावे लागणार आहे.
बेस्टने आपल्या अर्थसंकल्पात परिवहन विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी फेब्रुवारी आणि एप्रिल या दोन महिन्यांत भाडेवाढ प्रस्तावित केली होती. त्यानुसार बेस्टचे नवे भाडे अनुक्रमे १ फेब्रुवारी आणि १ एप्रिलपासून लागू झाले आहे.
या भाडेवाढीनुसार बेस्टच्या विविध पासांतही वाढ झाली होती. त्यात बेस्टच्या विद्यार्थी पासाचे किमान भाडे १२५ रुपयांवरून ३०० रुपये एवढे वाढवण्यात आले आहे. त्या वेळी समिती सदस्य केदार होंबाळकर यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता. मात्र त्या वेळी हा ठराव सहा विरुद्ध दोन मतांनी संमत झाला.
ही भाडेवाढ एप्रिलमध्ये झाली. मात्र एप्रिल व मे महिन्यांत शाळांना उन्हाळी सुटय़ा असल्याने विद्यार्थी व पालक या दोन्ही घटकांना विद्यार्थी पासात झालेल्या वाढीचा फटका बसला नाही.
मात्र आता सोमवार, १५ जूनपासून मुंबईतील शाळा सुरू होत आहेत. ही बाब लक्षात घेत विद्यार्थ्यांना व पालकांना या भाडेवाढीचा फटका बसू नये म्हणून बेस्ट समिती सदस्यांनी व समिती अध्यक्षांनीही विद्यार्थी पासात सवलत देण्याची सूचना बेस्ट प्रशासनाला केली होती. याबाबत गुरुवारी झालेल्या समिती बैठकीत समिती सदस्य श्रीकांत कवठणकर यांनी पुन्हा एकदा विद्यार्थी पासात सवलत देण्याचा मुद्दा काढला.

सूचना व्यवहार्य नाही
या मुद्दय़ाला उत्तर देताना वाहतूक विभागाचे उपमहाव्यवस्थापक देशपांडे यांनी ही सूचना बेस्टसाठी व्यवहार्य नसल्याचे सांगितले. दरमहा जवळपास १० लाख विद्यार्थी पास काढले जातात. बेस्टने आपल्या अर्थसंकल्पात नियोजित उत्पन्नात या वाढीव दराने काढलेल्या पासचे उत्पन्न गृहीत धरले आहे. त्यामुळे आता अचानक सवलत दिल्यास बेस्टचा अर्थसंकल्पीय अंदाज कोलमडण्याची शक्यता आहे, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षांत पालकांना विद्यार्थी पासाच्या वाढीव रकमेचा फटकाही बसणार आहे.