मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांचा कार्यकाळ सोमवारी संपला असून नवीन परीक्षा नियंत्रकांची नियुक्ती होईपर्यंत उपकुलसचिव दीपक वसावे यांच्याकडे परीक्षा नियंत्रकपदाची हंगामी सूत्रे सोपविण्यात आली आहेत.भोंडे यांचा कार्यकाळ वाढवून मिळावा यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने भोंडे यांनी सोमवारी आपल्याला पदावरून मुक्त करावे असे विद्यापीठाला सांगितले.
भोंडे यांच्या विनंतीवरून त्यांना त्यांच्या मूळ पदी रुजू होण्याची मुभा विद्यापीठ प्रशासनाने दिली. यानंतर या पदाची जाहिरात देऊन सर्व प्रक्रिया पार पडून नवी नियुक्त होईपर्यंत परीक्षा विभागात उपकुलसचिव पदावर कार्यरत असलेल्या वसावे यांच्याकडे या पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. वसावे यांनी यापूर्वी सप्टेंबर २०१२ ते मे २०१३ या कालावधीत परीक्षा नियंत्रक पदाची हंगामी धुरा सांभाळली होती.